DMK Insulting Indian Flag : तमिळनाडूच्या द्रमुक सरकारकडून इस्रोच्या नवीन प्रक्षेपण केंद्राच्या विज्ञापनामध्ये चीनच्या ध्वजाचा वापर !

भाजपकडून टीका

चेन्नई (तमिळनाडू) – तमिळनाडूतील सत्ताधारी द्रविड मुन्नेत्र कळघम् (द्रविड प्रगती संघ) पक्षाने राज्यातील तमिळ भाषिक वृत्तपत्रांमध्ये इस्रोच्या प्रक्षेपण केंद्राच्या संदर्भात विज्ञापन प्रकाशित केले आहे. यामध्ये चीनचा ध्वज यानाच्या टोकावर दाखवण्यात आला आहे. या विज्ञापनावरून तमिळनाडू भाजपचे अध्यक्ष के. अण्णामलाई यांनी टीका केली आहे.

सौजन्य : इंडिया टूडे 

अण्णामलाई म्हणाले की,

१. द्रमुकचे मंत्री थिरू अनिथा राधाकृष्णन् यांनी प्रमुख तमिळी दैनिकांना दिलेले हे विज्ञापन द्रमुकची चीनशी असलेली बांधीलकी आणि आपल्या देशाच्या सार्वभौमत्वाची पूर्ण अवहेलना दर्शवणारी आहे.

२. भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (‘इस्रो’ने) कुलसेकरपट्टीनम् येथे दुसरे प्रक्षेपण केंद्र उभारण्याचे घोषित केल्यानंतर भ्रष्टाचाराचे आरोप असलेला द्रमुक तेथे भित्तीपत्रके लावण्यास उत्सुक आहे. द्रमुकची घाई ही त्याची मागील गैरकृत्ये दडपण्याचा प्रयत्न दर्शवते. आपण त्यांना आठवण करून दिली पाहिजे की, द्रमुकमुळेच आज ‘सतीश धवन स्पेस सेंटर’ तमिळनाडूत नाही, तर आंध्रप्रदेशात आहे.

३. जेव्हा इस्रोच्या पहिल्या प्रक्षेपण केंद्राचे नियोजन केले जात होते, तेव्हा तमिळनाडू इस्रोची पहिली पसंती होती. राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री थिरू अण्णादुराई तीव्र खांदेदुखीमुळे या संदर्भातील बैठकीला उपस्थित राहू शकले नाहीत. यासाठी त्यांनी त्यांच्या जागी मथियाझगन या त्यांच्या एका मंत्र्याची नेमणूक केली. बैठकीत ते येतील, यासाठी इस्रोचे अधिकारी बराच वेळ थांबले. शेवटी मथियाझगन मद्यधुंद अवस्थेत आले. यामुळेच तमिळनाडूत त्या वेळी प्रक्षेपण केंद्र होऊ शकले नाही. द्रमुककडून देशाच्या अंतराळ कार्यक्रमाला ६० वर्षांपूर्वी अशीच वागणूक देण्यात आली होती. आताही द्रमुकमध्ये फारसा काही पालट झालेला नाही, उलट त्याची स्थिती आणखी वाईट झाली आहे.

द्रमुकने क्षमा मागावी ! – पंतप्रधान मोदी

द्रमुकचे विज्ञापन भयंकर आहे. तुमच्या करातून गोळा झालेल्या पैशातून द्रमुक सरकारने हे विज्ञापन दिले आहे. द्रमुकने याद्वारे भारतीय विज्ञान आणि भारतीय अवकाश क्षेत्र यांचा अपमान केला आहे, तुमचा अपमान केला आहे, त्यासाठी सरकारने क्षमा मागितली पाहिजे, अशी मागणी पंतप्रधान मोदी यांनी इस्रोच्या नवीन प्रक्षेपण केंद्राच्या पायाभरणीच्या वेळी झालेल्या सभेत केली.

संपादकीय भूमिका 

द्रमुकला याविषयी केंद्र सरकार आणि जनता यांनी जाब विचारणे आवश्यक आहे ! तसेच याविरोधात पोलिसांत गुन्हाही नोंदवण्यास भाग पाडले पाहिजे !