मानसिक ताण देतो अनेक आजारांना निमंत्रण !

मागच्या लेखामध्ये (१५ फेब्रुवारी या दिवशी प्रसिद्ध झालेल्या) अंतःस्रावांचे असंतुलन होण्यासाठी मानसिक ताण कारणीभूत असतो, हे आपण वाचले. ‘मानसिक ताणाचा खरच इतका परिणाम होतो का ?’, असा प्रश्न बर्‍याच जणांच्या मनात निर्माण होतो. मानसिक ताण आपल्या शरिरातील विविध संस्थांवर कसा विपरीत परिणाम करतो, ते आजच्या लेखामध्ये आपण समजून घेणार आहोत. हे लक्षात घेऊन सर्वजण निरोगी आयुष्याच्या दृष्टीने केवळ शरिराचेच आरोग्य नाही, तर मनाचे आरोग्य जपण्यासाठीही नक्कीच कार्यप्रवण होतील.

१. अस्थी आणि स्नायू संस्था

ताण असल्यास स्नायूंवर ताण येतो. स्नायूंवर ताण येणे, ही शरिराची ताणावर असलेली नैसर्गिक प्रतिक्रिया आहे. अचानक आलेल्या मानसिक ताणामुळे जसा स्नायूंवर ताण येतो, तसा ताण न्यून झाल्यावर स्नायूंवर आलेला ताणही हळूहळू न्यून होतो; पण सतत मानसिक ताण असेल, तर स्नायूंवर वारंवार ताण येत रहातो आणि इतर आजारांना निमंत्रण मिळते. स्नायूंवर आलेल्या ताणामुळे मान, खांदे, डोके दुखणे, कंबरदुखी इत्यादी.

२. श्वसन संस्था

वैद्या (सौ.) मुक्ता लोटलीकर

श्वसन संस्थेचे कार्य आपल्या शरिराला प्राणवायूचा पुरवठा करण्याचे आहे. जेव्हा ताण येतो, तेव्हा श्वास अपुरा पडत असल्याने श्वसनाची गती वाढते. ज्या लोकांना श्वसन संस्थेचे आजार नसतील त्यांना तेवढा परिणाम जाणवत नाही; पण दमा किंवा तत्सम श्वसन संस्थेचे आजार असतील, तर ताणामुळे ते आजार बळावण्याची शक्यता असते.

३. रक्ताभिसरण संस्था

रक्ताभिसरण संस्था ही हृदय आणि त्यापासून निघणार्‍या रक्तवाहिन्या यांनी बनलेली असते. संपूर्ण शरिराला शुद्ध रक्ताचा पुरवठा करण्याचे कार्य ही संस्था करत असते. अचानक आलेल्या ताणामुळे उदाहरणार्थ कार्यालयात एखादे अचानक आलेले काम, रस्त्यावर वाहतुकीचा खोळंबा (ट्रॅफिक जॅम) आणि वेळेवर पोचण्याचा ताण इत्यादींमुळे हृदयाची गती वाढते, हृदयाच्या स्नायूंचे आकुंचनही गतीने होते. ताण आल्याने शरिरात स्रवत असलेल्या काही अंतःस्रावांचा परिणाम म्हणून हे घडते. दीर्घकाळासाठी जर ताण असेल, तर हृदयाची गती नेहमी वाढलेली असणे, दीर्घकाळ ताण असेल, तर हृदयाची आकुंचनाची गती आणि जोर वाढतो त्यामुळे रक्तदाब वाढणे, हृदयविकाराचा झटका येणे इत्यादी विकार निर्माण होतात.

 

४. अंतःस्रावी संस्था

ताण आल्यानंतर शरिराची नैसर्गिक प्रतिक्रिया म्हणून ‘कोरटीसोल’ नावाचा अंतःस्राव निर्माण होतो. या अंतःस्रावामुळे ताणावर मात करण्यासाठी ऊर्जा निर्माण केली जाते. थोडा काळ आलेल्या ताणावर हा अंतःस्राव आवश्यक ती कामगिरी बजावतो. सततच्या आलेल्या ताणामुळे या अंतःस्रावाचे असंतुलन निर्माण होणे आणि परिणामी अंतःस्रावी संस्थेमध्ये असंतुलन घडून येते. म्हणून ताणामुळे मधुमेह, स्थूलता आणि नैराश्य अशा समस्या निर्माण होतात.

५. पचनसंस्था

एखाद्या गोष्टीचा ताण आला, तर आपण ‘पोटात गोळा आला’, असे म्हणतो, म्हणजेच आपल्या पचनसंस्थेचे आणि मेंदूकडून येणार्‍या संवदेनांचा परस्पर संबंध असतो, हे आपल्याला लक्षात आले. ताण बर्‍याच वेळा अती खाण्यास प्रवृत्त करतो किंवा भूक पूर्णपणे मारतो. व्यसनाचा अतिरेकही याचमुळे घडून येतो. त्यामुळे छातीत जळजळ होणे, ही तक्रार आढळून येते. सतत मानसिक ताण आणि मानसिक थकवा छातीत जळजळ करण्याच्या लक्षणांमध्ये वाढ करतो, तसेच अन्नाचे नीट पचन न होणे, मलबद्धता होणे किंवा अतीसार होणे, हेही होऊ शकते.

६. प्रजनन संस्था

मानसिक ताण हा स्त्रियांमध्ये मासिक पाळीच्या तक्रारींवर परिणाम करतो. पाळी अनियमित येणे, पाळीच्या वेळी पुष्कळ त्रास होणे, गर्भधारणा होण्यास अडथळा निर्माण होणे, अशा अनेकविध समस्या केवळ ताणामुळे निर्माण होऊ शकतात. सततचा ताण पुरुषांमध्ये बर्‍याच समस्या निर्माण करतो. जसे की, शुक्राणूंची संख्या न्यून होणे, संतती न होणे इत्यादी. सततचा ताण वैवाहिक जीवनातही समस्या निर्माण करतो.

अशा प्रकारे केवळ ताण हे अनेक आजारांचे मूळ कारण ठरत आहे, तेव्हा मानसिक ताण न्यून होण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. ताण या धकाधकीच्या जीवनात येणारा अविभाज्य घटक आहे; पण त्या ताणाचा आपल्या शरिरावर परिणाम होऊ न देता त्यावर कशी मात करायची ? यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. जसे की,

अ. प्रतिदिन कोणताही आवडता व्यायाम करावा.

आ. रात्रीची झोप पूर्ण होईल, असे नियोजन करावे.

इ. स्वतःचा आवडता छंद जोपासला पाहिजे.

ई. प्राणायाम, ध्यानधारणा आदी कोणत्याही मार्गाने साधना करणे.

उ. बर्‍याचदा ताण येण्यास स्वतःचे स्वभावदोष कारणीभूत असतात, उदाहरणार्थ ‘माझ्या मताप्रमाणेच सगळे झाले पाहिजे’, असा अट्टहास असेल आणि समोरची परिस्थिती विरुद्ध असेल, तेव्हा ताण वाढायला लागतो, राग यायला लागतो. अशा प्रकारे स्वतःच्या कोणत्या स्वभावदोषामुळे आपल्याला ताण येतो, त्याचा अभ्यास करून त्यावर स्वयंसूचना घेऊन मात करण्यासाठी प्रयत्न करावा.

– वैद्या (सौ.) मुक्ता लोटलीकर, पुणे (२६.२.२०२४)