गारपिटीने झालेल्या हानीचे तात्काळ पंचनामे केले जातील !
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आश्वासन !
मुंबई, २७ फेब्रुवारी (वार्ता.) – ‘महाराष्ट्रातील ५ ते ६ जिल्ह्यांमध्ये गारपीट होऊन पिकांची हानी मोठ्या प्रमाणावर झाली आहे, ही स्थिती खरी आहे. त्या हानीचे तात्काळ पंचनामे करावेत, असे आदेश दिले आहेत. धान उत्पादकांना तात्काळ पैसे देण्यात येतील’, असे आश्वासन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २७ फेब्रुवारी या दिवशी विधानसभेत दिले. ‘सध्या महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये गारपीट होऊन शेतकर्यांची हानी झाली आहे. ५ ते ६ जिल्हे हे बाधित झाले आहेत. त्यामध्ये डाळींब, द्राक्षे, गहू, हरभरा या पिकांची मोठ्या प्रमाणांवर हानी झाली आहे. तरी सरकारने त्वरित पंचनामे करून शेतकर्यांना हानीभरपाई द्यावी, तसेच मागे धान उत्पादकांना हानी भरपाईचे पैसे पोचले नाहीत, तेही त्वरित द्यावेत’, अशी मागणी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी औचित्याचे सूत्र मांडतांना केली. त्यानंतर फडणवीस यांनी वरील उत्तर दिले.