रा.स्व. संघाच्या पश्चिम महाराष्ट्र प्रांत संघचालकपदी नानासाहेब अण्णाजी तथा सुरेश जाधव यांची निवड !
पुणे – राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या २५ फेब्रुवारीला पुणे येथे झालेल्या पश्चिम महाराष्ट्र प्रांतीय बैठकीत प्रांत संघचालकपदी नगर येथील नानासाहेब अण्णाजी तथा सुरेश जाधव यांची निवड करण्यात आली. संघाच्या रचनेत प्रत्येकी ३ वर्षांनी शाखा प्रतिनिधींकडून अशी निवड केली जाते. श्री. नानासाहेब जाधव यांनी कृषी अभियांत्रिकीच्या मृद् आणि जलसंधारण या विषयातील पदव्युत्तर (एम्.टेक.) शिक्षण पूर्ण केले आहे. शिक्षणानंतर त्यांनी पुणे जिल्ह्यातील मावळ, शिरूर या तालुक्यांत आणि त्यानंतर जळगाव जिल्हा प्रचारक म्हणून ६ वर्षे संघाचे पूर्णवेळ (प्रचारक) काम केलेले आहे.
त्यानंतर ते राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापिठातील कृषी महाविद्यालय धुळे येथे साहाय्यक प्राध्यापक म्हणून रुजू झाले. त्यानंतर ते म.फु. कृषी विद्यापिठाच्या राहुरी येथील प्रक्षेत्र संचालनालय, डॉ. आण्णासाहेब शिंदे कृषी अभियांत्रिकी महाविद्यालय, वनशेती संशोधन प्रकल्प राहुरी येथे प्राध्यापक, शास्त्रज्ञ या पदांवर कार्यरत होते. वर्ष २०१५ ला त्यांची पश्चिम महाराष्ट्र प्रांताचे मा. संघचालक या पदावर निवड झाली. तेव्हापासून ते हे दायित्व सांभाळत आहेत. आतापर्यंत त्यांची २०१५, २०१८, २०२१ आणि आता पुन्हा २०२४ अशी ४ वेळा प्रांत संघचालक पदावर निवड झालेली आहे.