फरिदाबाद येथे झालेल्या ‘हिंदु एकता फेरी’च्या वेळी साधकांना आलेल्या अनुभूती
७.५.२०२३ या दिवशी फरिदाबाद येथे ‘हिंदु एकता फेरी’ काढण्यात आली होती. त्या वेळी देहली सेवाकेंद्रातील साधकांना आलेल्या अनुभूती येथे दिल्या आहेत.
१. कु. रुची पवार
१ अ. बाहेर पुष्कळ ऊन असूनही सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळेकाका आणि सर्व साधक सेवा करत असलेल्या ठिकाणी अकस्मात् थंड वारा येऊ लागणे : ‘गुरुदेवांच्या कृपेने प्रथमच मला ‘हिंदु एकता फेरी’त सहभागी होण्याची संधी मिळाली. त्या वेळी ऊन असल्यामुळे पुष्कळ उकाडा जाणवत होता; परंतु ज्या भागात सद्गुरु पिंगळेकाका आणि सर्व साधक सेवा करत होते, तेथे त्या तुलनेत अल्प प्रमाणात उकाडा जाणवत होता. बाहेर पुष्कळ ऊन असूनही काही वेळानंतर तेथे अकस्मात् थंड वारा येऊ लागला. ‘गुरुदेवांनीच सर्व साधकांसाठी वातावरण अनुकूल केले’, असे आम्हाला वाटले.
१ आ. पाऊस पडत असूनही सर्व जण फेरीतून चालत रहाणे आणि सर्वांच्या चेहर्यावर केवळ आनंदच दिसून येणे : प्रत्यक्ष फेरी चालू असतांना थोडा वेळ पाऊस पडला; परंतु कोणत्याही साधकाला ‘आता थांबायचे आहे कि चालत रहायचे आहे ?’, असा प्रश्न पडला नाही. सर्व जण पावसातही आपल्या मार्गाने पुढे जात होते. या वेळी फेरीत वयोवृद्ध साधक आणि बालसाधकसुद्धा होते. त्या सर्वांच्या चेहर्यावर केवळ आनंदच दिसून येत होता.
१ इ. परात्पर गुरु डॉक्टरांचे अस्तित्व जाणवणे
१. फेरीमध्ये धर्मध्वजाच्या मागे सद्गुरु पिंगळेकाका चालत होते. त्यांच्या मागे मी चालत होते. तेव्हा ‘श्रीगुरुच सर्वांना पुढे घेऊन जात आहेत आणि मी त्यांच्या पाऊलखुणांवरून चालत आहे’, असे मला वाटले.
२. ‘हिंदु एकता फेरी’च्या वेळी प्रत्यक्ष गुरुदेवच तेथे उपस्थित आहेत आणि प्रत्येक क्षणी ते त्यांच्या अस्तित्वाची जाणीव करून देत आहेत’, असे मला जाणवले.
२. कु. मनीषा माहुर
२ अ. सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळकाका यांनी सांगितलेले नामजपादी उपाय केल्यावर पाऊस थांबणे : ही फेरी चालू असतांना मधेच पाऊस येऊ लागला आणि जोराने वारे वाहू लागले होते. त्या वेळी आम्ही सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळकाका यांना नामजपादी उपाय विचारून घेतले. सद्गुरु गाडगीळकाकांनी सांगितल्याप्रमाणे नामजप केल्यावर जवळजवळ ७ – ८ मिनिटांतच पाऊस थांबला. नंतर सद्गुरु गाडगीळकाकांना भ्रमणभाष केल्यावर त्यांनी सांगितले, ‘‘नामजप करतांना मला माझे डोळे आणि चेहरा यांवर त्रासदायक आवरण आल्याचे जाणवत होते. मी हाताने आवरण काढल्यावर ‘तेथे पाऊस पडण्याचे प्रमाण अल्प झाले आहे’, असे मला जाणवले.’’ खरोखरच त्या वेळी पाऊस पडण्याचे प्रमाण अल्प झाले होते.’
३. श्री. प्रशांत चव्हाण
३ अ. फलक लावतांना अडचणी आल्यावर गुरुदेवांना शरण जाऊन प्रार्थना करणे, आयत्या वेळी सर्व अडचणी दूर होऊन फलक लावले जाणे आणि ‘गुरुदेवच सेवा करून घेत आहेत’, अशी अनुभूती येणे : ‘हिंदु एकता फेरी’च्या वेळी मला फलकाला ‘फ्रेम’ (फलक वार्याने उडू नये, यासाठी फलकाच्या मापाची लाकडी ‘चौकट’) लावण्याची सेवा मिळाली होती. त्याच्या आदल्या दिवशी ‘फलक कसे लावायचे ?’, याचे नियोजन केले होते. प्रत्यक्ष सेवा करतांना लक्षात आले की, आम्ही नियोजन केले आहे, त्यानुसार फलकाला ‘फ्रेम’ बसत नाही. त्यामुळे माझ्या मनात विचारांचे द्वंद्व चालू झाले, ‘ही सेवा २ घंट्यांत कशी पूर्ण होणार ? आणखी लागणारे साहित्य कुठून आणणार ?’ तेव्हा मी गुरुदेवांना शरण जाऊन प्रार्थना कली आणि त्यानंतर ऐन वेळी सर्व साहित्य मिळाले अन् सर्व अडचणी दूर झाल्या. तेव्हा ‘गुरुदेवच सेवा करून घेत आहेत’, याची मला अनुभूती आली. ‘भगवंताने आधीच या सेवेचे पूर्वनियोजन करून ठेवले आहे’, हे माझ्या लक्षात आले.
गुरुदेवांनीच माझ्याकडून ही सेवा करून घेतली, याबद्दल त्यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !’
(सर्व सूत्रांसाठी दिनांक ४.६.२०२३)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |