‘ऑनलाईन’ साप्ताहिक सत्संगामुळे साधकांमध्ये झालेले पालट, त्यांना झालेले लाभ आणि आलेल्या अनुभूती
१. सौ. सुचेता वर्दे, कुडाळ, जिल्हा सिंधुदुर्ग.
१ अ. झालेले पालट
१ अ १. नामजप, प्रार्थना आणि कृतज्ञता व्यक्त करणे : ‘मी कुलदेवी आणि दत्त यांचा नियमित प्रत्येकी एक घंटा नामजप करत आहे. तेव्हा ‘देवच नामजप करून घेतो’, असा माझा भाव असतो. मी वेळोवेळी प्रार्थना आणि कृतज्ञता व्यक्त करते. ‘देवा, तूच मार्ग दाखव आणि अडथळे दूर करण्यास मला साहाय्य कर’, अशी मी आर्ततेने प्रार्थना करते.
१ अ २. गणेशोत्सवाच्या वेळी सर्व सेवा आणि गणेश पूजन भावपूर्ण करणे : वर्ष २०२२ च्या गणेशोत्सवाच्या वेळी मला हरितालिका आणि गणपति यांचे पूजन भावपूर्ण करता आले. प्रत्येक सेवा करतांना देवच मला प्रार्थना आणि नामजप करण्याची आठवण करून देत होता. त्यामुळे सर्व सेवा मला भावपूर्ण करता आल्या आणि प्रत्येक कृतीला भावाची जोड देता आली.
१ अ ३. स्वभावदोष अल्प होणे : कुटुंबात आणि सभोवतालच्या अहंयुक्त वातावरणात मला गुदमरायला व्हायचे. थोडाफार ताणही असायचा. त्यामुळे सहाजिकच माझे स्वभावदोष उफाळून येत. ‘प्रतिक्रिया येणे, काही वेळा त्या व्यक्त होणे, पटकन् बोलणे’, असे माझे स्वभावदोष उफाळून येत असत. आता ‘प्रत्येक कृती ही सेवा आहे’, असा माझा भाव असतो. त्यामुळे माझा अहं अल्प होण्यास साहाय्य झाले. ‘ही सेवा मी करत नसून देवच माझ्याकडून करून घेत आहे’, हा विचार सत्संगामुळे दृढ झाला.
१ अ ४. या सत्संगामुळे मला प्रसंगाकडे साक्षीभावाने पहाता आले. प्रत्येक गोष्ट सकारात्मक राहून करण्याचा प्रयत्न झाला.
१ अ ५. महालय श्राद्ध स्वतः करणे आणि त्याविषयी इतरांनाही सांगणे : महालय श्राद्धाच्या वेळी पुरोहित विलंबाने घरी आले, तरीही माझी चिडचिड झाली नाही. त्या वेळी यजमानांनी सनातन चैतन्यवाणीवर नामजप लावून ठेवला होता. त्यामुळे घरात शांततेने नामजप झाला. आम्हाला आनंद मिळाला. महालय श्राद्धाच्या वेळी मनाला शांती आणि आनंद मिळवून दिल्याबद्दल गुरुदेवांच्या (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या) चरणी कृतज्ञता वाटते. मी २ व्यक्तींना महालयाविषयी माहिती सांगितल्यानंतर त्या व्यक्तींनी या वर्षी महालय श्राद्ध केले.
१ अ ६. नामजपादी उपाय केल्यामुळे सकारात्मकता वाढून आनंद मिळणे, राग अल्प होणे आणि चुकीसाठी क्षमायाचना करणे : नामजपादी उपाय वेळच्या वेळी केल्याने स्वतःवरील त्रासदायक शक्तीचे आवरण जाते. त्यामुळे आनंद मिळतो आणि सकारात्मक रहाता येते. मी ‘प्रतिक्रिया येणे किंवा मध्येच बोलणे’ या स्वभावदोषावर सूचनासत्र केल्यामुळे माझे ते संस्कार अल्प झाले असून माझा राग शांत झाला आहे. मी प्रतिदिन रात्री माझ्याकडून झालेल्या ज्ञात-अज्ञात चुकांसाठी क्षमायाचना करते.
२. श्रीमती शीतल प्रभुकेळूसकर (वय ६२ वर्षे), जिल्हा रत्नागिरी
२ अ. झालेले पालट
२ अ १. ‘ऑनलाईन’ सत्संग चालू होण्यापूर्वी मी ७ – ८ घंटे दूरदर्शनवर मालिका बघण्यात वेळ घालवायचे. आता ते पूर्णपणे बंद झाले आहे.
२ अ २. सारणी लिखाण करणे आणि स्वयंसूचना घेतल्याने स्वभावात पालट होणे : सत्संगामध्ये स्वभावदोष दूर करण्यासाठी ‘सारणी लिखाण करणे आणि स्वयंसूचना घेणे’, याविषयी समजल्यानंतर मी तसे करू लागले. त्यामुळे माझी चिडचिड उणावली आणि आवड-नावड अल्प झाली. मी आज्ञापालन करण्याचा प्रयत्न करते. माझ्याकडून सेवा परिपूर्ण करण्यासाठी प्रयत्न होऊ लागल्यामुळे मला पुष्कळ आनंद मिळतो. पूर्वी मुले वेळेवर उठली नाहीत किंवा त्यांनी आपली कामे केली नाहीत, तर माझी चिडचिड व्हायची. आता स्वयंसूचना दिल्यामुळे माझी चिडचिड होत नाही.
२ आ. संगणकीय सेवा शिकून घेणे : मी ‘ऑनलाईन’ करण्याच्या सेवा शिकून घेतल्या आणि त्या करण्याचा प्रयत्न करत आहे. मी ‘सोशल मीडिया’च्या (सामाजिक माध्यमाच्या) सेवेमध्ये सहभाग घेते.
२ इ. माझे प्रत्येक कामासाठी दुसर्यावर अवलंबून रहाणे अल्प झाले आहे. मी प्रत्येक क्षण सत्मध्ये रहाण्याचा प्रयत्न करते.
२ ई. स्वयंसूचना घेतल्यामुळे प्रत्येक काम वेळच्या वेळी करणे आणि त्यातून आनंद मिळणे, तसेच सहनशीलता वाढणे : मी भांडी घासणे, केर काढणे, अशी कामे वेळच्या वेळी करण्याचा कंटाळा करायचे. त्यामुळे कामे वाढत जाऊन नंतर ती करतांना माझी चिडचिड व्हायची. यासाठी मी स्वयंसूचनांची सत्रे केल्यावर आता प्रत्येक काम वेळच्या वेळी केले जाते. त्यातून मला आनंद मिळतो आणि माझा वेळही वाचतो. माझी चिडचिड होत नाही. स्वयंसूचना दिल्यामुळे सहनशीलता वाढली आहे. भावनाशीलता आणि भित्रेपणा अल्प झाला. पूर्ण दिवस सत्मध्ये आणि वर्तमानकाळात रहाण्याचा प्रयत्न केल्यामुळे आनंद मिळतो.
२ उ. आलेल्या अनुभूती
२ उ १. आधुनिक वैद्यांच्या औषधोपचाराने बरा न होणारा अर्धशिशीचा त्रास सत्संगामुळे दूर होणे : ‘मला अर्धशिशीचा त्रास व्हायचा. अनेक आधुनिक वैद्यांच्या औषधोपचाराने त्रास ठीक होत नव्हता. आठवड्यातून १ – २ वेळा मला डोकेदुखीच्या गोळ्या घ्याव्या लागायच्या. सत्संगात जाऊ लागल्यापासून आता अर्धशिशीचा त्रास दूर झाला आहे.
२ उ २. पूर्वी मला भीतीदायक स्वप्ने पडायची. ती ‘श्री गुरुदेव दत्त ।’ या नामजपामुळे पूर्णपणे बंद झाली आहेत.
२ उ ३. परात्पर गुरु डॉक्टरांच्या कृपेने अस्थिभंग झालेला पाय लवकर ठीक होणे : दीड वर्षापूर्वी माझ्या पायाचा अस्थीभंग झाला होता. त्या वेळी आधुनिक वैद्यांनी ‘हाड जुळायला ५ – ६ मास लागतील’, असे सांगितले होते; पण प.पू. गुरुदेवांची (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांची) कृपा आणि सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी अस्थीभंगावर सांगितलेला ‘श्री गणेशाय नमः। श्री हनुमते नमः । श्री हनुमते नमः । ॐ नमः शिवाय । ॐ नमः शिवाय ।’हा नामजप यांमुळे ३ मासांत माझा पाय बरा झाला. त्यानंतर मला कोरोनाही झाला होता. तोही औषधोपचार आणि कोरोना प्रतिबंधक नामजप केल्याने गुरुदेवांच्याच कृपेने लवकर बरा झाला. मला रुग्णालयात भरती व्हावे लागले नाही.
३. सौ. संजीवनी लवेकर (वय ५६ वर्षे), जामसंडे, जिल्हा सिंधुदुर्ग.
३ अ. घरातून विरोध असतांनाही सत्संग ऐकणे आणि हळूहळू विरोध मावळणे : ‘माझ्या साधनेला घरातून यजमानांचा प्रचंड विरोध आहे, तरीही त्यावर मात करण्यासाठी मी भ्रमणभाषवर सत्संग ऐकते; मात्र आता ‘गुरुकृपेने घरातील वातावरणात पालट होत आहे. मी भ्रमणभाषवर सत्संग ऐकत असतांना यजमानांनी ‘केवळ काय ऐकतेस ?’, असे विचारून विषय सोडून दिला. घरात वास्तूछत (घराच्या भिंतींवर देवतांच्या सात्त्विक नामपट्ट्या लावणे) लावलेले पाहूनही यजमान काही बोलले नाहीत.
४. सौ. सुचिता आंबेरकर यांना आलेली अनुभूती
४ अ. सतत ८ – १० दिवस स्वप्नामध्ये संत घरी येत असल्याचे दिसणे आणि त्यानंतर प्रत्यक्षात सद्गुरु स्वाती खाडये अन् सद्गुरु सत्यवान कदम घरी येणे : मला सतत ८ – १० दिवस पहाटे स्वप्न पडत होते. त्या स्वप्नात ‘संत मार्गावरून जात आहेत, ते आपल्या फाटकापर्यंत आले आहेत किंवा ते ‘त्यांच्या घरी जाऊया’, असे म्हणत आहेत’, असे मला दिसत असे. काही वेळा ‘सगळे संत एकत्रित नामजपाला बसले आहेत’, असे स्वप्न प्रतिदिन पडत होते. त्यानंतर एक दिवस सद्गुरु स्वाती खाडये आणि सद्गुरु सत्यवान कदम हे दोघेही आमच्या घरी आले. त्यामुळे मला गुरुदेवांप्रती (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्याप्रती) पुष्कळ कृतज्ञता वाटली.’
(सर्व सूत्रांचा दिनांक १.२.२०२३)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |