धर्म आणि विज्ञान यांच्या समन्वयातून समाज अन् देश यांचा उद्धार शक्य ! – गोव्याचे राज्यपाल पी. एस्. श्रीधरन् पिल्लई
ताळगाव (गोवा) येथे ‘इस्रो’च्या ‘राष्ट्रीय अवकाश विज्ञान परिषदे’चे उद्घाटन
पणजी, २६ फेब्रुवारी (वार्ता.) : ‘यतो धर्मस्ततो जयः।’ म्हणजे ‘जेथे धर्म आहे, तेथे विजय आहे’, अशी शिकवण रामायण आणि महाभारत यांमधून मिळते. सनातन धर्म आणि धार्मिक ग्रंथ यांमध्येही विज्ञान आहे. धर्म आणि विज्ञान यांच्या समन्वयातून समाज अन् देश यांचा उद्धार शक्य आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्रशासन विज्ञानाला सर्वाेच्च प्राधान्य देते, असे विचार गोव्याचे राज्यपाल पी.एस्. श्रीधरन पिल्लई यांनी व्यक्त केले.
ताळगाव येथील डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी मैदानात ‘भारतीय अवकाश संशोधन संस्थे’च्या (इस्रोच्या) ‘राष्ट्रीय अवकाश विज्ञान परिषदे’च्या उद्घाटनप्रसंगी राज्यपाल पिल्लई बोलत होते. या कार्यक्रमाला जलस्रोतमंत्री सुभाष शिरोडकर, ‘इस्रो’चे अध्यक्ष डॉ. एस्. सोमनाथ, ‘इस्रो’चे माजी अध्यक्ष ए.एस्. किरण कुमार अन् गोवा विद्यापिठाचे कुलगुरु, तसेच आयोजन समितीचे साहाय्यक प्रा. हरिलाल मेनन यांची उपस्थिती होती.
राज्यपाल पी.एस्. श्रीधरन् पिल्लई पुढे म्हणाले, ‘‘भारतीय समाज सनातन धर्म, इस्लामी धर्मग्रंथ किंवा येशू ख्रिस्ताची शिकवण अशा सर्व चांगल्या विचारांचे स्वागत करतो.’’ मंत्री सुभाष शिरोडकर म्हणाले, ‘‘चंद्रयानासारख्या विविध मोहिमांमुळे भारत अवकाश तंत्रज्ञान क्षेत्रात जगात अग्रेसर झालेला आहे.’’
National Space Science Symposium (NSSS) 2024
(सौजन्य : Prudent Media Goa)
अवकाश मोहिमेला लागणारा खर्च आणि त्याची आवश्यकता पटवून देणे हे मोठे आव्हान ! – ‘इस्रो’चे अध्यक्ष डॉ. एस्. सोमनाथ
इस्रो’चे अध्यक्ष डॉ. एस्. सोमनाथ या वेळी म्हणाले, ‘‘वैज्ञानिक प्रकल्प आणि अवकाश मोहीम यांच्यावर कोट्यवधी रुपये खर्च होत असतात. वैज्ञानिक प्रकल्पांवर पुष्कळ काम केले जाते; मात्र याची सामान्य लोकांना माहिती नसते. अवकाश मोहिमांवर होणारा खर्च काही वेळा काही जणांना अनावश्यक केलेला खर्च वाटत असतो. अवकाश मोहिमेला लागणारा खर्च आणि त्याची आवश्यकता पटवून देणे हे मोठे आव्हान आहे.’’
१ मार्चपर्यंत चालणार्या या परिषदेत व्याख्याने, प्रदर्शन आणि वैज्ञानिकांसह संवाद आदी कार्यक्रम होणार आहेत. परिषदेमध्ये देशातील अनेक वैज्ञानिक, उद्योगिक संस्थांचे अिधकारी आणि विद्यार्थी सहभागी झाले आहेत. राष्ट्रीय अवकाश विज्ञान परिषदेचे रवींद्र भवन, सांखळी आणि राजीव गांधी कला मंदिर, फोंडा येथेही कार्यक्रम होणार आहेत.