अंतरवाली सराटी येथे साखळी उपोषण चालूच रहाणार !
आंदोलनकर्ते मनोज जरांगे यांचे ‘आमरण उपोषण’ स्थगित !
जालना – मराठा समाजाचे आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी ‘आमरण उपोषण’ मागे घेण्याची घोषणा केली आहे. ‘आधुनिक वैद्यांच्या समुपदेशानुसार आपण हे उपोषण मागे घेत आहे; पण अंतरवाली सराटी येथील साखळी उपोषण यापुढेही चालू राहील’, असे त्यांनी स्पष्ट केले. जरांगे यांनी ‘२ दिवसांत आपली पुढील दिशा ठरवणार आहे’, असे पत्रकारांशी बोलतांना घोषित केले.
समाजबांधवांच्या मागणीनुसार १७ व्या दिवशी ‘आमरण उपोषण’ स्थगित करून साखळी उपोषण चालू केले जाणार आहे. संचारबंदीमुळे नागरिकांना अंतरवाली सराटी येथे येता येत नाही. त्यामुळे मी राज्यातील गावागावात जाऊन समाजबांधवांशी संवाद साधणार आहे. सगेसोयर्यांची कार्यवाही होईपर्यंत आपण मागे हटणार नाही, असे जरांगे पाटील यांनी सांगितले.
‘दम होता तर आम्हाला येऊ द्यायचे ना.’ फडणवीस यांच्या विरोधात प्रचंड अप्रसन्नता आहे. देवेंद्र फडणवीस यांना आता सुटी देणार नाही. फडणवीस यांच्याविना जिल्हाधिकारीही संचारबंदीचा आदेश काढू शकत नाहीत, अशी आक्रमक भूमिका जरांगे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलतांना घेतली आहे. मनोज जरांगे अंतरवाली सराटी येथे आल्यानंतर त्यांनी तेथे उपस्थित मराठा बांधवांना घरी परतण्याचे आवाहन केले. शांततेत धरणे आंदोलन चालू ठेवा. परिस्थिती पाहून ‘शहाणी भूमिका’ घ्यावी लागेल, एकाही मराठ्याला त्रास झाला नाही पाहिजे. संचारबंदी उठल्यावर अंतरवाली येथे यावे, असे आवाहन मनोज जरांगे यांनी केले.
जरांगे यांच्या सहकार्यांची पोलिसांकडून धरपकड चालू !
आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबई येथे निघालेल्या मनोज जरांगे यांच्या विरोधात पोलिसांनी कारवाईला प्रारंभ केला आहे. पोलिसांकडून मनोज जरांगे यांच्या सहकार्यांची धरपकड चालू झाली आहे. २५ फेब्रुवारीच्या रात्री पोलिसांनी मनोज जरांगे यांच्या सहकार्यांसह एकूण ५ लोकांना कह्यात घेतले आहे.
अंबड येथे संचारबंदीचे आदेश !
२५ फेब्रुवारी या दिवशी मनोज जरांगे पाटील आक्रमक झाले आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप केल्यानंतर थेट मुंबईच्या दिशेने निघाले होते. याच पार्श्वभूमीवर जालना जिल्हा प्रशासनाने अंबड तालुक्यात थेट संचारबंदी लागू करण्याचे आदेश काढले आहेत. त्यामुळे या परिसरात मराठा आंदोलकांना मनाई आहे. मनोज जरांगे यांनी पोलिसांना त्रास देऊ नका, असे आवाहन केले आहे, तसेच आम्हाला मुंबई येथे जाऊ द्यायचे नाही; म्हणून संचारबंदी लावली आहे. संचारबंदी लावण्याचे कारण काय ? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे.