संपादकीय : पुरुषार्थाचे अधःपतन !
काम, क्रोध, लोभ, मोह, मद आणि मत्सर हे षड्रिपू मनुष्याला अशांत करतात. शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक स्तरांवर या रिपूंमुळे व्यक्तीची मोठी हानी होत असते. या रिपूंचे दमन केल्याविना, त्यावर नियंत्रण किंवा विजय मिळवल्याविना मनुष्याला शांतता लाभत नाही, हे वास्तव आहे. बुद्धीच्या स्तरावर या रिपूंवर काही प्रमाणात नियंत्रण ठेवता येते; मात्र साधनेद्वारे यांवर विजय मिळवता येते, अन्यथा यांवर विजय मिळवणे संघर्षाचेच ठरते. यातही या रिपूंमध्ये ‘काम’ हा पहिल्या क्रमांकावर आहे आणि तो साधनेच्या स्तरावर विचार करता शेवटीच नष्ट होऊ शकतो. कामामुळे महर्षि विश्वामित्र यांची साधना भंग झाली, हे सर्वांत मोठे उदाहरण हिंदूंसमोर आहे. या व्यतिरिक्त कामामुळे महाभारत घडले, हेही आपण पाहिले आहे. कामावर नियंत्रण मिळवण्यासाठी कठोर तप करणेच आवश्यक ठरते. अध्यात्मानुसार जेव्हा साधना करणार्याला अद्वैताची स्थिती अनुभवायला येते, तेव्हाच त्याचा काम नष्ट होत असतो; कारण तेव्हा द्वैत शेष रहात नाही. भगवान शंकराने कामदेवाला तिसरे नेत्र उघडून जाळून भस्मसात् केले होते. ती शक्ती भगवान शिवाकडेच आहे. हिंदु धर्मानुसार कामावर नियंत्रण मिळवण्याचे मार्ग सांगितलेले आहेत; मात्र सध्याच्या काळात भारत ‘धर्मनिरपेक्ष देश’ झाल्याने आणि देशात अन्य धर्मीयही रहात असल्याने हे मार्ग समाजाला शिकवणे शक्य नाही. त्यामुळे आजची स्थिती निर्माण झाली आहे, असे म्हटल्यास चुकीचे ठरू नये. कामाचा प्रभाव इतका वाढला आहे की, ४ पुरुषार्थ म्हणजे धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष यांच्यापैकी सध्या अर्थ अन् काम यांचाच विचार केला जात असून लोक त्या विचारांनी वागत आहेत, असे दिसते. धर्माचा अभाव असल्यामुळे अर्थ आणि काम यांच्या अतिरेकामुळे अनैतिकता प्रचंड प्रमाणात वाढली आहे अन् ती समाजाला अधोगतीकडे नेत आहे. यावर कायद्याद्वारे कितीही बंधने आणली, तरी त्यावर नियंत्रण मिळवणे कठीण होत आहे. याचे प्रत्यक्ष उदाहरण, म्हणजे भारतात वर्ष २०१७ ते २०२२ या कालावधीत पोलीस कोठडीत बलात्काराचे २७० हून अधिक गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. गुन्हे समाजात होतात आणि ते करणार्या आरोपींना अटक करून पोलीस कोठडीत टाकले जाते अन् कोठडीत गुन्हेगारी कृत्य होत नाही, असे नाही, हे यातून लक्षात येते. काही दिवसांपूर्वीच कारागृहात शिक्षा भोगणार्या महिला बंदीवान गर्भवती राहिल्याच्या प्रकरणी न्यायालयात याचिका प्रविष्ट करण्यात आल्याची बातमी प्रसिद्ध झाली होती. ‘महिला बंदीवानांच्या ठिकाणी पुरुष कर्मचार्यांना प्रवेश देऊ नये’, अशी यात मागणी करण्यात आली आहे. याचाच अर्थ असा की, ज्यांच्यावर नैतिकतेचे रक्षण करण्याचे अन् कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचे दायित्व आहे, तेच असे कृत्य करत आहेत. त्यातही केवळ पुरुषांकडूनच लैंगिक सुख मिळवण्याचा प्रयत्न केला जातो, असे म्हणता येणार नाही, तर महिलाही त्यासाठी प्रयत्न करत असतात. यातून कामाचा प्रभाव लक्षात येतो. कामावर विजय मिळवणार्या श्री हनुमानाचे उदाहरण लक्षात घेतले पाहिजे. माता सीतेला लंकेत शोधण्यासाठी गेलेल्या हनुमानाला रावणाच्या अंतःपुरात अनेक महिला विवस्त्र झोपलेल्या दिसल्या होत्या. या दृश्याचा श्री हनुमानावर कोणताही परिणाम झाला नाही. श्री हनुमानाच्या या गुणाचा आदर्श भारतातीलच लोक घेत नाहीत, ही गोष्ट लज्जास्पद आहे. जेव्हा रक्षकच भक्षक बनतो, तेव्हा दाद कुणाकडे मागायची ? असा प्रश्न समाजाला पडतो. अशा वेळी छत्रपती शिवाजी महाराज यांची आठवण येते. त्यांनी रांझाच्या पाटलाचे एका महिलेवर अत्याचार केल्याच्या गुन्ह्यावरून हात-पाय तोडले होते. इस्लामी शरीयत कायद्यानुसारही अशा प्रकारच्या शिक्षा दिल्या जातात; मात्र भारतात हा कायदा लागू नाही. असे असतांना बलात्कारासारखे गुन्हे थांबतात, असेही दिसत नाही; मात्र त्यावर काही प्रमाणात नियंत्रण ठेवता येते.
अश्लीलतेचा सुळसुळाट
समाजाच्या नीती-नियमांचे पालन करून पुरुषार्थ करणे योग्य मानले जाते. यासंदर्भात मुलांवर लहानपणापासून योग्य संस्कार करण्यासह समाजही संस्कारित करणे, हे पालक आणि शासनकर्ते यांचे काम असते. ते जर होत नसेल, तर भारतात काही प्रमाणात जी स्थिती निर्माण झाली आहे, तशी स्थिती निर्माण होते. गेल्या काही वर्षांत भारतात बलात्काराच्या घटनांमध्ये प्रचंड प्रमाणात वाढ झाली आहे, हे कुणीही नाकारणार नाही. याला केवळ संस्कार न होणे इतकेच कारण नाही, तर समाजव्यवस्थेमध्ये जे काही घडत आहे, त्याचाही यात मोठा वाटा आहे. आज विज्ञानयुगात आधुनिकता अाणि पुरोगामीत्व यांच्या नावाखाली काही बंधने झुगारून देण्यात येत आहेत. त्याचाच हा परिणाम आहे. अश्लीलतेचा सुळसुळाट झाला आहे. ‘हे अभिव्यक्तीस्वातंत्र्य आहे’, असे सांगत पाश्चात्त्यांचे अंधानुकरण केले जात आहे. यामुळे मनावर प्रचंड मोठा परिणाम होत आहे. त्यातून केवळ शहर नाही, तर खेड्यापाड्यांपर्यंत बलात्काराच्या घटना घडू लागल्या आहेत. काही घटनांच्याच तक्रारी पोलीस ठाण्यापर्यंत पोचतात त्याच्याहून अधिक तक्रारीच केल्या जात नसल्याने त्याच्या नोंदीच होऊ शकत नाहीत, असेही म्हटले जात आहे.
कठोर होणे आवश्यक !
भारताच्या इतिहासात मोगल आणि इंग्रज येण्यापूर्वी कुणावर तरी बलात्कार झाला, असे उदाहरण सापडत नाही. भारतियांची मानसिकता दुराचारी होण्याची स्थिती यानंतर चालू झाली आहे. ही मानसिकता सुधारण्यासाठी कठोर प्रयत्न करावे लागणार आहेत. ‘द्रष्टा दृश्यवशात् बद्ध: दृश्याभावात् विमुच्यते ।’ (योगवासिष्ठ, प्रकरण ३, सर्ग १, श्लोक २२) (अर्थ : द्रष्टा दृश्य पाहिल्याने त्यात बद्ध होऊन जातो. दृश्याचा अभाव असेल, तर तो त्यापासून मुक्त होतो.) या श्लोकाचा विचार करून प्रयत्न करणे आवश्यक ठरणार आहे. समाजात वासना उद्दीपित करणारी जी काही दृश्ये लोकांसमोर निर्माण झाली आहेत, ती कठोरपणे बंद करावी लागणार आहेत. उदाहरण सांगायचे झाल्यास ‘अल्ट बालाजी’वर दाखवण्यात येत असलेल्या एका मालिकेत कुटुंबातील एका पुरुष पात्राचे घरातील आजी, सावत्र आई, चुलत बहीण, वहिनी यांच्यासमवेत अनैतिक संबंध असल्याचे दाखवले आहे, तसेच दुसर्या एका मालिकेत सासू आणि जावई यांचे अनैतिक संबंध दाखवले आहेत. ही सर्व दृश्ये अत्यंत अश्लील असून ते ‘अश्लील (पॉर्न)’ या श्रेणीत मोडतात. अशा मालिकांच्या प्रसारणावर कायमची बंदी घालायला हवी. अशा साहित्याची निर्मिती करणार्यांनाही कठोर शिक्षा करायला हवी. त्यानंतर समाजाला साधना शिकवून ती करवून घ्यावी लागेल आणि त्याला समांतर म्हणजे बलात्कार्यांना कठोर अन् प्रसंगी फाशीचीही शिक्षा करावी लागणार आहे. काही देशांमध्ये तर बलात्कार्यांना नपुंसक करण्याची शिक्षा देण्यात येत आहे, याचाही विचार करता येऊ शकतो. या प्रयत्नांमुळे काही कालावधीतच याचा योग्य परिणाम दिसून येईल. असे झाले, तर आणि तरच यावर मात करता येऊ शकते.
बलात्कार सारख्या समस्यांवर कठोर उपाययोजना करण्यासाठी शासनकर्त्यांनी प्रयत्न करणे आवश्यक ! |