हिंदु राष्ट्र स्थापनेच्या दृष्टीने सनातन संस्थेचे कार्य अत्यंत प्रभावी ! – अखिल भारतीय धर्मसंघ पिठाधीश्वर श्री श्री १००८ श्री शंकर देव चैतन्य ब्रह्मचारी महाराज
प्रयागराज (उत्तरप्रदेश) येथील माघमेळ्यात सनातन संस्था आयोजित ग्रंथप्रदर्शनास विविध संत आणि मान्यवर यांची भेट !
प्रयागराज – भारतातील प्रत्येक हिंदूने सनातन संस्थेच्या कार्यात सहभागी होणे आवश्यक आहे. हिंदु राष्ट्र स्थापनेच्या दृष्टीने सनातन संस्थेचे कार्य अत्यंत प्रभावी आहे. सनातन संस्थेचे कार्य लवकरच भारतातील कानाकोपर्यात पोचेल, असा आशीर्वाद वाराणसी येथील अखिल भारतीय धर्मसंघ पिठाधीश्वर श्री श्री १००८ श्री शंकर देव चैतन्य ब्रह्मचारी महाराज यांनी दिला. प्रयागराज येथील माघमेळ्यात सनातन संस्थेच्या वतीने अध्यात्म, हिंदु राष्ट्र आणि धर्मशिक्षण यांच्याशी संबंधित ग्रंथप्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. या ग्रंथप्रदर्शनाला अखिल भारतीय धर्मसंघ पिठाधीश्वर श्री श्री १००८ श्री शंकर देव चैतन्य ब्रह्मचारी महाराज यांनी भेट दिली. त्या वेळी त्यांनी संस्थेच्या साधकांना वरील आशीर्वाद दिला.
या ग्रंथप्रदर्शनाला जगद्गुरु आगमाचार्य श्री रमेश योगी महाराज, पंचनामीदास आखाड्याचे स्वामी वीरेंद्र दास महाराज आदी संत, तसेच ‘दिव्य सेवा प्रेम मिशन’चे श्री. आशिष गौतम, मध्यप्रदेश येथील रावतपुरा सरकार, इंडोनेशिया येथील हिंदुत्वनिष्ठ श्री. धर्मयशा, अलाहाबाद उच्च न्यायालयाचे ‘गंगा विषया’चे ‘न्यायमित्र’ अधिवक्ता अरुण कुमार गुप्ता, ‘राष्ट्रीय धर्मरक्षक संघा’चे संयोजक श्री. व्यास मुनी, ‘विश्व हिंदु परिषदे’चे गुजरात राज्य प्रमुख श्री. प्रकाश मेहता या मान्यवरांनी भेट दिली.
वैशिष्ट्यपूर्ण अभिप्राय
१. उत्तरप्रदेशमधील फतेपूर येथून ३ जिज्ञासू आले होते. सनातन संस्थेचे ग्रंथप्रदर्शन पाहून त्यांनी सांगितले, ‘‘प्रदर्शनाला भेट देऊन आमचे माघमेळ्याला येण्याचे सार्थक झाले, असे आम्हाला वाटत आहे.’’
२. उत्तरप्रदेशमधील कौशांबी आणि बलिया येथून आलेल्या काही जिज्ञासूंनी सांगितले, ‘‘आम्ही आमच्या क्षेत्रात धर्मकार्य चालू करू इच्छितो. कृपया आम्हाला दिशा द्यावी.’’