मराठी ‘एक्सप्रेशन’ला (भावनांना) इंग्रजीचा टेकू !
आज ‘मराठी भाषा गौरव दिन’ आहे. त्या निमित्ताने…
मराठी भाषिकाने ‘माझी भाषा टिकवण्याचे दायित्व माझेही आहे’, याचे भान ठेवायला हवे !
१. काळाच्या प्रवाहात माणसांसमवेतच भाषेवरही परिणाम होणे
‘भाषा हे दोन माणसांमधील संवादाचे आणि भावनांच्या अभिव्यक्तीचे प्रगत माध्यम समजले जाते. संस्कृतीच्या प्रगल्भतेची खूण, बोलणार्या माणसाच्या व्यक्तीमत्त्वाची ती महत्त्वाची ओळख असते. काळाच्या प्रवाहात माणसे अंतर्बाह्य पालटतात. विचार, आचार, पोषाख आणि राहणीमान इत्यादींमध्ये पालट घडतो. या सगळ्याचा परिणाम त्यांच्या भाषेवर होणे, ही एक नैसर्गिक क्रिया आहे.
२. मराठी भाषेला आज इंग्रजीच्या आक्रमणाची धास्ती !
वेगवेगळ्या शब्दांमधील शब्दांचा सहज स्वीकार करणार्या आमच्या मराठी भाषेला आज इंग्रजीच्या आक्रमणाची, खरे तर अतिक्रमणाची धास्ती वाटत आहे. ‘अशाने आपली शुद्ध भाषा एक दिवस मरून जाईल’, अशी भीती भाषाप्रेमींना सतावत आहे. ‘जिथे पर्याय नाही, तिथे इंग्रजी शब्दांचा वापर आपल्या बोलीभाषेत करावा; पण तिचे अतिक्रमण होऊ नये, याची काळजी घ्यावी’, असा या सर्वांच्या मताचा सारांश एका वाक्यात सांगता येईल.
३. मराठी भाषा टिकवण्याचे दायित्व प्रत्येकाचे !
‘आपल्या भाषेत होणारी भेसळ एका ठराविक मर्यादेच्या बाहेर जाऊ नये’, असे वाटत असेल, तर सर्वांना उदा. नाटककार, मालिका आणि चित्रपट यांसाठी संवादलेखन करणारे, विज्ञापने सिद्ध करणारे इत्यादींवर त्याचे दायित्व सोपवून इतरांना नामानिराळे रहाता येणार नाही. अन्य भाषेतील काही शब्द स्वीकारण्याची वृत्ती हवी आणि त्याच वेळी ‘माझी भाषा टिकवण्याचे दायित्व माझेही आहे’, याचे भानही हवे.’
– अश्विनी मयेकर
(साभार : मासिक ‘विवेक’, १३.१.२०१३)