स्वतःची प्रतिज्ञा पूर्ण करणारे चंद्रशेखर आझाद !

आज चंद्रशेखर आझाद बलीदानदिन आहे. त्या निमित्ताने विनम्र अभिवादन !

‘बनारसला संस्कृतचे अध्ययन करत असतांना वयाच्या १४ व्या वर्षीच चंद्रशेखर आझाद यांनी कायदेभंगाच्या चळवळीत भाग घेतला. ते इतके लहान होते की, त्यांना पकडण्यात आले, तेव्हा त्यांच्या हातांना हातकडीच बसेना. ब्रिटीश न्यायाने या छोट्या मुलाला १२ फटक्यांची अमानुष शिक्षा दिली. फटक्यांनी आझादांच्या मनाचा क्षोभ अधिकच वाढला आणि अहिंसेवरील त्यांचा विश्वास पार उडाला. पुढे ब्रिटीश अधिकारी साँडर्सची हत्या केल्यानंतर आझाद निरनिराळे वेश पालटून भूमिगत राहिले. काकोरी कटापासून त्यांच्या डोक्यावर फाशीची तलवार लटकत होती. तरी त्या खटल्यातील क्रांतीकारकांना सोडवण्याच्या योजनेत ते गर्क होते. ‘गांधी-आयर्वीन करार’ होत असतांना त्यांनी गांधींना असा संदेश पाठवला, ‘शब्द देऊन भगतसिंह इत्यादींची सुटका आपण करावी.’ असे झाल्यास हिंदुस्थानच्या राजकारणाला निराळे वळण लागेल; परंतु गांधींनी तो संदेश फेटाळून लावला. तरी आझाद यांनी क्रांतीकारकांना सोडवण्याचे जोरदार प्रयत्न चालू ठेवले. ‘मी जिवंतपणी ब्रिटीश सरकारच्या हाती कधीच पडणार नाही’, ही आझाद यांची प्रतिज्ञा होती.

आझाद २७ फेब्रुवारी १९३१ ला शेवटचे प्रयागच्या आल्फ्रेड पार्कमध्ये शिरले. पोलीस अधीक्षक नॉट बॉबरने तेथे येता क्षणी आझाद यांच्यावर गोळी झाडली. ती त्यांच्या मांडीस लागली; पण त्याच वेळी आझाद यांनी नॉट बॉबरवर गोळी झाडून त्याचा हातच निकामी केला. स्वतःच्या पिस्तुलात शेवटची गोळी राहिली, तेव्हा ते त्यांनी स्वतःच्या मस्तकाला टेकवले आणि चाप ओढला ! वयाच्या अवघ्या २४ व्या वर्षी आझाद यांनी भारतमातेच्या चरणी प्राणार्पण केले !’

(साभार : संकेतस्थळ)