रुग्णाईत असतांना फोंडा, गोवा येथील साधक श्री. अरविंद ठक्कर यांना आलेल्या अनुभूती
१. श्वास घ्यायला त्रास होऊ लागल्यामुळे आधुनिक वैद्यांच्या समुपदेशाने इ.सी.जी. (हृदय स्पंदन आलेख) काढणे, त्याचा अहवाल सामान्य येणे; परंतु ‘स्ट्रेस टेस्ट’चा अहवाल पाहिल्यानंतर ‘एन्जिओग्राफी’ करण्याचे ठरणे
‘नोव्हेंबर २०२३ मधे मला श्वास घ्यायला त्रास होऊ लागला. आम्ही आधुनिक वैद्यांकडे तपासणीला गेल्यावर त्यांनी ‘इ.सी.जी. (हृदय स्पंदन आलेख)’ काढण्याचा समुपदेश दिला. त्यानुसार आम्ही ‘इ.सी.जी.’काढला आणि त्याचा अहवाल ‘नॉर्मल’ (सामान्य), आला. तो अहवाल पाहूनही आधुनिक वैद्यांचे मत होते की, आम्ही एखाद्या हृदयरोगतज्ञांना दाखवावे. त्यानुसार आम्ही ४.१.२०२४ या दिवशी एका हृदयरोगतज्ञांना भेटलो. त्यांनी माझी ‘स्ट्रेस टेस्ट ’ केली. त्याचा अहवाल पाहिल्यानंतर हृदयाशी संबंधित त्रास असण्याची शक्यता असल्यामुळे त्यांनी ‘एन्जिओग्राफी ’ करण्यास सांगितले.
टीप १ – स्ट्रेस टेस्ट : ताण, चिंता, अतिश्रम इत्यादींमुळे येणारा शारीरिक, मानसिक तणाव पडताळण्यासाठी केलेली वैद्यकीय चाचणी
टीप २ – ‘एन्जिओग्राफी : हृदयाच्या रक्तवाहिन्यांमधील अडथळा शोधण्यासाठी ‘क्ष’ किरणांद्वारे केली जाणारी एक प्रकारची चाचणी
२. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या कृपेने ‘एन्जिओग्राफी’साठी जाण्यापूर्वी सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी सांगितलेले सर्व आध्यात्मिक स्तरावरील उपाय, तसेच ‘अ ३’ या पद्धतीनुसार स्वयंसूचना देणे
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या कृपेने एका नामांकित रुग्णालयातील प्रख्यात हृदयरोग तज्ञांनी मला १०.१.२०२४ या दिवशी ‘एन्जिओग्राफी’ करण्यासाठी बोलावले. या कालावधीत सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ मला वेगवेगळे न्यास करून नामजप करायला सांगत होते. त्यानुसार मी ते करत होतो. त्यांनी मला सुरक्षाकवचाकरता आणि अन्य त्रासांच्या निवारणार्थ प्रार्थना करायला सांगितले होते. ‘एन्जिओग्राफी’साठी रुग्णालयात जाण्यापूर्वी मी सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी सांगितलेले सर्व आध्यात्मिक स्तरावरील उपाय पूर्ण केले. त्याचसमवेत ‘अ ३’ (टीप ३) या पद्धतीने स्वयंसूचनाही घेतल्या होत्या. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या कृपेने मी ते दोन्ही पूर्ण करू शकलो.
(टीप ३ : स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनासाठी स्वयंसूचना देण्याच्या विविध पद्धती आहेत. त्यातील ‘अ ३’ म्हणजे प्रसंगाचा सराव करणे, ही एक पद्धत आहे.)
३. रुग्णालयातील गोंधळाच्या वातावरणात नामजप करू शकत नसल्यामुळे थोडी भीती वाटणे, तेव्हा शंखनाद ऐकून मन स्थिर होणे, एका परिचारिकेने ‘प्रल्हाद.. प्रल्हाद..’, अशा कुणाला तरी मोठ्याने हाका मारणे, तेव्हा ‘जर तुम्ही प्रल्हादासारखे झालात, तर मी नरसिंहाप्रमाणे तुमच्या रक्षणासाठी तेथे उपस्थित असेन’, असा विचार सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी देणे
१०.१.२०२४ या दिवशी रुग्णालयात गेल्यावर ‘एन्जिओग्राफी’ची पूर्वसिद्धता करण्यासाठी मला ‘जनरल वॉर्ड’मधे नेण्यात आले. आम्ही ‘वॉर्ड’मधे गेलो. तेथील वातावरण अतिशय गोंधळाचे होते. तेथील रुग्ण मोठ्याने ओरडत होते. तेथील परिचारिकाही मोठ्या आवाजात बोलत होत्या. आधुनिक वैद्यांची इकडे तिकडे धावपळ चालू होती. त्यामुळे मला आवाजाचा पुष्कळ त्रास होत होता. मी पलंगावर पहुडलो आणि नामजप करण्याचा प्रयत्न केला; परंतु मी नामजप करू शकत नव्हतो. खरे तर मला थोडी भीतीही वाटत होती. त्याच वेळी मला सतत चालू असलेला शंखनाद ऐकू आला. तेव्हा माझे मन स्थिर झाले. नंतर अकस्मात् तेथील एक परिचारिका ‘प्रल्हाद.., प्रल्हाद..’, अशी कुणाला तरी मोठ्याने हाका मारू लागली. त्याच क्षणी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी मला विचार दिला, ‘जर तुम्ही प्रल्हादासारखे झालात, तर मी नरसिंहाप्रमाणे तुमच्या रक्षणासाठी तेथे उपस्थित असेन.’ तेव्हा मला शांत वाटले. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे कनवाळू, करुणामय आणि प्रीतीयुक्त नयन मला आठवत राहिले.
४. ‘एन्जिओग्राफी’ करून घरी आल्यानंतर साधकांना होणार्या शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक त्रासांपासून रक्षण होण्यासाठी रामनाथी येथील सनातनच्या आश्रमात ‘ज्वाला नरसिंह’ यज्ञ होणार असल्याचे समजणे
‘एन्जिओग्राफी’ झाल्यानंतर त्याच रात्री आम्ही घरी परत आलो. विशेष म्हणजे १४.१.२०२४ या दिवशी महर्षींच्या आज्ञेने रामनाथी येथील सनातनच्या आश्रमात ‘ज्वाला नरसिंह’ यज्ञ होणार असल्याचे आम्हाला समजले. तो यज्ञ साधकांना होणार्या शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक त्रासांपासून त्यांचे रक्षण करण्यासाठी होणार होता. यज्ञ चालू असतांना मधल्या विश्रांतीच्या वेळेत नरसिंहाच्या महतीविषयी सांगण्यात येत होते.
साधकांच्या सर्व आशा जेव्हा संपतात, असंख्य अडथळ्यांमुळे त्यांना जेव्हा निराशा येते, तेव्हा तो भगवंतच एकमेव आधार असतो. मला आलेली अनुभूती माझ्यातील लीनता वृद्धींगत करणारी होती.
५. वर्गमित्राने आरोग्याविषयी सदिच्छेसमवेत भक्त प्रल्हाद आणि नरसिंह यांचे चित्र पाठवणे
माझ्या एका वर्गमित्राला माझ्या आजारपणाबद्दल समजले. गेल्या ४० वर्षात वर्षांत आम्ही भेटलोही नव्हतो. २.२.२०२४ या दिवशी त्याने मला ‘व्हाट्स ॲप’वर ‘लवकर बरे व्हा’, या सदिच्छेसह एक चित्र पाठवले. आश्चर्याची गोष्ट म्हणजे ते चित्र भक्त प्रल्हाद आणि नरसिंह यांचे आहे.
६. प्रार्थना
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले प्रत्येक क्षणी आम्हा साधकांची काळजी घेत असतात. तेच श्रीराम आहेत. तेच श्रीकृष्ण आहेत. ते प्रत्यक्ष श्रीविष्णु आहेत. (‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले हे श्रीविष्णूचा अंशावतार आहेत’, असे महर्षींनी जीवनाडीपट्टीत सांगितले आहे.’ – संकलक) त्यांच्या कृपाछत्राखाली असणारे आम्ही सर्व खरोखरच भाग्यवान आहोत. आम्हाला मिळालेल्या या भाग्याची जाणीव सतत आमच्या मनात जागृत राहू दे. ‘माझ्या शेवटच्या क्षणापर्यंत मला त्यांची (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांची) सेवा करता येऊ दे’, अशी त्यांच्या पावन चरणी मी शरणागतभावाने प्रार्थना करतो.’
श्री सच्चिदानंद परब्रह्म चरणार्पणमस्तु !
– श्री. अरविंद ठक्कर, फोंडा, गोवा. (२०.१.२०२४)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |