कर्करोगावरील उपचारांमध्ये भारतीय मसाले प्रभावी ! – ‘आयआयटी मद्रास’चे संशोधन
नवी देहली – ‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (आयआयटी) मद्रास’ येथील संशोधकांनी कर्करोगाच्या उपचारांसाठी भारतीय मसाल्यांच्या वापराचे ‘पेटंट’ घेतले आहे. ‘भारतीय मसाल्यांपासून सिद्ध केलेल्या ‘नॅनोमेडिसीन’मध्ये फुफ्फुस, स्तन, आतडे, ग्रीवा, तोंड आणि थायरॉईड यांच्या पेशींच्या विरोधात कर्करोगविरोधी गुण दिसून आले आहेत. सामान्य पेशींसाठी ते सुरक्षित असल्याचेही दिसून आले आहे. वर्ष २०२८ पर्यंत हे औषध बाजारात उपलब्ध होण्याची शक्यता आहे.
सध्या कर्करोगावर उपचार करणारी औषधे निर्माण करणे, हे सर्वांत मोठे आव्हान आहे. या पार्श्वभूमीवर ‘आयआयटी मद्रास’कडून प्राण्यांवरील अभ्यास अलीकडेच यशस्वीरित्या पूर्ण झाला आहे. वर्ष २०२७-२८ पर्यंत हे औषध बाजारात उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने वैद्यकीय चाचण्यांचे नियोजन केले जात आहे.
‘भारतीय मसाल्यांच्या तेलांचे औषधी लाभ शतकानुशतके ज्ञात असले, तरी त्यांच्या जैवउपलब्धतेमुळे त्यांचा वापर मर्यादित झाला आहे. कर्करोगाच्या पेशींशी सक्रीय घटक आणि त्यांच्या परस्परसंवादाच्या पद्धती ओळखण्यासाठी यांत्रिकी अभ्यास महत्त्वाचा आहे. आम्ही तो प्रयोगशाळांमध्ये चालू ठेवू. २-३ वर्षांच्या कालावधीत हे औषध बाजारात आणण्याचा विचार करत आहोत.’
– प्रा. आर्. नागराजन्, रासायनिक अभियांत्रिकी विभाग, ‘आयआयटी मद्रास’
‘पेटंट केलेले ‘भारतीय मसाले’ आधारित ‘नॅनो-फॉर्म्युलेशन औषध’ अभ्यासांद्वारे कर्करोगाच्या अनेक सामान्य प्रकारांमध्ये प्रभावी सिद्ध झाले आहे.’
– एम्. जॉयस निर्मला, मुख्य वैज्ञानिक अधिकारी, कर्करोग नॅनोमेडिसीन आणि ‘ड्रग डिझाईन’ प्रयोगशाळा, ‘आयआयटी मद्रास’
संपादकीय भूमिकाभोजन हा कोणत्याही संस्कृतीचा एक अविभाज्य घटक ! भारतीय अन्न पदार्थ पौष्टिक आणि सात्त्विक असल्याचे सर्वांना ठाऊक आहेच. त्याचे अनेक औषधी लाभही आहेत, जे काही वेळा आधुनिक वैद्यकशास्त्रातील उपचारांपेक्षाही सरस आहेत. भारतीय मसाले कर्करोगासारख्या दुर्धर आजारावर प्रभावी सिद्ध होणे, हे त्याचेच एक उदाहरण ! |