‘सर्जिकल स्ट्राईक’मध्ये ८२ आतंकवादी झाले होते ठार ! – राजेंद्र रामराव निंभोरकर, लेफ्टनंट जनरल (निवृत्त)
लेफ्टनंट जनरल (निवृत्त) राजेंद्र रामराव निंभोरकर यांनी दिली माहिती
(‘सर्जिकल स्ट्राईक’ म्हणजे शत्रूच्या सीमेत काही सैनिकांसह अचानक घुसून केवळ आतंकवादी/सैनिकी तळांवर कारवाई करून परत येणे)
नवी देहली – काश्मीरच्या उरी येथील सैन्य तळावर वर्ष २०१६ मध्ये जिहादी आतंकवाद्यांनी आक्रमण केले होते. यात काही सैनिक वीरगतीला प्राप्त झाले होते. याचा सूड घेण्यासाठी भारताने पाकव्याप्त काश्मीरमधील जिहादी आतंकवाद्यांच्या तळांवर सर्जिकल स्ट्राईक केले होते. २९ सप्टेंबर २०१६ या दिवशी झालेल्या या कारवाईत ८२ जिहादी आतंकवादी ठार झाले होते, असे या कारवाईचे प्रमुख लेफ्टनंट जनरल (निवृत्त) राजेंद्र रामराव निंभोरकर यांनी एका हिंदी दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत सांगितले. या कारवाईत भारताच्या एकाही सैनिकाला दुखापत झाली नाही. या कारवाईसाठी तत्कालीन संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी अनुमती दिली होती, असेही निंभोरकर यांनी सांगितले.
निंभोरकर यांनी कारवाईविषयी दिलेली विस्तृत माहिती !
१. पहिल्या नमाजापूर्वी करायची होती कारवाई !
आम्ही २८-२९ सप्टेंबर या दिवसाचे नियोजन केले. अमावास्येच्या रात्री २ ते पहाटे ४ वाजण्याच्या काळाची वेळ निवडली. महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण सैन्यात धर्मनिरपेक्षता प्रत्यक्षात पाळतो; मात्र ज्या आतंकवाद्यांवर कारवाई करणार होतो, ते सर्व मुसलमान होते. त्यांची पहिली नमाज पहाटे ४ वाजताच्या सुमारास होणार होती. त्यापूर्वी आम्ही कारवाईचे नियोजन केले.
२. अशा कारवायांसाठी राजकीय इच्छाशक्तीची आवश्यकता असते !
भारतात पंतप्रधानांपासून माझ्यापर्यंत केवळ १७ लोकांनाच याची माहिती होती. मेजर जनरल यांनाही हे ठाऊक नव्हते. विशेष म्हणजे आम्हाला आवश्यक शस्त्रे आणि उपकरणे ६ दिवसांत मिळाली. उत्कृष्ट रायफल, नाईट व्हिजन कॅमेरे, चांगले रेडिओ संच देण्यात आले. माझा वैयक्तिक विश्वास आहे की, भारताला इतिहासातील सर्वोत्तम संरक्षणमंत्री मिळाला असेल, तर ते मनोहर पर्रीकर होते. कारण सर्वाधिक आवश्यकता राजकीय इच्छाशक्तीची असते, ती त्या वेळी होती. २६/११ च्या मुंबईवरील आक्रमणानंतर आपण निर्णय घेतला असता, तर कदाचित् त्याचा परिणाम असाच झाला असता आणि पुढील आक्रमणे झाली नसती; कारण सर्जिकल स्ट्राईकनंतर आक्रमणे अल्प झाली.
३. आपले ३५ सैनिक या कारवाईत होते. सैनिक वीरगतीला प्राप्त झाला किंवा घायाळ झाला, तर आपण त्याला शत्रूच्या प्रदेशात सोडत नाही, हे सैन्याचे तत्त्व आहे. पाकिस्तानी सीमेच्या ९०० मीटर आतून अशा सैनिकांना परत आणण्यासाठी माणसाची आवश्यकता असते. त्यामुळे ३५ जणांना ठेवण्यात आले होते. प्रत्येक १०० मीटर अंतर कापण्यासाठी आम्हाला अडीच ते तीन घंटे लागले. कारण येथे भूसुरूंग पेरलेले असतात.
४. १० मिनिटांत आतंकवाद्यांचे गळे चिरून केले ठार !
तळावर पोचल्यावर सैनिकांनी सर्व आतंकवाद्यांचे गळे चिरले. आम्ही आमची कारवाई अवघ्या १० मिनिटांत केली. थर्मल कॅमेर्याने त्याचे चित्रीकरण करण्यात आले. १२ व्या मिनिटाला सैनिक माघारी निघाले. पहाटे ५ वाजता ते परतले. यात एकही सैनिक घायाळ झाला नाही. चित्रीकरणामध्ये २८ ते ३० मृतदेह दिसत असल्याचे समोर आले. आम्ही एकूण ८२ आतंकवाद्यांना ठार केले होते. आमच्या कोणत्याही सैनिकाला काहीही झाले नाही, ही आमच्यासाठी सर्वांत मोठी गोष्ट होती.
५. भारतीय अर्थव्यवस्था सक्षम झाली, तर चीनला पुरे पडू !
लेफ्टनंट जनरल (निवृत्त) राजेंद्र रामराव निंभोरकर म्हणाले की, सर्वप्रथम आपला शत्रू कोण आहे, ते पाहूया. पाकिस्तानपेक्षा आमची शक्ती पुष्कळ आहे. पाकला घाबरण्याची आवश्यकता नाही. उत्तरेत चीन हा शत्रू आहे. त्याची काळजी घ्यावी लागेल. डोकलाममध्ये आम्ही ३४ दिवस त्यांच्यासमोर होतो. चीनला आमची क्षमता कळली आहे. चीनची भौगोलिक स्थिती अशी आहे की, त्याला तिबेटमार्गे भारतीय सीमेवर यावे लागते. त्याला रोखण्याची क्षमता आमच्यात आहे. मोठ्या सैन्याला पैशाची आवश्यकता असते. जर आपली अर्थव्यवस्था वाढली, तर वायूदलाकडे ५० स्क्वाड्रन्स असतील. आता आम्हाला रोखणारे कुणी नाही. हे चीनला ठाऊक आहे. चीनसमवेत युद्ध झाले, तर त्याची जेवढी हानी होतील, तेवढीच आमचीही होईल. त्यासाठी आपण आर्थिकदृष्ट्या सक्षम असणे आवश्यक आहे.