SIMI Terrorist Arrested : २२ वर्षे पसार असणारा सिमीचा आतंकवादी अटकेत !

ओळख लपवून शिक्षक म्हणून करत होता काम !

आतंकवादी हनीफ शेख

नवी देहली – स्टुडंट्स इस्लामिक मूव्हमेंट ऑफ इंडियाचा (सिमी) या बंदी घालण्यात आलेल्या जिहादी आतंकवादी संघटनेचा पसार आतंकवादी हनीफ शेख याला देहली पोलिसांनी भुसावळ येथून अटक केली. तो गेली २२ वर्षे पसार होता. हनीफ अनेक मुसलमान तरुणांना आतंकवादी कारवायांचे प्रशिक्षण देत होता. तो सिमीच्या मासिकाचा संपादकही होता. हनीफ शेख वर्ष २००२ पासून पसार होता. तो भुसावळ येथे स्वतःची ओळख लपवून रहात होता. येथे एका उर्दू शाळेत शिक्षक झाला होता.

१. पोलीस उपायुक्ता आलोक कुमार यांनी सांगितले की, देशभरातील सिमीच्या अनेक घटनांमध्ये हनीफची भूमिका होती. हनीफचे नाव त्याने संपादित केलेल्या सिमी मासिकात प्रसिद्ध झाले होते. पोलिसांकडे हा एकमेव सुगावा होता. त्यामुळे त्याचा शोध घेणे कठीण झाले होते.

२. हनीफ ‘वाहदत-ए-इस्लाम’ या गटाच्या सदस्यांपैकी एक होता आणि त्याने महाराष्ट्र अन् आजूबाजूच्या राज्यांमधून संघटनेसाठी निधी उभारला होता. दानधर्माच्या नावाखाली तो पैसे गोळा करायचा.