‘शिवगर्जना’ महानाट्याला पुणेकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद !
छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयघोषात महानाट्याला उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत प्रारंभ !
पुणे – राज्याचा सांस्कृतिक कार्य विभाग आणि पुणे जिल्हा प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३५० व्या राज्याभिषेक वर्षानिमित्त ‘शिवगर्जना’ महानाट्याचे आयोजन करण्यात आले आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत महानाट्याला प्रारंभ झाला. पहिल्याच दिवशी या महानाट्याला पुणेकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या वेळी आमदार सुनील टिंगरे, विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, आमदार रामभाऊ मोझे, माजी महापौर मुरलीधर मोहोळ आदी उपस्थित होते. मुख्यमंत्री शिंदे यांचा ‘शिवगर्जना’ महानाट्याच्या आयोजनाविषयीचा संदेश ध्वनीचित्रफितीच्या माध्यमातून दाखवला.
‘शिवगर्जना’ महानाट्याचे भव्य आयोजन केले असून ते हे महानाट्य विनाशूल्क पहाता येणार आहे. जिल्हा प्रशासनाने प्रथम येणार्याला प्रथम प्राधान्य देण्याचे ठरवले असून प्रवेशिकांची आवश्यकता असणार नाही. जिल्ह्यातील सर्व नागरिक, शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण आचरणात आणून देशासाठी योगदान देण्याचे आवाहन डॉ. पुलकुंडवार यांनी उदघाटन प्रसंगी केले. ते म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याची माहिती होण्यासह त्यांच्या कार्यातून पुढच्या पिढीला प्रेरणा मिळावी, यासाठी शासनाच्या वतीने वर्षभर विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून ‘शिवगर्जना’ या महानाट्याचे आयोजन करण्यात आले आहे.
भव्य मंचावर साकारला शिवकालीन इतिहास !
मंचासमोरून जाणारे हत्ती, घोडे, उंट, मोगलांचे आक्रमण आणि चित्तथरारक अंगावर शहारे आणणार्या लढाया, सह्याद्रीचा रांगडेपणा, तळपत्या तलवारी, स्वराज्यासाठी जीवनाची आहुती देणार्या मावळ्यांचा पराक्रम आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा प्रताप जणू शिवकालीन इतिहास दौलतराव जाधव तुरुंगाधिकारी महाविद्यालयाच्या मैदानावर अवतरला. देखण्या आणि भव्य मंचावर पौर्णिमेच्या चंद्राच्या साक्षीने शिवरायांची भव्यदिव्य शौर्यगाथा ऐतिहासिक प्रसंगांद्वारे कलाकारांनी सादर केली.