मुंबई येथे अजय महाराज बारसकर यांच्यावर मराठा आंदोलकांचा आक्रमणाचा प्रयत्न !
मुंबई – मराठा आरक्षणासाठी लढणारे नेते आणि आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांच्यावर त्यांचे एकेकाळचे साथीदार अजय महाराज बारसकर यांनी गंभीर आरोप केले होते. गेल्या ३ दिवसांपासून उभयतांमध्ये जोरदार आरोप प्रत्यारोप होत आहेत. २३ फेब्रुवारीच्या रात्री ८.३० वाजता मुंबई येथील चर्चगेट परिसरात बारसकर यांच्यावर मराठा आंदोलकांनी आक्रमण करण्याचा प्रयत्न केला होता. या आक्रमणानंतर पोलिसांनी आक्रमणकर्त्यांना कह्यात घेतले असून या घटनेनंतर बारसकर यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली.
सौजन्य झी 24 तास
मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांच्यावर आरोप करणारे अजय बारसकर महाराज यांच्याविरुद्ध सकल मराठा समाजाचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. बारसकर यांच्या निषेधार्थ ठिकठिकाणी आंदोलने होत आहेत. बारसकर गेल्या काही दिवसांपासून मुंबई येथे वास्तव्याला असून ते विविध वृत्तवाहिन्यांना मुलाखती देत आहेत.
‘राज्य सरकारनेच मराठा आंदोलनात फूट पाडण्यासाठी आपल्या विरोधात सापळा लावलेला आहे. आज जे मराठा समाजातील आंदोलक आपल्यावर आरोप करत आहेत ते सरकारचे हस्तक आहेत’, असा आरोप मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे.