गोवा : (म्हणे) ‘बाहेरून येऊन तणाव निर्माण करणार्‍यांवर गुन्हे नोंद करा !’ – स्थानिक ग्रामस्थांची मागणी

  • नेसाई (गोवा) येथील शिवरायांच्या पुतळ्यावरून निर्माण झालेला वाद

  • विशेष ग्रामसभेची अनुमती नाकारली, पुढील ग्रामसभा ३ मार्चला

मडगाव, २५ फेब्रुवारी (वार्ता.) : शिवजयंतीच्या दिवशी सां-जुझे-द-आरियल (नेसाई) येथे घडलेल्या घटनांचे सखोल अन्वेषण करावे. गावाबाहेरून येऊन गावात तणाव निर्माण करणार्‍यांवर कारवाई करावी, अशी मागणी स्थानिक ग्रामस्थांनी पंचायतीकडे एका निवेदनाद्वारे केली आहे. (चोराच्या उलट्या बोंबा ! – छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे उद्घाटन करून परतत असतांना समाजकल्याणमंत्री सुभाष फळदेसाई यांच्यावर मातीचे गोळे फेऊन आक्रमण केल्याने  सां-जुझे-द-आरियल येथे तणाव निर्माण झाला. पोलिसांनी या प्रकरणी संबंधितांवर गुन्हे प्रविष्ट केलेले आहेत. गावाबाहेरील लोक गावात आल्याने तणाव निर्माण झालेला नाही ! – संपादक)


हे ही वाचा : (म्हणे) ‘दंगल घडवणार्‍यांवर नोंद केलेले गुन्हे मागे घ्या !’ – गोव्यातील काँग्रेसचे खासदार फ्रान्सिस सार्दिन


ग्रामस्थ निवेदनात पुढे म्हणतात, ‘‘गुन्हे नोंद करतांना अनधिकृतपणे जमाव जमवल्याचे कारण पुढे केले आहे; मात्र गावातील लोक हे येथे होणार्‍या अनधिकृत कामाला विरोध करण्यासाठी एकत्र आले होते. गावाबाहेरून येऊन ज्या लोकांनी बेकायदेशीर कामे केली, त्यांच्यावर कारवाई का केली नाही ? प्रशासनाने केवळ सां-जुझे-द-आरियल येथील ग्रामस्थांवरच गुन्हे नोंद केलेले आहेत.’’ सां-जुझे-द-आरियल येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा स्थानिक पंचायतीची अनुमती घेतल्याविना उभारल्याच्या प्रकरणी सां-जुझे-द-आरियल पंचायतीने २५ फेब्रुवारी या दिवशी पंचायतीची एक विशेष ग्रामसभा बोलावली होती; मात्र या ग्रामसभेला गटविकास कार्यालयाने अनुमती नाकारली आहे. यामुळे ही ग्रामसभा झाली नाही. आता ही ग्रामसभा ३ मार्च या दिवशी होणार आहे.