सरकारच्या संयमाचा अंत पाहू नये ! – मुख्यमंत्री शिंदे
मुंबई – मराठा आरक्षणासाठी आतापर्यंत ५६ हून अधिक आंदोलने झाली. तरीही कुणीही अशा प्रकारे भाषा वापरून तेढ निर्माण केली नाही. जरांगे पाटलांनी प्रत्येक वेळी वेगवेगळ्या मागण्या करूनही सरकारने संयमाने त्या ऐकून मान्य केल्या. परंतु आता आंदोलनकर्त्यांची भाषा अचानक पालटली आहे. कायदा-सुव्यवस्था बिघडवणार्यांवर सरकार कारवाई करील. त्यामुळे कुणीही सरकारच्या संयमाचा अंत पाहू नये, असे प्रतिपादन मुख्यमंत्री शिंदे यांनी केले. सह्याद्री अतिथीगृह येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
जरांगे पाटील यांचा बोलवता धनी कोण ? – उपमुख्यमंत्री फडणवीस
सागर बंगला हा सरकारी आहे. कुणीही तेथे येऊ शकते. जी भाषा उद्धव ठाकरे, शरद पवार बोलत होते, तीच भाषा आता जरांगे पाटील बोलत आहे. त्यामुळे त्यांचा बोलवता धनी कोण आहे ? याविषयी शंका आहे. मराठ्यांसाठी मी काय केले, हे लोकांसमोर आहे. कायदा-सुव्यवस्था बिघडवण्याची परिस्थिती कोणी केली, तर पोलीस कारवाई करतील.