‘पुरोहित कल्याणकारी बोर्डा’ची त्वरित स्थापना करून १०० कोटी रुपये भागभांडवल द्या ! – अखिल भारतीय पुरोहित महासंघ
कोल्हापूर – पुरोहित कल्याणकारी बोर्डाची त्वरित स्थापना करून १०० कोटी रुपये भागभांडवल द्यावे, पुरोहितांना नोंदणीकृत मंदिर, आश्रम, मठ येथे सेवा देणार्यांना किमान वेतन मिळावे, मौलानांना ज्याप्रकारे मानधन मिळते त्याप्रकारे सरकारने नोंदणीकृत मंदिरांच्या पुजार्यांना किमान २० सहस्र रुपये वेतन द्यावे, अशा आमच्या प्रमुख मागण्या आहेत, अशी माहिती ‘अखिल भारतीय पुरोहित महासंघा’च्या महाराष्ट्र राज्य विभागाच्या वतीने घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत राष्ट्रीय नेते वेदशास्त्रसंपन्न पंडित सुयश शिवपुरी यांनी २५ फेब्रुवारीला पत्रकार परिषदेत दिली.
या प्रसंगी राज्य संघटनमंत्री महामंडलेश्वर १००८ अजय शास्त्री पिंपळेगुरुजी, आचार्य नरेंद्र शास्त्री, पंडित धनसिंह सूर्यवंशी, कोल्हापूर जिल्हा सचिव वेदशास्त्री संपन्न मेघराज बुणे, जिल्हाध्यक्ष वेदशास्त्रसंपन्न मेघराज बीडकर गुरुजी उपस्थित होते.
या प्रसंगी पंडित लक्ष्मीकांत पाठक आणि राष्ट्रीय नेते पंडित लक्ष्मण आर्य यांनी मांडलेली सूत्रे
१. लोकसभा आणि विधानसभा यांमध्ये पुरोहितांना प्रतिनिधित्व द्यावे.
२. गेल्या १०० वर्षांपासून भारतात पुरोहित महासंघ कार्य करतो, तर महाराष्ट्रात पुरोहित संख्या ११ लाख आहे. त्यामुळे ६० वर्षांवरील ज्येष्ठ पुरोहितांना ६ सहस्र रुपये मासिक वेतन देण्यात यावे.
३. महाराष्ट्रात विवाह नोंदणीसाठी पुरोहितांची साक्ष विवाह संस्कार केल्याचे प्रमाण म्हणून मानण्यात येते. त्यासाठी पुरोहितांचे आधारकार्ड, छायाचित्र आणि शपथपत्र घेतले जाते. या प्रकरणात काही पुरोहित, तसेच काही लोक यजमानांना-शासनाला फसवात, अशा तक्रारी पुरोहित संघाकडे आल्या आहेत. त्यामुळे येथून पुढे प्रत्येक विवाह नोंदणीकृत होण्याच्या दृष्टीने शासन आणि प्रशासन यांच्याकडे पत्रव्यवहार चालू आहे.