देवशिल्पी विश्वकर्मा यांची विविध गुणवैशिष्ट्ये आणि त्याचे आध्यात्मिक स्तरावरील कार्य
‘माघ शुक्ल त्रयोदशी (२२.२.२०२४) या दिवशी ‘श्री विश्वकर्मा जयंती’ झाली. भारतातील समस्त शिल्पकार, मूर्तीकार, वास्तूतज्ञ, वास्तूविशारद आणि अन्य कलाकार यांच्यासाठी ‘देवशिल्पी विश्वकर्मा’ उपास्य दैवत आहे. त्यामुळे ते ‘श्री विश्वकर्मा जयंती’ आनंदाने आणि उत्साहाने साजरी करतात. २४ फेब्रुवारी या दिवशी देवशिल्पी विश्वकर्मा याची झालेली उत्पत्ती, त्रिदेवांच्या (ब्रह्मा-विष्णु-महेश या देवांच्या) उपासनेने त्याला झालेले ज्ञान आणि त्याने प्रत्येक युगात केलेले दैवी कार्य इत्यादी गोष्टी पाहिल्या. आता देवशिल्पी विश्वकर्मा याची विविध गुणवैशिष्ट्ये आणि त्याचे आध्यात्मिक स्तरावरील कार्य सविस्तररित्या जाणून घेणार आहोत.
भाग १ बघण्याकरिता येथे क्लिक करा https://sanatanprabhat.org/marathi/767571.html
(भाग २)
५. विश्वकर्मादेवाची विविध गुणवैशिष्ट्ये
५ अ. ‘देवशिल्पी’ ही उपाधी प्राप्त होणे: विश्वकर्मादेवाच्या सर्व कलाकृती चैतन्यदायी, सात्त्विक आणि दैवी असतात. तो केवळ देवता आणि काही प्रसंगी मनुष्य यांच्यासाठी वास्तू, शिल्पे इत्यादींच्या नवनिर्मितीचे कार्य करतो. त्याच्यामध्ये दैवी शिल्पकला साकारण्याची अद्भुत आणि दैवी क्षमता आहे. त्यामुळे त्याला ‘देवशिल्पी’ ही उपाधी प्राप्त झाली आहे.
५ आ. देवशिल्पी विश्वकर्मादेवाला असलेले विविध प्रकारचे ज्ञान आणि विविध कला ! : ब्रह्मा, विष्णु आणि महेश या त्रिदेवांच्या कृपेने देवशिल्पी विश्वकर्मादेवाला मूर्तीशास्त्र, शिल्पशास्त्र, स्थापत्यशास्त्र, वास्तूशास्त्र यांच्या ज्ञानासह विविध शस्त्रास्त्रे, यंत्रे, विमाने इत्यादींचे दिव्य ज्ञान आहे. त्यामुळे त्याच्या सर्वच कलाकृती चैतन्याने संपृक्त आणि परिपूर्णतेने युक्त असतात. त्याला चित्रकला, शिल्पकला, वास्तूकला, हस्तकला, मूर्तीकला इत्यादी विविध दैवी कला प्राप्त आहेत. त्यामुळे त्याने प्राचीन शिल्पकला आणि सात्त्विक वास्तूशास्त्र यांची निर्मिती केली आहे. त्याने साकार केलेल्या सर्वच कलाकृती अतिशय सुबक, सात्त्विक, मनमोहक, चैतन्यदायी, नाविन्यपूर्ण आणि दैवी असतात.
५ इ. स्वर्गलोकातील उपलोकात निवासस्थान किंवा लोक असणे : स्वर्गलोकातील इंद्राच्या अमरावतीपासून कुबेराच्या अलकापुरीच्या दिशेने जाणार्या मार्गावर उत्तर दिशेला देवशिल्पी विश्वकर्माचे निवासस्थान किंवा लोक आहे.
६. श्री विश्वकर्मादेवाने कलियुगामध्ये केलेले दैवी कार्य !
६ अ. श्री विश्वकर्मादेवाने भारताच्या संदर्भात केलेले नवननिर्मितीचे कार्य !
६ अ १. श्री रामलल्लाचे मंदिर स्थापन करणे : पृथ्वीवर प्रभु श्रीरामाची जन्मभूमी असणार्या अयोध्यानगरीत ‘सोनपुरा’ नावाच्या शिल्पकारांच्या माध्यमातून प्रभु श्रीरामाचे भव्य मंदिर निर्माण केले.
६ अ २. श्री रामलल्लाच्या मूर्तीची निर्मिती करणे : श्री. अरुण योगीराज या मूर्तीकाराच्या माध्यमातून ५ वर्षे वयाच्या प्रभु श्रीरामाच्या सुंदर आणि सात्त्विक मूर्तीची निर्मिती केली.
६ अ ३. उत्कृष्ट शिल्पकला आणि कोरीवकाम असणार्या अनेक मंदिरांची निर्मिती करणे : त्याने भारतातील कर्नाटक राज्यातील बेलूर येथील ‘श्री चन्नकेशव मंदिर’, हळेबीड येथील ‘शिवाचे मंदिर’, महाराष्ट्रातील वेरूळ येथील एकाच खडकात कोरलेले ‘कैलास लेणे’ (मंदिर), ओडिशा राज्यातील कोणार्क येथील ‘सूर्यमंदिर’ इत्यादी अनेक भव्य मंदिरांची निर्मिती करून त्यांच्यावर सुंदर कोरीवकाम करून उत्कृष्ट शिल्पकलेची उदाहरणे समोर ठेवली आहेत.
६ अ ४. श्री जगन्नाथाच्या भव्य आणि दिव्य मूर्ती अन् रथाची निर्मिती करणे : देवशिल्पी विश्वकर्माने श्री जगन्नाथपुरी येथील श्री जगन्नाथ, श्री बलराम आणि सुभद्रादेवी यांच्या सुंदर लाकडी मूर्ती बनवल्या आहेत. तसेच श्री विश्वकर्म्याच्या प्रेरणेने श्री जगन्नाथाचा भव्य आणि दिव्य रथ निर्माण केला जातो.
६ आ. सनातन संस्थेच्या दैवी कार्यात देवशिल्पी विश्वकर्मादेवाकडून मिळालेली प्रेरणा !
६ आ १. सनातनच्या साधकाच्या माध्यमातून श्री गणेशाच्या ‘धूम्रकेतु’ अवताराचे प्रतीक असणारी मूर्ती साकारणे : विश्वकर्मादेवाने सनातनचे साधक श्री. गुरुदास खंडेपारकर यांच्या माध्यमातून कलियुगातील श्री गणेशाच्या अवताराचे प्रतीक असलेली ‘धूम्रकेतु’ नावाच्या श्री गणेशाची श्वेत रंगाची सुंदर, सात्त्विक आणि चैतन्यदायी मूर्ती निर्माण केली आहे.
६ आ २. सनातनच्या रामनाथी आश्रमात विविध देवतांची मंदिरे निर्माण करणे : विश्वकर्मादेवाने रामनाथी येथील सनातनच्या आश्रमाच्या आवारात बांधकाम क्षेत्रातील साधकांच्या माध्यमातून श्री दक्षिणमुखी हनुमान आणि श्री त्रिनेत्र गणेश अन् श्री तनोटमाता यांच्या सुंदर मंदिरांची निर्मिती केली आहे. या मंदिरांकडे दुरून पाहूनच साधक आणि आश्रम पहाण्यासाठी आलेले जिज्ञासू यांचा भाव जागृत होतो.
६ आ ३. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या ब्रह्मोत्सवासाठी सोनेरी रंगाचा रथ सिद्ध करणे : ११.५.२०२३ या दिवशी गोव्यात झालेल्या सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या ब्रह्मोत्सवासाठी सोनेरी रंगाचा सुंदर रथ सिद्ध करण्यात आला होता. देवशिल्पी विश्वकर्मादेवाच्या प्रेरणेमुळे आणि त्यांनी केलेल्या सूक्ष्मातील मार्गदर्शनामुळे हा सुंदर रथ सिद्ध झाला.
७. देवशिल्पीच्या चरणी अर्पिते कृतज्ञतेची भावसुमनांजली !
विश्वकर्माने केली त्रिदेवांची अनन्य भक्ती ।
त्रिदेवांच्या कृपेने लाभली त्यास दैवी शक्ती ।। १ ।।
विश्वकर्मा देव निर्मितो सुंदर कलाकृती ।
सदैव स्मरणात रहाते त्या कलाकृतींची स्मृती ।। २ ।।
त्याने केली सुंदर मंदिरांची निर्मिती ।
देवताही करतात त्याच्या कलेची स्तुती ।। ३ ।।
विश्वकर्मा घडवतो अत्यंत मनमोहक मूर्ती ।
त्याच्या कलाकृतीसम नसे अन्य प्रतिकृती ।। ४ ।।
दैवी शिल्पांकडे पाहून होते आनंदाची प्राप्ती ।
म्हणून ‘देवशिल्पी’ नावाने असे त्याची त्रिभुवनात कीर्ती’ ।। ५ ।।
– सुश्री (कु.) मधुरा भोसले (आध्यात्मिक पातळी ६५ टक्के, सूक्ष्मातून मिळालेले ज्ञान), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१७.११.२०२३) (समाप्त)
सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात. |