प्रत्येक साधकाच्या सूक्ष्म परीक्षणात भिन्नता असण्याची कारणे आणि त्यातून मिळणारा आनंद
१. साधकांची सूक्ष्मातील जाणण्याची क्षमता निरनिराळी असल्याने सूक्ष्म परीक्षणात भिन्नता येत असणे
‘एखाद्या घटनेचे सूक्ष्म परीक्षण करतांना बर्याचदा परीक्षण करणार्या साधकांच्या परीक्षणात भिन्नता येत असे. प्रत्येकाचे परीक्षण निराळे असे; परंतु त्याचा मतीतार्थ मात्र एकच असे. परात्पर गुरु डॉक्टरांना ‘आमच्या परीक्षणात भिन्नता का येते ?’, असे विचारल्यानंतर त्यांनी सांगितले, ‘‘सूक्ष्म जगाची व्याप्ती बरीच असल्याने मानवाला हे जग सूक्ष्म दृष्टीने पहाण्यात मर्यादा येतात. प्रत्येक जण आपापल्या सूक्ष्मातील जाणण्याच्या क्षमतेप्रमाणे परीक्षण करत असतो.’’ परात्पर गुरु डॉक्टरांनी हा दृष्टीकोन समजावण्यासाठी आम्हाला एक उदाहरण दिले, ‘‘समजा तुम्हा साधकांना एखाद्या खोलीचे परीक्षण करण्यास सांगितले, तर एक साधक म्हणेल की, खोलीत पंखा, कपाट, स्टूल आहे, तर दुसरा साधक म्हणेल की, खोलीत शीतकपाट, सोफा आणि दूरदर्शन संचही आहे. दोघांचे परीक्षण भिन्न असले, तरी ते चुकीचे नाही. दोघेही आपापल्या परीने बरोबरच आहेत. सूक्ष्म परीक्षण करतांना कुणाला काय दिसेल ? काय जाणवेल ? हे आपल्याला सांगता येत नाही. तो साधक त्या घटनेतील कोणत्या गोष्टीशी एकरूप होतो, यावर ते अवलंबून आहे. एखादा साधक खोलीतील शीतकपाटाच्या स्पंदनांशी एकरूप झाला आणि त्या त्या गोष्टीत अधिक एकाग्रतेने खोल खोल जाऊ लागला, तर त्याला त्या शीतकपाटात ठेवलेल्या वस्तूही दिसू लागतात. तुम्ही त्या त्या वेळी कोणत्या गोष्टीशी एकरूप होता, त्यावर तुमच्या सूक्ष्म परीक्षणाची भाषा आणि त्या घटनेचे केलेले सविस्तर विवरण अवलंबून असते. ते प्रत्येकाचे निराळे असू शकते. पुढे पुढे साधना वाढली की, एकाच वेळी घटनेतील अनेक गोष्टी कळू लागतात आणि सूक्ष्म परीक्षण विस्ताराने होऊ लागते.’’ अशा प्रकारे परात्पर गुरु डॉक्टरांनी आमच्यापुढे प्रत्येक साधकाच्या सूक्ष्म परीक्षण करण्यातील भिन्नतेचे रहस्य उलगडून सांगितले.
२. सूक्ष्म परीक्षण करतांना अधिकाधिक चिंतन आणि प्रार्थना करू लागल्याने सेवा करतांना आनंद मिळणे
यामुळे आम्ही एखाद्या घटनेचे सूक्ष्म परीक्षण करतांना त्याविषयी अधिकाधिक चिंतन करून, ईश्वराला प्रार्थना करून अधिकाधिक जाणून घेण्याचा प्रयत्न करू लागलो. त्यामुळे आम्हाला ही सेवा करतांना निराळाच आनंद मिळू लागला. हा आनंद सूक्ष्म परीक्षणातील व्यापकतेचा होता, यात शंका नाही.’
– श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ, चेन्नई, तमिळनाडू. (६.२.२०२२)
सूक्ष्म-जगत् : जे स्थूल पंचज्ञानेंद्रियांना (नाक, जीभ, डोळे, त्वचा आणि कान यांना) कळत नाही; परंतु ज्याच्या अस्तित्वाचे ज्ञान साधना करणार्याला होते, त्याला ‘सूक्ष्म-जगत्’ असे संबोधतात.
सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात. सूक्ष्म-परीक्षण : एखाद्या घटनेविषयी किंवा प्रक्रियेविषयी चित्ताला (अंतर्मनाला) जे जाणवते, त्याला ‘सूक्ष्म-परीक्षण’ म्हणतात. |