RajyaSabha Criminal Politicians : राज्यसभेच्या ३६ टक्के उमेदवारांची गुन्हेगारी पार्श्‍वभूमी !

नवी देहली : देशातील १६ राज्यांतील राज्यसभेच्या रिक्त होणार्‍या ५६ जागांसाठी २७ फेब्रुवारी या दिवशी निवडणूक होणार आहे. यांतील ४१ जणांची बिनविरोध निवडही झाली आहे. या निवडणुकीत उभे असणार्‍या ५९ उमेदवारांपैकी ३६ टक्के उमेदवारांवर गुन्हेगारीचे आरोप आहेत. पैकी १७ टक्के उमेदवारांना गंभीर गुन्हेगारी आरोप असून एका उमेदवारावर खुनाचा प्रयत्न केल्याशी संबंधित खटला प्रविष्ट (दाखल) आहे.

राज्यसभा

यात भाजपचे ८, तर काँग्रेसचे ६ उमेदवार आहेत. असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स (ए.डी.आर्.) या संस्थेने हा अहवाल दिला आहे. राज्यसभेच्या निवडणुकीसाठी अर्ज भरतांना उमेदवारांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्राचे विश्‍लेषण केल्यावर ही माहिती मिळाली आहे.

ए.डी.आर्.च्या अहवालातून हेही स्पष्ट झाले आहे की, २१ टक्के उमेदवारांकडे  १०० कोटी रुपयांहून अधिक संपत्ती आहे. हिमाचल प्रदेशमधील काँग्रेस उमेदवार अभिषेक मनू सिंघवी यांची एकूण संपत्ती १ सहस्र ८७२ कोटी, तर उत्तरप्रदेशमधील समाजवादी पार्टीच्या उमेदवार जया अमिताभ बच्चन यांची संपत्ती १ सहस्र ५७८ कोटी रुपये आहे. जनता दल (धर्मनिरपेक्ष) पक्षाचे कर्नाटकातील उमेदवार कुपेंद्र रेड्डी यांची संपत्ती ८१७ कोटी रुपये आहे. विशेष म्हणजे सर्वांत ‘गरीब’ उमेदवार म्हणून भाजपचे बालयोगी उमेश नाथ असून त्यांच्याकडे ‘केवळ’ ४७ लाख रुपयांची संपत्ती आहे.

संपादकीय भूमिका

  • भारतात निवडणूक लढवणार्‍या उमेदवारावर गुन्हा नसणे म्हणजे उमेदवारीसाठी पात्र नसणे, असेच समजण्यात येते !