रशियाच्या सैन्यात भरती झालेल्या भारतीय तरुणाचा युक्रेनच्या क्षेपणास्त्राच्या आक्रमणात मृत्यू
मॉस्को (रशिया) – रशियामध्ये क्षेपणास्त्राच्या आक्रमणात सुरत जिल्ह्यातील रहिवासी हेमिल अश्विनभाई मांगुकिया या २३ वर्षीय भारतियाचा २१ फेब्रुवारी या दिवशी मृत्यू झाला. हा तरुण रशियाच्या सैन्यात सुरक्षा साहाय्यक म्हणून रुजू झाला होता. मृत तरुणाला रशिया-युक्रेन सीमेवरील डोनेस्तक भागात तैनात करण्यात आले होते. आक्रमण झाले, तेव्हा त्याला गोळीबार करण्याचे प्रशिक्षण दिले जात होते. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या अधिकार्यांनी सांगितले की, या घटनेविषयी अद्यापपर्यंत त्यांना माहिती देण्यात आलेली नाही.
सौजन्य न्यूज नेशन
हेमिल डिसेंबर २०२३ मध्ये रशियाला गेला होता आणि नंतर तो रशियाच्या सैन्यात सहभागी झाला होता. या महिन्याच्या आरंभी हॅमिलच्या वडिलांनी भारतीय वाणिज्य दूतावासाला पत्र लिहून त्याला घरी आणण्यासाठी साहाय्य मागितले होते.
भारतातून १०० तरुण रशियाच्या सैन्यात भरती
एका अहवालानुसार १०० हून अधिक भारतीय तरुण रशियाच्या सैन्यात भरती झाले आहेत. यांपैकी बहुतेकांना सुरक्षा साहाय्यक म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. भारतीय परराष्ट्र मंत्रालयानेही गेल्या आठवड्यात सांगितले होते की, रशियाच्या सैन्याला साहाय्य करणार्या भारतीय नागरिकांना तातडीने बाहेर काढण्यासाठी चर्चा चालू आहे.