Eating With NO FORKS : विदेशात हाताने भोजन करण्याच्या पद्धतीत वाढ !
नवी देहली – उपाहारगृहांमध्ये हाताने भोजन करण्याविषयी बहुतेक लोक संकोच करतात. पाश्चात्त्य देशांमध्ये हाताने भोजन करण्याला स्वच्छ किंवा ‘हायजेनिक’ समजले जात नाही; परंतु आता अमेरिकेमध्ये हाताने भोजन ग्रहण करण्याचे समर्थन करण्यात येत आहे. न्यूयॉर्कचे अनेक उपाहारगृहे हाताने खाण्याच्या परंपरेला प्रोत्साहन देत आहेत. तेथील ‘जिपनी’ आणि ‘नक्स’ उपाहारगृहांमध्ये काटे आणि चमचे दिले जात नाहीत. उपाहारगृहांनी या निर्णयामागे हाताने भोजन ग्रहण करण्याचे अनेक लाभ सांगितले आहेत.
सौजन्य : झी बिझीनेस
हाताने भोजन ग्रहण केल्यास तृप्तीची भावना वाढते !
तज्ञांच्या मते हाताने भोजन करतांना लोक अल्प सेवन करतात. तसेच हाताने भोजन ग्रहण करतांना हात, डोळे आणि बुद्धी एका लयीत काम करतात. हात आणि डोळे पदार्थाचे तापमान अन् स्वरूप समजण्यास साहाय्य करतात. या संपूर्ण प्रक्रियेच्या वेळी आपले शरीर चमत्कारिक पद्धतीने काम करते आणि पचनक्रिया उत्तम होते.
‘ऑक्सफर्ड’ विश्वविद्यालयाच्या तज्ञांच्या मते, हाताने भोजन ग्रहण करणारे लोक मनापासून भोजन करतात आणि भोजनाशी समरस होतात. त्यामुळे तृप्तीची भावना वाढते. काटे आणि चमचे आपल्याला खर्या अनुभवापासून दूर ठेवतात; कारण आपण भोजनाची चव थेट हाताने अनुभवू शकत नाही.
हाताने भोजन ग्रहण करण्यामागील आध्यात्मिक लाभ !
योगशास्त्रानुसार मानवाच्या हाताची ५ बोटे, म्हणजे अंगठा, तर्जनी, मध्यमा, अनामिका आणि करंगळी ही बोटे अनुक्रमे आकाश, वायु, तेज, आप आणि पृथ्वी या पंचतत्त्वांचे प्रतिनिधित्व करतात. हाताने अन्न ग्रहण करतांना आपण हाताची पाचही बोटे जुळवून अन्नाचा घास तोंडात घेतो, तेव्हा बोटांच्या माध्यमातून पंचतत्त्वांची शक्ती (चैतन्य) मिळते.
संपादकीय भूमिकाहिंदु संस्कृतीतील प्रत्येक आचरणामागे आध्यात्मिक कारण आहे. याचे महत्त्व पाश्चात्त्यांना जेव्हा समजेल, तेव्हा ते नक्कीच पालन करतील, हे यातून लक्षात येते ! विशेष म्हणजे यानंतरच पाश्चात्त्यांचे अंधानुकरण करणारे भारतीय स्वतःच्या संस्कृतीचे पालन करू लागतील ! |