५ वर्षांच्या मुलाने शाळेजवळील दारूचे दुकान हटवण्यासाठी उच्च न्यायालयात प्रविष्ट (दाखल) केली जनहित याचिका !
कानपूर (उत्तरप्रदेश) येथील घटना !
कानपूर (उत्तरप्रदेश) – येथील एका ५ वर्षांच्या मुलाने अलाहाबाद उच्च न्यायालयात जनहित याचिका प्रविष्ट (दाखल) करून शाळेच्या शेजारी असणारे दारूचे दुकान हटवण्याची मागणी केली आहे. या याचिकेत म्हटले आहे की, येथे लोक दारू पितात. यानंतर ते शिवीगाळ करतात आणि आपसात भांडतात. त्यामुळे मुलांच्या मनावर विपरीत परिणाम होतो.
सौजन्य एबीपी गंगा
१. या याचिकेवरील सुनावणीच्या वेळी जिल्हा उत्पादन शुल्क विभागाने न्यायालयाला सांगितले, ‘दारूचे दुकान ३० वर्षे जुने आहे आणि ही शाळा वर्ष २०१९ मध्ये चालू झाली.’ (असे होते, तर या शाळेला अनुमती कशी मिळाली ? त्या वेळी प्रशासनाला हा नियम ठाऊक नव्हता का ? – संपादक) यावर न्यायालयाने या विभागाला विचारले, ‘येथे शाळा चालू झाल्यानंतर दुकानाच्या परवान्याचे नूतनीकरण कसे होत राहिले ?’ आता या प्रकरणाची सुनावणी १३ मार्च या दिवशी होणार आहे.
२. रतन सदन आझाद नगर येथे रहाणारे अधिवक्ता प्रसून दीक्षित यांचा मुलगा येथील एम्.आर्. जयपूरिया शाळेत शिशूवर्गात शिकत आहे. त्याने प्रविष्ट केलेल्या याचिकेवर अधिवक्ता आशुतोष शर्मा खटला लढवत आहेत. त्यांनी सांगितले की, कोणत्याही शाळेपासून ५० मीटर अंतरावर दारूचे दुकान उघडण्याचा नियम आहे; मात्र हे दारूचे दुकान शाळेपासून ३० मीटरच्या आत आहे. सकाळी ७ च्या सुमारास दुकान लवकर उघडते. दुकानाजवळील दारू पिणारे लोक एकमेकांना शिवीगाळ करतात. या संदर्भात जिल्हाधिकार्यांकडे तक्रार करण्यात आली. या तक्रारीवर कोणतीही कारवाई झाली नाही.
संपादकीय भूमिकाएका ५ वर्षांच्या मुलाला अशी याचिका प्रविष्ट का करावी लागते ? प्रशासनाला ते कळत का नाही ? |