दैवी बालकांच्या जन्मकुंडल्यांमध्ये अध्यात्माच्या दृष्टीने उत्तम ग्रहयोग असण्यामागील कारणमीमांसा !
‘दैवी बालकांच्या जन्मकुंडल्यांतील आध्यात्मिक ग्रहयोगांचा अभ्यास करणे’, हा प्रस्तुत संशोधनाचा उद्देश आहे. हे संशोधन ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’च्या ज्योतिष विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. १८ फेब्रुवारी या दिवशी प्रसिद्ध झालेल्या लेखात आपण ‘दैवी बालक म्हणजे काय ? आणि दैवी बालकांची वैशिष्ट्ये’ वाचली. आज या लेखाचा पुढचा भाग येथे देत आहोत.
(भाग २)
भाग १ वाचण्यासाठी येथे क्लिक करा. https://sanatanprabhat.org/marathi/765880.html
४. दैवी बालकांच्या संदर्भातील ज्योतिषशास्त्रीय संशोधन
‘दैवी बालकांच्या जन्मकुंडल्यांतील आध्यात्मिक ग्रहयोगांचा अभ्यास करणे’, हा प्रस्तुत संशोधनाचा उद्देश आहे. त्यासाठी महर्लाेकातून जन्म घेतलेल्या १०० दैवी बालकांच्या जन्मकुंडल्यांचा अभ्यास करण्यात आला. ‘या बालकांचा जन्म महर्लाेकातून झाला आहे’, हे संतांनी सूक्ष्म परीक्षणाद्वारे जाणले आहे. ही बालके वर्ष २०१३ ते २०२३ या कालावधीत जन्मलेली आहेत. दैवी बालकांच्या जन्मकुंडल्यांची तुलना करण्यासाठी साधना करणार्या १०० साधकांच्या जन्मकुंडल्यांचाही अभ्यास करण्यात आला. या अभ्यासाचे साररूप विवेचन या संशोधनात्मक लेखात मांडण्यात आले आहे.
या विवेचनात आरंभी साधनेसाठी जन्मतः अनुकूल परिस्थिती दर्शवणार्या ग्रहयोगांचे निकष दिले आहेत. त्यानंतर १०० दैवी बालके आणि १०० साधक यांच्या जन्मकुंडल्यांत ते योग किती प्रमाणात आढळले, याची निरीक्षणे दिली आहेत आणि शेवटी संशोधनाचा निष्कर्ष मांडला आहे.
४ अ. ज्योतिषशास्त्रीय निकष : साधनेसाठी जन्मतः अनुकूल परिस्थिती दर्शवणार्या ग्रहयोगांचे निकष हे ज्योतिषशास्त्रीय नियम, तर्क आणि अनुभव यांच्या आधारे निश्चित केले आहेत. ते पुढे दिले आहेत.
४ अ १. निकष १ – धर्मस्थानांच्या स्वामींपैकी किमान २ स्वामी धर्मस्थानांमध्ये असणे : कुंडलीत १, ५ आणि ९ या स्थानांना ‘धर्मस्थाने’ म्हणतात. ही स्थाने पुढील आकृतीत दर्शवली आहेत.
या स्थानांवरून पुढील गोष्टींचा विचार होतो
कुंडलीतील १, ५, ९ या धर्मस्थानांपैकी किमान २ स्थानांचे स्वामी (टीप) हे १, ५, ९ या धर्मस्थानांमध्ये असल्यास व्यक्तीला ‘विद्या, बुद्धी आणि भाग्य’ यांच्याशी संबंधित शुभ फळे मिळतात. तिला भाग्याची साथ लाभते. तिचे प्रारब्ध सुसह्य असते. हा उत्तम स्तराचा योग आहे.
टीप – कुंडलीतील प्रत्येक स्थानात एक रास असते. त्या राशीचा एक अधिपती ग्रह असतो. त्या ग्रहाला त्या स्थानाचा स्वामी संबोधले जाते.
४ अ २. निकष २ – मोक्षस्थानांच्या स्वामींपैकी किमान २ स्वामी मोक्षस्थानांमध्ये असणे : कुंडलीत ४, ८ आणि १२ या स्थानांना ‘मोक्षस्थाने’ म्हणतात. ही स्थाने पुढील आकृतीत दर्शवली आहेत.
या स्थानांवरून पुढील गोष्टींचा विचार होतो.
कुंडलीतील ४, ८, १२ या मोक्षस्थानांपैकी किमान २ स्थानांचे स्वामी हे ४, ८, १२ या मोक्षस्थानांमध्ये असल्यास व्यक्ती त्यागी आणि समर्पणवृत्तीची असते. त्यामुळे तिची आध्यात्मिक उन्नती लवकर होते. अशी व्यक्ती सामाजिक आणि आध्यात्मिक कार्र्यांत सक्रीय असते. हा उत्तम स्तराचा योग आहे.
४ अ ३. निकष ३ – धर्मस्थानांच्या स्वामींपैकी किमान २ स्वामी मोक्षस्थानांमध्ये असणे : कुंडलीतील १, ५, ९ या धर्मस्थानांपैकी किमान २ स्थानांचे स्वामी हे ४, ८, १२ या मोक्षस्थानांमध्ये असल्यास व्यक्तीचा कल अध्यात्माकडे असतो. ती मायेपासून विरक्त असते. तसेच ती ज्ञान, सेवा, त्याग आदींकडे आकर्षित होते. हा उत्तम स्तराचा योग आहे.
४ अ ४. निकष ४ – धर्मस्थानांच्या स्वामींपैकी किमान २ स्वामींची (ग्रहांची) एकमेकांशी युती किंवा शुभयोग असणे : कुंडलीतील १, ५, ९ या धर्मस्थानांपैकी किमान २ स्थानांच्या स्वामींची (ग्रहांची) एकमेकांशी युती (टीप) किंवा शुभयोग असल्यास विद्या, बुद्धी आणि भाग्य यांसंबंधी शुभ फळे मिळतात. ही युती किंवा शुभयोग कुंडलीतील कोणत्या स्थानांत आहे, त्यावर त्यांचे फळ अवलंबून असते. त्यामुळे हा मध्यम स्तराचा योग आहे.
टीप – ज्योतिषशास्त्रात युती, म्हणजे २ किंवा त्यापेक्षा अधिक ग्रह एकाच स्थानी असणे.
४ अ ५. निकष ५ – मोक्षस्थानांच्या स्वामींपैकी किमान २ स्वामींची (ग्रहांची) एकमेकांशी युती किंवा शुभयोग असणे : कुंडलीतील ४, ८, १२ या मोक्षस्थानांपैकी किमान २ स्थानांच्या स्वामींची (ग्रहांची) एकमेकांशी युती किंवा शुभयोग असल्यास आध्यात्मिक प्रगतीच्या दृष्टीने शुभ फळे मिळतात. ही युती किंवा शुभयोग कुंडलीतील कोणत्या स्थानांत आहे, त्यावर त्यांचे फळ अवलंबून असते. त्यामुळे हा मध्यम स्तराचा योग आहे.
वर दिलेले ५ निकष एका दृष्टीक्षेपात पहाण्यासाठी पुढील सारणीत दिले आहेत.
वर दिलेल्या ५ निकषांपैकी व्यक्तीच्या जन्मकुंडलीत कोणतेही २ निकष लागू होत असल्यास त्या जन्मकुंडलीत ‘अध्यात्माच्या दृष्टीने उत्तम योग आहेत’, असे समजावे.
४ आ. अन्य निकष
४ आ १. गुरु आणि शनि यांची जन्मकुंडलीतील स्थिती चांगली असणे : गुरु ग्रह आकाशतत्त्वाशी आणि शनि ग्रह वायुतत्त्वाशी संबंधित आहे. हे दोन ग्रह आध्यात्मिक स्वरूपाचे आहेत. गुरु ग्रह ज्ञान, व्यापकत्व आणि सात्त्विकता देतो, तर शनि ग्रह विवेक, संयम अन् त्यागी वृत्ती देतो. गुरु अन् शनि यांची स्थिती चांगली असल्यास, म्हणजे जन्मकुंडलीत ते अनुकूल स्थानात, राशीत आणि मित्रग्रहांसह असल्यास ते अध्यात्मासाठी साहाय्यक ठरतात.
(क्रमशः पुढच्या रविवारी)
– श्री. राज कर्वे (ज्योतिष विशारद) आणि श्री. यशवंत कणगलेकर (ज्योतिष विशारद), महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा. (५.१.२०२४)
ज्योतिषांसाठी टीप – वर दिलेल्या ५ ज्योतिषशास्त्रीय निकषांप्रमाणे जर धर्मस्थाने आणि मोक्षस्थाने यांच्या स्वामींची स्थिती कुंडलीत असेल; पण त्याच वेळी ते स्वामी जर शत्रूग्रहासोबत असतील, तर शुभ फळांमध्ये कमतरता येईल, उदा. कुंडलीत रवि-शनि, चंद्र-शनि, बुध-मंगळ, शनि-मंगळ, राहू-मंगळ, शनि-केतू, गुरु-केतू इत्यादी प्रकारच्या अशुभ युत्या असतील, तर व्यक्तीला अशुभ फळे मिळतील. |