‘सीआयडी’ चौकशीसाठी २७ फेब्रुवारीला कोल्हापूर येथे भव्य मोर्चा ! – सुनील घनवट, समन्वयक, महाराष्ट्र मंदिर महासंघ
संत बाळूमामा देवस्थानातील गैरव्यवहारांचे प्रकरण
कोल्हापूर – देशभरातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या संत बाळूमामा देवस्थानात प्रशासक नेमल्यावरही भाविकांच्या असुविधांमध्ये वाढच
झाली आहे. प्रशासक येण्यापूर्वी देवस्थानातील जे विश्वस्त दोषी आहेत, त्यांच्यावर अद्याप कसलीच कारवाई करण्यात आलेली नाही. या संदर्भात ‘सीआयडी’ (राज्य गुन्हे अन्वेषण शाखेकडून) चौकशी व्हावी अन् मंदिर भक्तांच्या कह्यात द्यावे, या मागणीसाठी कोल्हापूर जिल्ह्यातील गारगोटी, तसेच महाराष्ट्रात ठिकठिकाणी आंदोलन होऊनही त्यावर कार्यवाही झालेली नाही. भक्तांची मागणी असूनही ‘सी. आय.डी.’ चौकशी होण्यामागे दिरंगाई का ? तरी संत बाळूमामा देवस्थानातील गैरव्यवहारांच्या प्रकरणांची त्वरित ‘सीआयडी’ चौकशी व्हावी, मंदिराचे सरकारीकरण न करता मंदिर भक्तांच्या कह्यात द्यावे, या तसेच अन्य मागण्यांसाठी ‘बाळूमामा हालसिद्धनाथ सेवेकरी संस्था’, हिंदु जनजागृती समिती आणि महाराष्ट्र मंदिर महासंघ यांच्या वतीने बाळूमामांच्या भक्तांचा २७ फेब्रुवारी या दिवशी कोल्हापूर येथे ‘बाळूमामा देवस्थान संरक्षक’ मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. हा मोर्चा सकाळी ११ वाजता दसरा चौक येथून प्रारंभ होऊन व्हिनस चौक मार्गे जिल्हाधिकारी कार्यालय येथे समाप्त होईल. मोर्चाच्या अंती मान्यवरांचे मार्गदर्शन होईल, अशी माहिती महाराष्ट्र मंदिर महासंघाचे समन्वयक श्री. सुनील घनवट यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.