महाराष्ट्रात मराठा समाजाच्या आंदोलनास संमिश्र प्रतिसाद !
नांदेड जिल्ह्यात तरुणाने दुचाकी पेटवली !
छत्रपती संभाजीनगर – मराठा समाजाला ‘ओबीसी’त आरक्षण देण्याच्या आग्रही मागणीसाठी मराठा समाजाचे आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी राज्यात ‘रस्ता बंद’ आंदोलनाचे आवाहन केले होते. त्यानुसार त्यांच्या या आंदोलनाला राज्यातील बहुतांश शहरांत संमिश्र प्रतिसाद मिळाला आहे. नांदेड जिल्ह्यातील उस्माननगर रस्त्यावरील सांगवी येथे मराठा आंदोलक शिवहार पाटील लोंढे या तरुणाने स्वतःची दुचाकी पेटवून देऊन राज्य सरकारच्या धोरणाचा निषेध केला. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात विविध ठिकाणी ‘रस्ता बंद’ आंदोलन करण्यात आले. शहरातील हर्सूल टी पॉईंट, जाधववाडी चौक, सिडको, पुंडलिकनगर, गजानन मंदिर चौक अशा विविध भागांत ‘रस्ता बंद’ आंदोलन करण्यात आले. राज्यभरात सकाळी १० ते दुपारी १ वाजेपर्यंत ‘रस्ता बंद’ आंदोलन करण्यात आले. ‘रस्ता बंद’ आंदोलनामुळे शहरातील वाहतूक विस्कळीत झाली आहे. ‘एक मराठा लाख मराठा’, ‘आरक्षण आमच्या हक्काचे’ अशा घोषणा आंदोलकांनी दिल्या.
बीड जिल्ह्यातील परळी येथे आणि धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर ‘रस्ता बंद’ आंदोलन करण्यात आले. दुसरीकडे मुंबई उच्च न्यायालयाने मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनावर भाष्य करतांना म्हटले की, आंदोलन करणे हा तुमचा अधिकार आहे; पण लोकांची गैरसोय होणार नाही याचीही काळजी घेतली पाहिजे.