नाशिक येथे आर्थिक वादातून आधुनिक वैद्यांवर प्राणघातक आक्रमण !
नाशिक – पंचवटी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या इमारतीमधील पंचवटी येथील सुयोग रुग्णालयाचे संचालक आधुनिक वैद्य कैलास राठी यांच्यावर एका तरुणाने प्राणघातक आक्रमण केले. या आक्रमणात आधुनिक वैद्य राठी गंभीर घायाळ झाले असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार चालू आहेत. ही घटना २३ फेब्रुवारीच्या रात्री ९.३० वाजता घडली. रुग्णालयाच्या जनसंपर्क अधिकारी महिलेच्या पतीने आर्थिक वादातून हे आक्रमण केल्याची माहिती पोलिसांनी दिली. सीसीटीव्हीमध्ये आरोपी आधुनिक वैद्य राठी यांच्यावर कोयत्याने अनेक वार करत असल्याचे दिसत आहे.
सौजन्य नवी मुंबई आवाज
या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात आरोपीवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या रुग्णालयात वर्ष २०२२ मध्ये रोहिणी दाते (मोरे) या जनसंपर्क अधिकारी म्हणून कामास होत्या. त्यांचा पती राजेंद्र मोरे हा वर्ष २०२२ मध्ये रुग्णालयात उपचारासाठी भरती झाला होता. तेव्हापासून संशयित मोरे हा डॉ. राठी यांच्या संपर्कात होता. ओळख वाढल्याने आधुनिक वैद्य राठी यांनी म्हसरूळ परिसरात प्लॉटचा व्यवहार केला होता. यावरून २ वर्षांपासून आर्थिक वाद चालू होता.
संपादकीय भूमिकाकुठल्याही वादातून थेट समोरच्याची हत्या करण्याची बोकाळलेली विकृती समाजाच्या अधोगतीचे निर्देशक आहे. समाजातील ही असुरक्षितता संपवण्यासाठी कडक शासनासमवेत समाजाला धर्माचरणी करणे, हाच उपाय आहे ! |