इचलकरंजीतील पंचगंगेचे प्रदूषण करणारे पशूवधगृह कायमस्वरूपी बंद करावे यासाठी २६ फेब्रुवारीला ‘कत्तलखाना हटाव-पंचगंगा बचाव’ मोर्चा !
इचलकरंजी (जिल्हा कोल्हापूर) – इचलकरंजी शहरातील ‘इचलकरंजी ॲग्रो फूड्स अँड ग्यामा एन्टरप्रायझेस’ या आस्थापनाकडून प्राण्यांच्या कातड्यावर प्रक्रिया केलेले, तसेच रक्त आणि मांसमिश्रित सांडपाणी विनाप्रक्रिया ओढ्यात सोडले जाते. या पाण्यात विषारी घटक असल्याने नागरिकांना आरोग्याच्या समस्या भेडसावत आहेत, तसेच नागरिकांना त्वचेचे विकारही होत आहेत. या संदर्भात वारंवार महापालिकेकडे, तसेच प्रदूषण मंडळाकडे तक्रार करूनही संबंधित आस्थापानास नोटिसा पाठवण्याच्या व्यतिरिक्त आजपर्यंत कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही. तरी इचलकरंजीतील हे पशूवधगृह कायमस्वरूपी बंद करावे, या मागणीसाठी सोमवार, २६ फेब्रुवारीला ‘कत्तलखाना हटाव-पंचगंगा बचाव’ मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. हा मोर्चा सकाळी ११ वाजता शिवतीर्थ (जय हिंद मंडळ) येथून प्रारंभ होईल. जनता बँकमार्गे प्रांत कार्यालय येथे त्याचा समारोप होईल, अशी माहिती समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या वतीने घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड संघटक श्री. सुनील घनवट यांनी दिली.
या प्रसंगी प.पू. संतोष-बाळ महाराज, आंतरराष्ट्रीय हिंदू परिषदेचे जिल्हामंत्री श्री. पंढरीनाथ ठाणेकर, जिल्हा विशेष संपर्कप्रमुख श्री. संतोष हत्तीकर, जिल्हा कार्याध्यक्ष श्री. दत्ता पाटील, शिवभक्त श्री. आनंदा मकोटे, हिंदु जनजागृती समितीचे श्री. शिवानंद स्वामी आणि श्री. किरण दुसे, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे श्री. प्रसाद जाधव, विश्व हिंदु परिषदेचे शहराध्यक्ष श्री. बाळासाहेब ओझा, हिंदुत्वनिष्ठ श्री. नितीन काकडे उपस्थित होते.
श्री. शिवानंद स्वामी म्हणाले ‘‘पंचगंगेचे हेच पाणी पुढे लाखो भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथे मिसळते. त्यामुळे याच पाण्याने पवित्र दत्तात्रेयांच्या पादुकांना अभिषेक होणे आणि भाविकांनी त्यात स्नान करणे यामुळे भाविकांच्या धार्मिक भावना दुखावल्या जात आहेत.’’
श्री. पंढरीनाथ ठाणेकर म्हणाले, ‘‘हे पशूवधगृह महापालिकेच्या जागेवर असून या पशूवधगृहात प्रतिदिन ३५० ते ४०० जनावरांची कत्तल केली जाते. मोठ्या प्रमाणात रक्त आणि मांसमिश्रित पाणी परिसरात पसरत असल्याने या परिसरात डास, माशा आणि इतर कीटक यांचे प्रमाण वाढल्याने नागरिकांना डेंग्यू, मलेरिया यांसारखे धोकादायक आजार होत आहेत. या ठिकाणी भटक्या कुत्र्यांनी उच्छाद केला आहे. ही कुत्री प्रतिदिन मांस खाऊन हिंसक बनली आहेत.’’
श्री. संतोष हत्तीकर म्हणाले, ‘‘संबंधित आस्थापनाकडून नियमांचे पालन होत नाही, हे स्पष्ट दिसत असतांना महापालिकेने संबंधित आस्थापनाची पाणीजोडणी तोडणे, तसेच अन्य कृती का केल्या नाहीत ? या आस्थापनास महापालिकेने केवळ एक रुपये नाममात्र दराने भूमी दिली आहे. पशूवधगृहाकडून सर्व नियमांची पायमल्ली होत असतांना त्यांच्यावर कारवाई का होत नाही ? यावरून महापालिका प्रशासन ‘इचलकरंजी ॲग्रो फूड्स अँड ग्यामा एन्टरप्रायझेस’ या आस्थापनास जाणीवपूर्वक वाचवण्याचा प्रयत्न करते, असे स्पष्ट दिसते.’’
प.पू. संतोष-बाळ महाराज म्हणाले, ‘‘इचलकरंजी ॲग्रो फूड्स अँड ग्यामा एन्टरप्रायझेस’ अशा प्रकारची पशूवधगृहे ‘ॲग्रो फूड्स’ अशी शेतीशी संबंध नसणारी नावे ठेवून शासन आणि जनता यांची फसवणूक करत आहेत. इचलकरंजी येथे प्रदूषण मंडळ ‘सायझिंग’सारख्या वस्त्रव्यवसायाशी संबंधित असणार्या आणि अनेकांचे पोट भरणार्या व्यवसायावर कारवाई करते, तर प्रदूषण करणार्या पशूवधगृहावर मात्र कारवाई करत नाही, हे कशाचे लक्षण आहे ? आजपर्यंत पशूवधगृहावर एकदाही कारवाई का करण्यात आलेली नाही ?’’
‘इचलकरंजी ॲग्रो फूड्स अँड ग्यामा एन्टरप्रायझेस’ हे आस्थापन कायमस्वरूपी बंद करण्यात यावे. या आस्थापनावर कोणतीच ठोस कृती न करता जनता, समाज यांचे आरोग्य धोक्यात आणल्याविषयी आणि पर्यावरणाची हानी केल्याविषयी सर्व संबंधित अधिकार्यांवर फौजदारी गुन्हे नोंद करावेत, या मागण्यांसाठी मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.
या पत्रकार परिषदेचे विविध १७ दैनिकांचे आणि वृत्तवाहिन्यांचे पत्रकार उपस्थित होते.