थोडक्यात..

जालना येथे मराठा आंदोलकांवर लाठीमार

धोपटेश्वर (जालना) – येथे मराठा आंदोलकांकडून रस्ता बंद आंदोलन करण्यात येत होते. या वेळी पोलीस आणि आंदोलक यांच्यामध्ये बाचाबाची झाली. या वेळी काही आंदोलकांना हुसकावण्यासाठी पोलिसांकडून सौम्य लाठीमार करण्यात आला.


दाऊदच्या नातेवाइकाची हत्या !

मुंबई – आतंकवादी दाऊद इब्राहिमच्या मुंबईतील भायखळा परिसरात रहाणार्‍या निहाल खान या नातेवाइकाची उत्तरप्रदेशमध्ये कामील खान यांने गोळ्या झाडून हत्या केली. वर्ष २०१८ पासून तळोजा येथील मध्यवर्ती कारागृहात असणारा दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकरचा हा मेहुणा होता. पळून जाऊन लग्न केल्याने त्याच्यावर नातेवाइकांचा रोष होता.


पुलावरून खाडीत उडी मारलेला तरुण बेपत्ता

डोंबिवली – माणकोली पुलावर मित्रांसमवेत चित्रफीत (रील) बनवल्यावर भिवंडी येथे रहाणार्‍या २५ वर्षांच्या रोहित मोर्या या तरुणाने अतिउत्साहाने माणकोली पुलावरून थेट खाडीत उडी मारली. बेपत्ता तरुणाचा शोध चालू आहे. तो ताणात नव्हता किंवा त्याचा कुणासमवेत वाद नव्हता, असे त्याच्या मित्रांनी सांगितले.


रायगड येथे शरद पवार यांच्या पक्षाच्या तुतारी चिन्हाचे अनावरण !

रायगड – निवडणूक आयोगाने शरद पवार गटाला दिलेल्या ‘तुतारी’ या चिन्हाचे २४ फेब्रुवारी या दिवशी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते रायगड येथे अनावरण करण्यात आले. शरद पवार यांनी पालखीतून रायगड गाठला. या वेळी खासदार सौ. सुप्रिया सुळेसह, खासदार अमोल कोल्हे, आमदार जयंत पाटील यांसह पक्षातील वरिष्ठ नेते उपस्थित आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर पक्षाचे घड्याळ हे चिन्ह अजित पवार गटाला देण्यात आले आहे. त्यानंतर शरद पवार गटाला निवडणूक आयोगाच्या वतीने नवीन ‘तुतारी’ हे पक्ष चिन्ह मिळाले आहे.