जिल्ह्यातील ‘ड्रग्ज माफियां’ ची पाळेमुळे खणून कठोर कारवाई करा ! – भाजप

प्रतीकात्मक छायाचित्र

सांगली – सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिका क्षेत्रातील कुपवाड येथे पुणे आणि सांगली पोलिसांनी कारवाई करत ३०० कोटी रुपयांचे १४० किलो अमली पदार्थ जप्त केले. सांगली-मिरज आणि परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून अमली पदार्थांची तस्करी आणि विक्री मोठ्या प्रमाणात चालू असल्याचे दिसून येत आहे. मोठ्या संख्येने तरुण या अमली पदार्थांच्या आहारी जात आहेत. यामुळे त्यांचे आणि त्यांच्या कुटुंबियांचे वाटोळे होत आहे. तरी जिल्ह्यातील ‘ड्रग्ज माफियां’ ची पाळेमुळे खणून कठोर कारवाई करावी, या मागणीचे निवेदन भाजपच्या वतीने पोलीस अधीक्षकांना देण्यात आले. (अशी मागणी का करावी लागते ? पोलिसांनी स्वत:हून अशी कारवाई करणे आवश्यक आहे. – संपादक)

या निवेदनावर भाजप पश्चिम महाराष्ट्र संघटनमंत्री मकरंद देशपांडे, शहर जिल्हाध्यक्ष प्रकाश ढंग, जिल्हा सरचिटणीस मोहन वाटवे, चैतन्य भोकरे, अजिंक्य हंबर, सुमेध ठाणेदार, अनिल रसाळ, उमेश हारगे, शाम भंडारे यांच्या स्वाक्षरी आहेत.

पोलीस अधीक्षकांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,

१. एवढ्या मोठ्या प्रमाणात अमली पदार्थ असून सांगली पोलिसांना याचा सुगावा लागत नाही, ही अतिशय खेदाची गोष्टी असून यामुळे पोलिसांची विश्वासार्हता न्यून होत आहे.

२. मिरजेतील रेल्वेस्थानक परिसरात अमली पदार्थांचे सेवन करून गुंडांचा हैदोस चालू आहे. यामुळे शहरातील नागरिक, तसेच बाहेर गावाहून आलेले प्रवासी यांना त्रास होत आहे. या गुंडांकडून अनेक वेळा प्रवाशांवर आक्रमण करून त्यांची लूटमार करण्यात आली आहे.

३. अमली पदार्थांचे सेवन केलेले अनेक गुन्हेगार अल्पवयीन असल्याचेही वेळोवेळी निष्पन्न झाले आहे. अमली पदार्थांच्या आहारी गेलेले तरूण किरकोळ कारणासाठी थेट शस्त्रात्रांचा वापर करत असल्याच्या घटना घडल्या आहेत. तरी पोलीस प्रशासनाने यात गांभीर्याने लक्ष घालून तातडीने हालचाल करावी.