शांत, संयमी आणि तळमळीने सेवा करणारे चि. संदीप ढगे अन् आनंदी, प्रेमळ आणि नियोजनकौशल्य असलेल्या चि.सौ.कां. पूनम मुळे !
चि. संदीप ढगे यांची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये
१. श्री. हिरालाल तिवारी (आध्यात्मिक पातळी ६५ टक्के, वय ५९ वर्षे), सोलापूर
१ अ. बालपणापासून साधनेचे संस्कार होणे : ‘मी चि. संदीप याचे वडील श्री. बापू ढगे यांच्या समवेत मागील २० वर्षांपासून अध्यात्मप्रसाराची सेवा करत आहे. त्यामुळे मी संदीपला लहानपणापासून ओळखतो. तो शांत, संयमी आणि मितभाषी आहे. त्यांच्या घरी साधकांचे येणे-जाणे होत असे. त्यामुळे संदीपवर नकळत साधनेचे संस्कार होऊ लागले.
१ आ. सेवेची तळमळ : तो सर्व प्रकारच्या सेवा करतो. सेवा करत असतांना त्याने त्याचे शिक्षणही पूर्ण केले. तो त्याच्या संपर्कात येणार्या व्यक्तींना साधनेविषयी सांगतो.’
चि.सौ.कां. पूनम मुळे यांची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये
१. संग्राह्य वस्तू जतन करण्याची सेवा करणारे सर्व साधक, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.
१ अ. ‘पूनम नेहमी उत्साही आणि आनंदी असते.
१ आ. काटकसरी : ती आश्रमातील संग्राह्य वस्तू जतन करण्याची सेवा करते. ती ‘पॅकिंग’साठी चिकटपट्टी (‘सेलोटेप’), तसेच पाठकोरे कागद यांचा वापर काटकसरीने करते. ती कोणतीच वस्तू वाया जाऊ देत नाही.
१ इ. प्रेमभाव : ती रुग्णाईत साधकांची काळजी घेते. त्यांना ‘काय हवे ?’, ते विचारून ती त्यांना तो पदार्थ बनवून देते किंवा तो बनवून देण्यासाठी नियोजन करते.
१ ई. पूनम सर्वांशी मिळूनमिसळून वागते.
१ उ. नियोजनकौशल्य : पूनमकडे स्वच्छतेच्या सेवेचे नियोजन करण्याची सेवा आहे. ‘एखादी सेवा कोण चांगल्या प्रकारे करील ?’, याचा ती अभ्यास करते आणि त्याप्रमाणे सेवांचे नियोजन करते. ‘सर्व साधकांना सेवा मिळेल’, याकडे तिचे लक्ष असते.
१ ऊ. परिपूर्ण सेवा करणे : पूनम पडताळणी सूची वाचून त्यानुसार सेवा करते. ‘सूचीतील सर्व सूत्रांची पूर्तता झाली ना ?’, हे ती मध्ये मध्ये पहाते. त्यामुळे तिची सेवा परिपूर्ण होते.
१ ए. ती व्यष्टी साधनेचे प्रयत्न चिकाटीने करते.
१ ऐ. चुकांच्या संदर्भात संवेदनशील असणे
१. पूनमला तिच्या चुका सांगितल्यावर ती निराश न होता स्वतःमध्ये पालट करण्याचा प्रयत्न करते.
२. ती इतरांच्या लक्षात आलेल्या चुका तत्त्वनिष्ठपणे सांगून त्यांना साधनेत साहाय्य करते.
‘आम्हा सर्व साधकांना पूनमताईकडून तिचे अनेक गुण शिकता आले’, याबद्दल आम्ही परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करतो.’
(सर्व सूत्रांचा दिनांक : ८.२.२०२४)
उखाणे
१. वृंदावनी कृष्णासंगे रास खेळे राधिका ।
…… चे नाव घेते मी हो सनातनची साधिका ।।
२. ‘जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् !’ करते जयजयकार ।
……. च्यांसह करते गुरुचरणी नमस्कार ।।
– सौ. अलकनंदा लाहोटी, सनातन आश्रम, देवद, पनवेल.
निरागसता, चिकाटी आणि ऐकण्याची वृत्ती असलेल्या चि.सौ.कां. पूनम मुळे !
‘पूनम माझी बालपणापासूनची मैत्रीण आहे. बालपणापासून आम्ही एकत्र खेळलो आहोत आणि एकत्र शिक्षणही घेतले आहे. आम्ही आमच्या जीवनातील चांगल्या किंवा कठीण प्रसंगांत एकमेकींना साथ दिली आहे. मला जाणवलेली चि. पूनम हिची गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.
१. निरागसता : पूनम लहानपणापासूनच निरागस आहे. ज्या गोष्टी तिच्या लक्षात येत नसत, त्या ती निरागसपणे विचारत असे.
२. चिकाटी : पूनम शाळा आणि महाविद्यालय यांमध्ये चिकाटीने अभ्यास करायची. ती शाळेमध्ये दिलेला अभ्यास चिकाटीने पूर्ण करूनच खेळायला यायची. त्यामुळे ती हुशार विद्यार्थिनी म्हणून ओळखली जायची. आता ती साधनेचे प्रयत्नही चिकाटीने करत आहे. तिला मिळालेली सेवा ती चिकाटीने पूर्ण करते.
३. पूनम कठीण प्रसंगांमध्येही शांत राहून उपाययोजना काढण्याकडे लक्ष देते.
४. सेवा करतांना तिच्याकडून झालेल्या चुका ती प्रामाणिकपणे स्वीकारते आणि त्या सुधारण्यासाठी प्रयत्न करते.
५. ऐकण्याची वृत्ती : पूनम शाळा आणि महाविद्यालय यांमध्ये शिक्षक जे सांगतील, ते तंतोतंत ऐकत असे. आता ती रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात आल्यावरही सेवेचे दायित्व असणार्या साधकांनी सांगितलेले सर्व ऐकते आणि त्यानुसार कृती करते.
६. पूनमने मला आतापर्यंत अनेक प्रसंगांमध्ये आध्यात्मिक दृष्टीकोन देऊन साहाय्य केले आहे.
‘ईश्वराच्या कृपेने मला पूनमसारखी आध्यात्मिक मैत्रीण मिळाली’, त्याबद्दल त्याच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !’
– कु. प्रियंका माकणीकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२०.२.२०२४)
|