परात्पर गुरु डॉक्टरांनी सूक्ष्म परीक्षणातील आणखी पुढच्या टप्प्याची, म्हणजे गुरुतत्त्वाकडून निर्गुण ईश्वरी तत्त्वाकडे जाण्याची दिलेली शिकवण !
१. परात्पर गुरु डॉक्टरांची साधकांना शिकवण्याची तळमळ पुष्कळ अधिक असल्याने त्यांची शिकवण्याची गतीही विलक्षण असणे
‘अध्यात्मात चांगले गुरु लाभणे’, हे शिष्याचे भाग्यच असते. या घोर कलियुगात आम्हा साधकांना परात्पर गुरु डॉक्टरांसारखे अवतारी गुरु लाभले, यासारखे भाग्य ते काय ? परात्पर गुरु डॉक्टरांची साधकांना शिकवण्याची तळमळ इतकी आहे की, त्यांना लगेच लगेच शिकणारे आणि तशी कृती करणारे साधक आवडतात. परात्पर गुरु डॉक्टर त्यांना विलक्षण प्रोत्साहन देतात. आजपर्यंत गुरुदेवांची साधकांना शिकवण्याची गती इतकी आहे की, या गतीबरोबर धावणे सामान्य साधकाला शक्य नाही. हे मी कित्येकदा अनुभवले आहे. अशा वेळी ‘त्यांच्या शिकवण्याच्या गतीबरोबर धावण्याचे बळ आमच्या अंगी येऊ दे आणि त्यांच्या विचारांचे आमच्या मतीला योग्य प्रकारे आकलन होऊ दे’, अशी प्रार्थना आम्ही देवाला करत असू.
२. परात्पर गुरु डॉक्टरांनी ‘कुणाच्याही देहात न अडकता निर्गुण शक्तीच्या अनुसंधानात राहिले पाहिजे’, असे शिकवणे
गुरुदेवांनी सांगितले, ‘‘या ब्रह्मांडात ईश्वरासारखे कुणी नाही. तो १०० टक्के परिपूर्ण आहे. त्याच्यापर्यंत पोचायचे असेल, तर त्या निर्गुण शक्तीच्या अनुसंधानात राहिले पाहिजे. त्याची आतापासूनच सवय करा. हा मनुष्यजन्म पुष्कळ अल्प काळाचा आहे. आपले मरण कधी आहे, ते स्वतःला ठाऊक नाही. तेव्हा ईश्वरी शक्तीला स्मरण्याचा आणि कुणाच्याही देहात न अडकण्याचा आतापासूनच प्रयत्न करा.’’ अशा प्रकारे त्यांनी आम्हाला ‘हे ईश्वरा…’ असे शब्द सांगून पुढच्या टप्प्याची प्रार्थना करण्यास शिकवले. प्रथम आम्ही त्यांनाच प्रार्थना करून सर्व कृती करत होतो.
३. परात्पर गुरु डॉक्टरांनी ‘एकाच देवतेला न मानता सर्व देवता आपल्या वाटून साधक व्यापक झाल्यास त्यांची अध्यात्मात लवकर प्रगती होते’, असे सांगणे
परात्पर गुरु डॉक्टर म्हणाले, ‘‘प्रार्थना करतांना प्रत्येकाच्या ईश्वराप्रती असलेल्या भावाचे स्वरूप वेगळे असते. ईश्वर कोणत्या ना कोणत्या रूपात साधकासमोर उभा रहातो. कधी साधकांना तो माझ्या रूपात दिसेल, तर कधी श्री गणेशाच्या, तर कधी श्रीकृष्णाच्या रूपात दिसेल ! त्या वेळी साधकाला देवतेच्या कोणत्या तत्त्वाची आवश्यकता आहे, त्या रूपात तो दिसतो किंवा मनाला जाणवतो; मात्र व्यष्टी संप्रदायात असे नसते. त्यांची एकाच देवतेवर श्रद्धा असते आणि तीच देवता त्यांच्यासाठी सर्वस्व असते. यामुळे एकप्रकारे ते त्या देवतेतच अडकतात. आपल्याला असे करायचे नाही, तर सर्वव्यापी ईश्वरासारखे व्हायचे आहे. सर्व देवता आपल्या वाटल्या पाहिजेत. समष्टी साधना करतांना असा व्यापक दृष्टीकोन ठेवला, तर त्या त्या देवतेप्रती श्रद्धा निर्माण होण्यास साहाय्य होते. आपण अशा प्रकारे व्यापक झालो की, अध्यात्मात लवकर प्रगती होते.’’
४. सनातन हा संप्रदाय नाही, तर सर्व देवतांची उपासना करायला शिकवणारा धर्म असून ‘सतत वर्तमानात रहा’ या शिकवणीतून परात्पर गुरु डॉक्टरांनी साधकांना ‘काळ’ या नावाचाच गुरु करून दिला असणे
परात्पर गुरु डॉक्टरांच्या अशा शिकवणीनंतर आमच्या परीक्षणात ‘हे ईश्वरा, आम्हाला अमुक एक शिकव’, असे शब्द येऊ लागले. पहा हं, गुरु आपल्याला लवकर लवकर कसे त्या निर्गुण तत्त्वाकडे घेऊन चालले आहेत ! सनातनचा कोणताही साधक पहा, त्याला सर्वच देवांप्रती विशेष आपुलकी वाटते. कित्येक जण आम्हाला विचारतात, ‘‘तुमच्या सनातन संप्रदायाची देवता कोणती ?’’ आम्ही त्यांना उत्तर देतो, ‘‘आमची कोणतीही विशिष्ट अशी देवता नाही. सनातन हा काही संप्रदाय नव्हे, तर तो सर्व देवतांच्या उपासनेचे महत्त्व सांगणारा धर्म आहे.’’
दत्तात्रेयांनी जसे २४ गुणगुरु केले, तसेच आमचेही आहे. वर्तमान स्थितीत आम्ही प्रत्येकाकडूनच काहीतरी शिकत असतो आणि तोच आमचा त्या काळासाठी गुरु असतो. काळालाच गुरु केले, तर सर्वव्यापक होण्यास कितीसा वेळ लागतो, हे आम्हाला ‘सतत वर्तमानात रहा’, या वाक्यातून परात्पर गुरु डॉक्टरांनी शिकवले. वेगळ्या पद्धतीने सांगायचे झाल्यास ‘सतत वर्तमानात रहा’, या शिकवणीतून परात्पर गुरु डॉक्टरांनी आम्हाला ‘काळ’ या नावाचाच गुरु करून दिला.
अशा प्रकारे परात्पर गुरु डॉक्टरांनी आमचा आध्यात्मिक प्रवास सूक्ष्म परीक्षणातून हळूहळू निर्गुण अशा ईश्वराची ओळख होण्यापर्यंतच्या टप्प्याकडे नेला.’ (क्रमश:)
– श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ, चेन्नई, तमिळनाडू. (६.२.२०२२)
|