Russian Company Defrauded Indians : ४ भारतियांना २ लाख रुपयांची नोकरी देण्याचे आमीष दाखवून नेले रशिया-युक्रेनच्या युद्धभूमीवर !
रशियाच्या एका आस्थापनाने केली फसवणूक !
मॉस्को (रशिया) – रशियाची काही आस्थापने भारतियांना फसवून रशिया-युक्रेन युद्धभूमीवर लढण्यासाठी पाठवत आहेत. उभय देशांच्या सीमेवर ४ भारतियांना युक्रेनी सैनिकांशी दोन हात करावे लागल्याची घटना नुकतीच समोर आली आहे. यांपैकी एकजण तेलंगाणातील असून अन्य तिघे कर्नाटकातील आहेत.
4 Indians duped with the promise of a high-paying job and later forced to fight in the Russia-Ukraine war !
Duped by a Russian establishment !#Ukraine️ #UkraineRussiaWar #India
Video Courtesy – @IndiaToday pic.twitter.com/OrAnYWML0m
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) February 23, 2024
एका इंग्रजी वृत्तपत्रानुसार रशियाच्या एका आस्थापनाने या भारतियांना साहाय्यक म्हणून नोकरी देण्याचे आमीष दाखवले. त्यांना २ लाख रुपये पगार दिला जाईल, असे आश्वासन दिले. त्यानंतर डिसेंबर २०२३ मध्ये त्यांना चेन्नईहून रशियाला नेण्यात आले. या वेळी त्यांच्याशी संपर्कात असलेल्या दलालाने प्रत्येकाकडून ३ लाख रुपयेही लाटले. रशियामध्ये नेल्यावर रशियाचे खासगी सैन्य असलेल्या ‘वॅगनर ग्रुप’मध्ये त्यांची भरती करण्यात आली आणि त्यांना युद्धभूमीवर नेण्यात आले.
या चार भारतियांपैकी एकाचे नाव समोर आले असून तो २२ वर्षीय महंमद सुफियान आहे. रशियाच्या एका सैनिकाच्या भ्रमणभाषवरून त्याने त्याच्या कुटुंबियांना संदेश पाठवला. त्याच्या भावाने सांगितले की, सुफियानने संदेशात लिहिले होते, ‘मी युक्रेन सीमेपासून ४० किलोमीटर दूर आहे. आम्हाला आमच्या इच्छेविरुद्ध युद्धासाठी पाठवले जात आहे. आमची फसवणूक झाली आहे. आम्हाला साहाय्य करा. आम्हाला कोणत्याही परिस्थितीत भारतात परतायचे आहे !’