‘बालभारती’चे समृद्ध ग्रंथालय सर्वसामान्यांसाठी होणार खुले !
पुणे – शालेय विद्यार्थ्यांच्या पाठ्यपुस्तकांची निर्मिती करणार्या ‘बालभारती’ या संस्थेतील भव्य ग्रंथालय आता सर्वसामान्य नागरिकांसाठी खुले करण्यात आले आहे. बालभारतीच्या या ग्रंथालयात १ लाख ६५ सहस्र पुस्तकांचा समावेश असून विद्यार्थी, शिक्षक, अभ्यासक, संशोधक यांसह सर्वसामान्य नागरिकांनाही या पुस्तक ठेव्याच्या वाचनाचा आनंद घेता येणार आहे. बालभारतीची स्थापना वर्ष १९६७ मध्ये झाली. शालेय पाठ्यपुस्तकांची निर्मिती या संस्थेच्या वतीने केली जाते. आतापर्यंत हे ग्रंथालय सर्वसामान्यांसाठी खुले करण्यात आले नव्हते; मात्र या पुस्तकांचा अधिकाधिक वापर होण्याच्या दृष्टीने हे ग्रंथालय सर्वांसाठी खुले करण्याचा निर्णय घेण्यात आला. बालभारतीच्या वर्धापनदिनाच्या औचित्याने शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांच्या हस्ते ग्रंथालय खुले करण्यात आले.
बालभारतीमध्ये अभ्यासक्रम सिद्ध करण्यासाठीचे संदर्भ ग्रंथ, पुस्तके असलेले भव्य ग्रंथालय आहे. त्यात अनेक मौल्यवान पुस्तके आहेत. विद्यार्थी, अभ्यासक, शिक्षक, संशोधक, तसेच सर्वसामान्य नागरिकांना या ग्रंथालयाचा वापर करता येणार आहे. ग्रंथालयातील ग्रंथ दुर्मिळ असल्याने सध्यातरी ते घरी नेण्याची सुविधा उपलब्ध नाही. दिवसाला २० रुपये शुल्क आकारले जाणार आहे. सोमवार ते शुक्रवार (सुटीचे दिवस वगळून) कार्यालयीन वेळेत ग्रंथालय खुले रहाणार आहे. त्यामुळे या ग्रंथालयाचा अधिकाधिक नागरिकांनी लाभ घेतला पाहिजे, असे आवाहन शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांनी केले.