‘हिंदु धर्मच सर्व जगाला मार्गदर्शन करील’, असे म्हटले जाते, ते कशाच्या आधारावर ?
प.पू. स्वामी वरदानंद भारती यांचे धर्माविषयी अमूल्य मार्गदर्शन असणारी लेखमाला !
या प्रश्नाचे अगदी थोडक्यात उत्तर म्हणजे हिंदु धर्माच्या अंगभूत सद़्गुणांमुळे, वैचारिक उंचीमुळे तो जगाला मार्गदर्शन करू शकतो. तथापि सामान्य भूमिका समजून घेण्यासाठी काही विचार केला पाहिजे. आपल्या धर्माचे पूर्वी कोणतेही विशेषनाम नव्हते. पुढे सुसंस्कृत, म्हणजे आर्यलोकांचा धर्म म्हणून त्याचे नाव ‘आर्य धर्म’ असे होते. ‘वेदोऽखिलो धर्ममूलम् ।’ (मनुस्मृति, अध्याय २, श्लोक ६), म्हणजे ‘वेद हे धर्माचे मूळ आहे.’ या वचनामुळे पुढे त्याला ‘वैदिक धर्म’ म्हटले जाऊ लागले. या धर्माचे स्वरूप देश- काल-परिस्थिती निरपेक्ष आणि नित्यनूतन असे असल्याने त्याला ‘सनातन धर्म’ असे म्हटले जाऊ लागले. तौलनिकदृष्ट्या हिंदु हे संबोधन अलिकडचे आहे.
१. हिंदु धर्माची व्याप्ती ही अखिल मानवजातीसाठी !
हिंदु धर्माची व्याप्ती ही मानवी समाजासाठी आहे. त्यामध्ये व्यक्ती जीवनातील सर्व बारकाव्यांचा विचार करून उत्तम, आदर्श घटकांच्या प्राप्तीसाठी काय केले पाहिजे, याचे विधीनिषेध ठरवले गेले. यामध्ये समाज अथवा राष्ट्र या पातळीवरील विकासासाठी व्यक्तीच्या, व्यक्तीस्वातंत्र्याच्या नेमक्या मर्यादा निश्चित केल्या गेल्या आहेत. कोणत्याही पातळीवर, कोणत्याही प्रकारचा दुराग्रह नाही. समन्वय आणि सामान्यांच्या सामान्य क्षमतांची सूक्ष्म जाणीव ठेवलेली दिसते. ज्या घटकांना विशेष अधिकार दिले आहेत, त्यांना विशेष कर्तव्येही सांगितली आहेत. यातील सिद्धांत अमान्य करणार्याविषयी कुठेही द्वेषाची वा शत्रुत्वाची भावना अल्पांशानेही दिसत नाही.
२. हिंदु धर्मात जगाला मार्गदर्शन करण्यासाठीचे अनेक सिद्धांत आणि सद़्गुण
न्याय, समानता आणि बंधुत्व या संकल्पना खर्या अर्थाने जपणारे सिद्धांत स्वीकारले आहेत. अशा अनेक गोष्टी सप्रमाण दाखवता येऊ शकतात. ज्याने गुन्हा केला नाही, त्याला दंड होता कामा नये आणि ज्याने गुन्हा केला आहे त्याला दंड झालाच पाहिजे. एखादा गुन्हा होतो आणि गुन्हेगार सापडत नाही, हे शासन व्यवस्थेचे अपयश मानले गेले होते. एखाद्या भुकेलेल्या माणसाने अन्नाची चोरी केली, तर त्याला पातक न सांगता राजाला ते पातक सांगितले आहे; कारण राज्यात कुणी भुकेला रहातो, हे त्या राजाचे पाप आहे. अशा प्रकारचे अनेक सिद्धांत सांगता येतील. या सद़्गुणांमुळे हिंदु धर्म जगाला मार्गदर्शन करू शकतो.
– प.पू. स्वामी वरदानंद भारती
(साभार : ‘जिज्ञासा’ ग्रंथ, श्रीवरदानंद प्रतिष्ठान, श्री क्षेत्र पंढरपूर, १९९८)