कुपवाड एम्.आय.डी.सी.तून ३०० कोटी रुपयांचे अमली पदार्थ जप्त !
पुणे – पुणे, कुरकुंभ आणि देहली यानंतर आता सांगली जिल्ह्यातून अमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत. पुणे पोलिसांनी गेल्या ३ दिवसांत केलेल्या कारवाईत आतापर्यंत साडेतीन सहस्र कोटी रुपयांचे मेफेड्रोन म्हणजेच एम्.डी. जप्त केले आहे. २१ फेब्रुवारीला सांगली जिल्ह्यात कुपवाड एम्.आय.डी.सी.मध्ये ३०० कोटी रुपयांचे १० किलो एम्.डी. जप्त करण्यात आले आहे. याशिवाय अजून ५० किलो एम्.डी.चा शोध चालू असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. या प्रकरणी आयुब मकानदार आणि अन्य दोघे यांना अटक करण्यात आली आहे. पुणे क्राईम ब्रँच पोलिसांनी सांगली पोलिसांच्या सहकार्याने कारवाई केली आहे. सर्व कारवायांमध्ये एकूण ८ जणांना कह्यात घेण्यात आले असून पोलिसांकडून त्यांची चौकशी चालू आहे. राज्याबाहेरील कारवायांसाठी आवश्यकता वाटल्यास केंद्रातील यंत्रणांचे साहाय्य घेतले जाईल, असे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितले.
पुण्यातून टेम्पोमधून काही पिशव्या कुपवाडमध्ये आल्याची माहिती पुणे गुन्हे शाखेला मिळाली होती. आरोपी आयुब मकानदार याने कुपवाडमध्ये खोली भाड्याने घेऊन गोण्या ठेवल्या होत्या. आयुब मकानदार हा यापूर्वी अमली पदार्थ प्रकरणी येरवडा कारागृहात शिक्षा भोगत असतांना आयुब याची पुण्यात अन्य संशयितांशी ओळख झाली. त्यातूनच तो अमली पदार्थ पुरवठा करण्याचे काम करत होता.