सनातनच्या ३६ व्या (व्यष्टी) संत पू. (कै.) श्रीमती शालिनी नेने यांनी सांगितलेले पूर्वीच्या मुलींचे सुसंस्कार, त्यांचे सात्त्विक आचरण आणि त्या करत असलेले धर्माचरण
‘श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी पू. नेनेआजींचे वय ९५ वर्षे असतांना त्यांच्याशी केलेल्या वार्तालापामध्ये पू. आजींनी उलगडलेले पूर्वीच्या मुलींवरील सुसंस्कार, मोठ्यांना आदर देणारे वर्तन, त्या वेळची शिस्तबद्धता, धार्मिक आचरण करणारे आणि स्वतःतील ‘स्त्रीपण’ जपणारे ‘सोवळ्यातील’ आचरण आजच्या मुलींना शिकण्यासारखे आहे. आजकाल ‘मुलीचे लाजणे’ हा प्रकारच लुप्त झाला आहे.
१. पूर्वीची माणसे संस्काराला आणि आताची माणसे पैशाला महत्त्व देत असणे
पू. नेनेआजी : मी त्या काळातील चित्रपट सृष्टीतील प्रसिद्ध कलाकार श्री. राजा नेने यांची पत्नी ! जेव्हा माझे स्थळ घेऊन माझे बाबा यांच्या (श्री. राजा नेने यांच्या) घरी गेले होते, तेव्हा त्यांचे वैभव पाहून माझ्या बाबांनी यांच्या वडिलांना सांगितले, ‘‘आम्ही आमची मुलगी आपल्याकडे देऊ शकत नाही. मी सामान्य मास्तर आहे.’’ माझ्या सासर्यांनी माझ्या बाबांना सांगितले, ‘‘आम्हाला आपल्या मुलीसारखी सुसंस्कारित आणि चांगल्या घरची मुलगीच हवी आहे आणि काहीही नको !’’
श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ : ‘पूर्वीची माणसे संस्काराला महत्त्व देत होती, तर आताची माणसे पैशाला महत्त्व देऊन लग्न करतात आणि मग असे लग्न काही काळही टिकत नाही; म्हणूनच सध्या घटस्फोट होण्याचे प्रमाणच अधिक असल्याचे आपल्याला पहायला मिळते.
२. पूर्वी माणुसकी पाहिली जाणे आणि आज केवळ श्रीमंतीने नटलेला माणूस पाहिला जात असणे
पू. नेनेआजी : एखाद्या श्रीमंत मुलाचे स्थळ आले; म्हणून मागे-पुढे काहीही विचार न करता आज जसे मुलीचे आई-वडील विवाह जुळवतात, तसे पूर्वी नव्हते. ‘पूर्वी माणुसकी पाहिली जायची. आज केवळ श्रीमंतीने नटलेला माणूस पाहिला जातो.’ मग त्याचे संस्कार कितीही वाईट असले, तरी ते दृष्टीआड केले जातात. त्यामुळेच आजचे विवाह अधिक काळ टिकत नाहीत. पैसा घर चालवत नाही. आपल्या मुला-मुलींवर त्यांच्या आई-वडिलांनी संस्कार केलेली भारतीय संस्कृती आपले घर चालवते.
३. पूर्वीच्या नट्याही एवढ्या सोज्वळ असायच्या की, त्यांचे चित्रीकरण झाल्यावर त्यांचा पदर परत डोक्यावर येणे
पू. नेनेआजी : मला माझ्या यजमानांनी (श्री. राजा नेने यांनी) प्रारंभीच सांगितले होते, ‘‘ही चित्रपट सृष्टी मायानगरी आहे. तू या सृष्टीकडे पाहू नकोस.’’ मलाही त्याचा कधीच मोह झाला नाही. ते मला कधीतरी त्यांच्या समवेत चित्रीकरण पहायला नेत असत. त्या वेळेच्या नट्याही एवढ्या सोज्वळ असत की, त्यांचे चित्रीकरण झाले की, त्यांनी चित्रीकरणापुरता मागे घेतलेला पदर पुन्हा डोक्यावर येत असे. चित्रीकरण झाले की, त्या नट्या इकडे-तिकडे इतरांमध्ये वेळ वाया न घालवता थेट त्यांच्या खोलीत जात असत.
४. आजकालचे आई-वडील मुलींना सवलत देण्याच्या नावाखाली त्यांच्यावर अयोग्य संस्कार करत असणे
पू. नेनेआजी : माझ्या वयाच्या ९ व्या वर्षांपासूनच मी नऊवारी साडी नेसण्यास प्रारंभ केला. लहानपणीच या सवयी अंगी बाळगल्या, तर पुढे मुलींना त्रास होत नाही; पण आजचे आई-वडील मुलींना सवलत देण्याच्या नावाखाली त्यांना हे संस्कार देण्यात अल्प पडतात. आई-वडील म्हणतात, ‘‘आता तर ती लहान आहे. तिला तिची हौस-मौज हवी तशी करून घेऊ देत.’’ असे अयोग्य संस्कार एकदा झाले की, पुढे त्यातून बाहेर येणे मुलींना कठीण होते.
५. पूर्वी मुलींसाठी सात्त्विक आणि शरीर पूर्ण झाकणारे पोशाख शिवले जात असणे
श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ : ज्या वेळी पहिल्यांदा ‘मॅक्सी’ (झबल्यासारखा पायघोळ पाश्चात्त्य प्रकार) घालण्याची पद्धत आली होती. तेव्हा आईने कौतुकाने आम्हा तिघी बहिणींना ‘मॅक्सी’ शिवली. आम्ही ती घातलेली पाहून माझे आजोबा रागावून आईला म्हणाले, ‘‘हे काय पोरींना इंग्रजी कपडे घातले आहेस ?’’ मग माझ्या आईने आम्हाला नेहमीचे परकर-पोलके घातले. तेव्हा परकर-पोलके किंवा साडी नेसण्याची प्रथा होती. नाहीतर नेहमीचे मनगटापर्यंत पूर्ण हात झाकले जातील आणि गळा अन् पाठ दिसणार नाहीत, असे पूर्ण बंद पद्धतीचे पोशाख (ड्रेस) घातले जात.
६. पूर्वीच्या मुलींना स्वतःच्या वर्गातील मुलेही ज्ञात नसणे
पू. नेनेआजी : आमच्या शाळेमध्ये आम्ही मुली पुढे आणि मुले मागे बसत. मी एकदा मोठी झाल्यावर वाण्याच्या दुकानात गेले होते. तेव्हा वाणी मला म्हणाला, ‘‘तू दामलेंची ना ?’’ मी ‘हो’ म्हटले. तेव्हा तो मला म्हणाला, ‘‘अगं, मी तुझ्याच वर्गात होतो. मी मागे बसायचो.’’ त्या वेळेच्या मुलींना मान खाली घालून शाळेत जाणे, मागे-पुढे अनावश्यक वळून न पहाणे, अभ्यास करणे आणि पुन्हा घरी जाणे’, एवढेच ज्ञात होते. आम्हा मुलींसाठी शाळेच्या मधल्या सुट्टीमध्ये जेवणाचा डबा खाण्यासाठीही वेगळी खोली असायची.
७. पूर्वीच्या मुलींचे सुसंस्कारी आचरण हे आजच्या मुलींना बोध घेण्यासारखे असून
सात्त्विक संस्कारांमुळे त्या वेळेच्या मुलींमध्ये ‘शक्तीतेज’ जागृत असल्याने त्यांच्यावर अत्याचार होत नसणे
श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ : पू. नेनेआजींनी सांगितलेले त्या वेळेचे मुलींचे सुसंस्कारी आचरण हे आजच्या मुलींना बोध घेण्यासारखे आहे. स्वतः त्या चित्रपटसृष्टीसारख्या भुलवणार्या मायेच्या वैभवात राहिल्या; पण त्यांच्यावर झालेल्या सुसंस्कारांमुळे त्या कधीही या मोहमायेला भुलल्या नाहीत. आई-वडिलांचे ऐकणे, सायंकाळ झाल्यावर घराच्या बाहेर न पडणे, मासिक पाळीच्या दिवसांत सोवळे-ओवळे पाळणे, धर्मसंस्कृतीचे तंतोतंत आणि मनापासून आचरण करणे’, या सर्व सात्त्विक संस्कारांमुळे त्या वेळेच्या मुलींमध्ये ‘शक्तीतेज’ जागृत होते. त्या काळी आतासारखे स्त्रियांवर होणारे अत्याचार होत नसत. स्त्रीने तिचे धर्माचरण सोडल्यामुळे तिचे संरक्षककवच गळून पडले.
आता पुन्हा आपली संस्कृती आणि धर्माचरण करून आजच्या मुलींनी त्यांच्यातील ‘शक्तीतेज’ जागृत करण्याची वेळ आली आहे. साधनेने संस्कारित, देवाचे संरक्षककवच असलेल्या धर्माचरणी ‘स्त्रीशक्तीची’ आज कुटुंबालाच नव्हे, तर राष्ट्र आणि धर्मालाही आवश्यकता आहे !’