सिंह ‘अकबर’ आणि सिंहीण ‘सीता’ यांची नावे पालटा !
कोलकाता उच्च न्यायालयाचा बंगालच्या तृणमूल काँग्रेस सरकारला आदेश
कोलकाता (बंगाल) – बंगालमधील सिलीगुडीमध्ये असणार्या अभयारण्यातील ‘अकबर’ नावाच्या सिंहाला ‘सीता’ नावाच्या सिंहिणीसमवेत ठेवण्यावरून वाद झाला होता. या पार्श्वभूमीवर कोलकाता उच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट (दाखल) करण्यात आली होती. या याचिकेवर निर्णय देतांना कोलकाता उच्च न्यायालयाने दोन्ही प्राण्यांची नावे पालटण्याचा आदेश दिला आहे. तसेच या प्राण्यांची नावे ‘अकबर’ आणि ‘सीता’ ठेवण्याविषयी बंगाल सरकारकडून उत्तर मागितले आहे. विश्व हिंदु परिषदेने ही याचिका प्रविष्ट केली होती.
या सिंह आणि सिंहीण यांना नुकतेच त्रिपुरातील सेपाहिजाला प्राणी उद्यानातून आणण्यात आले होते. ‘सिंहांची नावे आम्ही पालटली नाहीत’, असे बंगालच्या वन विभागाच्या अधिकार्यांचे म्हणणे आहे. १३ फेब्रुवारीला येथे येण्यापूर्वीच त्यांची नावे ठेवण्यात आली होती. विहिंपचे म्हणणे आहे की, प्राण्यांची नावे राज्याच्या वन विभागाने ठेवली आहेत. ‘अकबर’ सोबत ‘सीता’ला ठेवणे हा हिंदु धर्माचा अपमान आहे.
सुनावणीच्या वेळी न्यायालयाने काय म्हटले ?
न्यायालयाने म्हटले की, तुम्ही स्वतः तुमच्या पाळीव प्राण्याचे नाव हिंदूंच्या देवता किंवा महंमद पैगंबर यांच्या नावावरून ठेवता का ? मला वाटते, आम्हाला अधिकार असता, तर आम्ही प्राण्यांची नावे अकबर आणि सीता ठेवली नसती. आपल्यापैकी कुणी रवींद्रनाथ टागोर यांचे नाव प्राण्याला ठेवण्याचा विचार करू शकतो का ? या देशातील एक मोठा वर्ग सीतेची पूजा करतो. आम्ही अकबराच्या नावावर सिंहाचे नाव ठेवण्याचा निषेध करतो. तो एक कार्यक्षम, यशस्वी आणि धर्मनिरपेक्ष मोगल बादशाह होता. (अकबर हा मुसलमान आक्रमक होता आणि त्याने हिंदूंवर अत्याचार केले, हा इतिहास आहे ! – संपादक) तुम्ही या प्राण्यांचे नाव ‘बिजली’ किंवा असे काहीतरी ठेवू शकता. ‘अकबर’ आणि ‘सीता’ असे नाव का ठेवले गेले ?
न्यायालयाने आदेशात असेही म्हटले आहे की, कृपया कोणत्याही प्राण्याचे नाव हिंदूंच्या देवता, मुसलमानांचे श्रद्धास्थान असलेले पैगंबर, ख्रिस्त्यांचे श्रद्धास्थान असलेली व्यक्ती, महान पुरस्कार विजेते, स्वातंत्र्यसैनिक इत्यादींच्या नावावरून ठेवू नका. सर्वसाधारणपणे, जे आदरणीय आहेत त्यांचे नाव ठेवू नये.