India China Border Issues : चीन सीमेवर गुंडगिरी करत असून गलवानसारखी स्थिती पुन्हा येऊ शकते ! – भारत

भारताचे संरक्षण सचिव गिरीधर अरमाने (मध्यभागी)

नवी देहली – चीन सीमेवर गुंडगिरी करत असून गलवानसारखी स्थिती पुन्हा उद्भवू शकते; मात्र असे असले, तरी भारतीय सैन्य धैर्याने चिनी सैन्याचा सामना करत आहे, असे विधान भारताचे संरक्षण सचिव गिरीधर अरमाने यांनी येथे केले. येथे भारत आणि अमेरिका यांच्यातील संरक्षण औद्योगिक सहकार्य वाढवण्यासाठी आयोजित ‘इंडस-एक्स शिखर परिषदे’त अरमाने बोलत होते. या वेळी अमेरिकेचे इंडो-पॅसिफिक कमांडचे प्रमुख अ‍ॅडमिरल जॉन सी. ऍक्विलिनो उपस्थित होते.

अरमाने म्हणाले की,

१. भारत सध्या चीनशी जवळपास प्रत्येक आघाडीवर स्पर्धा करत आहे. जिथे टेकडी आहे तिथे आम्ही तैनात आहोत आणि जिथे रस्ता आहे तिथेही आम्ही उपस्थित आहोत.

२. आम्हाला पूर्ण आशा आहे की, जेव्हा जेव्हा आम्हाला पाठिंब्याची आवश्यकता असेल, तेव्हा अमेरिका तिथे असेल. (आतापर्यंतचा इतिहास पहाता अमेरिका कधीच साहाय्यासाठी धाऊन येत नाही. त्यामुळे चीनशी दोन हात करण्यासाठी भारताने आत्मनिर्भर होणे आवश्यक ! – संपादक)

३. जून २०२० मध्ये गलवानमध्ये चीनसमवेत झालेल्या संघर्षानंतर अमेरिकेने गुप्तचर माहिती आणि उपकरणे यांद्वारे आम्हाला पुष्कळ साहाय्य केले आहे. यासाठी आम्ही त्यांचे आभार मानू इच्छितो. वर्ष २०२० सारख्या परिस्थितीला पुन्हा सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे. इंडो-पॅसिफिक प्रदेशात स्थिरता आणि शांतता राखणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

चीनने डेपसांग-डेमचोक येथील सैन्य हटवण्याची मागणी फेटाळली

यापूर्वी १९ फेब्रुवारी या दिवशी लडाखमधील चुशुल-मोल्डो सीमेवर भारत आणि चीन यांच्यात कॉर्प्स कमांडर स्तरावरील चर्चेची २१ वी फेरी झाली होती. ४ महिन्यांनंतर झालेल्या या बैठकीत चीनने पुन्हा एकदा तणाव अल्प करण्याची आणि डेपसांग अन् डेमचोक येथील सैन्य हटवण्याची भारताची मागणी फेटाळून लावली.

नवीन आकडेवारीनुसार चीनने पश्‍चिमेकडील लडाखमध्ये, तसेच उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेश येथील सीमांवर ५० ते ६० सहस्र सैनिक तैनात केले आहेत. याखेरीज सिक्कीम आणि अरुणाचल प्रदेशज येथेही ९० सहस्र सैनिक तैनात आहेत. त्यांना तोंड देण्यासाठी भारताने येथे सैनिकांची संख्या वाढवली आहे.

गलवान येथील कारवाई काय आहे ?

जून २०२० मध्ये भारत-चीन सीमेवरील गलवान खोर्‍यात भारत आणि चिनी सैनिक समोरासमोर आले होते. त्या वेळी भारताच्या २० सैनिकांना वीरमरण आले होते आणि चीनचे १०० सैनिक ठार झाल्याचे म्हटले होते.