क्रांतीकारक वासुदेव बळवंत फडके यांनी देश आणि धर्म यांवर अत्यंत प्रेम केले ! – ह.भ.प. चारुदत्त आफळेबुवा
सांगली – क्रांतीकारक वासुदेव बळवंत फडके यांनी देश आणि धर्म यांवर अत्यंत प्रेम केले. क्रांतीकारक वासुदेव फडके यांनी अनेक आदिवासी आणि खेडेगावातील लोकांना एकत्र केले, तसेच त्यांना स्वातंत्र्याचे महत्त्व पटवले. सर्वांमध्ये इंग्रजांविरुद्ध असंतोष निर्माण केला आणि त्यांना लढण्यासाठी प्रवृत्त केले. सर्व समाजास एकत्र करून इंग्रजांविरुद्ध कडवा लढा दिला. केवळ ४ मासांत त्यांनी इंग्रजांना जेरीस आणले; मात्र अखेर ते पकडले गेले. कारागृहात त्यांना अत्यंत हालअपेष्टा सहन कराव्या लागल्या. त्यांनी त्यांच्याजवळ भारतमातेची माती ठेवली होती. ती अंगावर उधळून त्या मातीवरच डोके टेकून त्यांनी देहत्याग केला. त्यामुळे वासुदेव बळवंत फडके आपल्यासाठी आदर्श आहेत, असे प्रतिपादन राष्ट्रीय कीर्तनकार ह.भ.प. चारुदत्त आफळेबुवा यांनी केले. ते श्रीरामनिकेतन येथे चालू असलेल्या कीर्तन शताब्दी महोत्सवात बोलत होते.