स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाचे सातत्याने प्रयत्न करणार्या अन् परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रती अपार भाव आणि दृढ श्रद्धा असणार्या कतरास (झारखंड) येथील सनातनच्या ८४ व्या (समष्टी) संत पू. (सौ.) सुनीता खेमका (वय ६३ वर्षे) !
२१.२.२०२४ या दिवशी प्रसिद्ध झालेल्या भागात पू. (सौ.) सुनीता खेमका यांचा सनातन संस्थेशी संपर्क झाल्यावर त्यांनी केलेली साधना, सेवा, त्यांची गुरुदेवांवर असलेली नितांत श्रद्धा, त्यांना आलेल्या अनुभूती हा भाग पाहिला. आता या भागात ‘त्यांनी साधना चांगली होण्यासाठी केलेले प्रयत्न, त्यांना लाभलेले श्री गुरूंच्या भेटीचे अविस्मरणीय क्षण, संतांचे आशीर्वाद आणि संतपद घोषित होणे’, हा भाग पहाणार आहोत.
(भाग ३)
भाग २ वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/766713.html
१४. नियमितपणे स्वभावदोष आणि अहं यांचे निर्मूलन करण्याचे केलेले प्रयत्न !
१४ अ. नियमितपणे सारणी लिखाण करणे : ‘साधकांना वेळोवेळी जे करण्यास सांगितले गेले, ते करण्याचा आम्ही (मी आणि यजमान पू. प्रदीप खेमका (सनातनचे ७३ वे (समष्टी) संत यांनी) प्रयत्न केला. वर्ष २००३ पासून आम्ही स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनासाठी सारणी (टीप) लिहायला आरंभ केला. प्रती एक घंट्याने लक्षात आलेल्या चुका आणि दैनंदिनी लिहिणे, स्वयंसूचना घेणे इत्यादी सर्व प्रयत्न केले. गुरुकृपेने आजपर्यंत आमचे सारणी लिहिणे नियमितपणे चालू आहे.
(टीप – स्वतःमधील स्वभावदोष आणि अहं यांचे निर्मूलन करण्यासाठी प्रतिदिन स्वतःकडून झालेल्या चुका वहीत लिहून त्यापुढे त्या कुठल्या स्वभावदोषांमुळे झाल्या, ते लिहिणे. त्यापुढे योग्य दृष्टीकोनाच्या सूचना लिहून त्या दिवसातून १०-१२ वेळा मनाला देणे)
१४ आ. यजमान पू. प्रदीप खेमका यांच्या व्यष्टी साधनेच्या गांभीर्यामुळे त्यांच्यासह स्वतःचे आणि नातवाचेही सारणी लिखाण होणे : साधना करण्यासाठी मला माझ्या कुटुंबियांकडून नेहमीच सहकार्य लाभले. यजमानांच्या साहाय्यामुळे माझे व्यष्टी साधनेचे प्रयत्न कधीही खंडित झाले नाहीत. यजमान प्रतिदिन रात्री झोपण्यापूर्वी आत्मनिवेदन लिहितात. रात्री कितीही उशीर झाला, तरी ते लिखाण केल्याविना झोपत नाहीत. त्यांच्यामुळे त्यांच्यासह बसून माझेही लिखाण होते. आता आमचा नातू श्रीहरि (वर्ष २०२३ मधील आध्यात्मिक पातळी ६१ टक्के आणि वय ७ वर्षे) आम्हाला विचारतो, ‘आज माझ्याकडून काय चुका झाल्या ?’ आणि तोही आमच्यासह बसून दिवसभरात त्याच्याकडून झालेल्या चुका आठवून आमच्याप्रमाणे लिहिण्याचा प्रयत्न करतो.
१५. स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाचे झालेले लाभ !
१५ अ. एका प्रसंगी अकस्मात् घरातील ध्यानमंदिराच्या समोरील सभागृहातील लाद्या आपोआपच एकापाठोपाठ एक उखडल्या गेल्यावर घाबरून न जाता स्थिर रहाता येणे, तेव्हा ‘स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाचे महत्त्व लक्षात येणे : सनातन संस्थेच्या मार्गदर्शनानुसार साधना करू लागल्यानंतर मला गुरुदेवांच्या कृपेने पुष्कळ शिकायला मिळाले; मात्र एक सूत्र मला फारच वैशिष्ट्यपूर्ण वाटले, ते म्हणजे ‘स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाचे प्रयत्न !’ सर्वांसाठीच ते फार महत्त्वाचे सूत्र आहे. ‘२९.१.२०१९ या दिवशी धनबादमध्ये ‘सनातन प्रभात’च्या वाचकांसाठी मार्गदर्शनाचे आयोजन केले होते. तिथे जाण्यासाठी यजमान पू. प्रदीप खेमका, सद्गुरु नीलेश सिंगबाळ आणि श्री. शंभू गवारे (वर्ष २०२३ ची आध्यात्मिक पातळी ६५ टक्के) घरातून निघत असतांना अकस्मात् घरातील ध्यानमंदिराच्या समोरच्या सभागृहातील लाद्या एकेक करून आपोआपच उखडल्या जाऊ लागून घराची स्थिती एकदम भयावह झाली. माझ्या डोळ्यांसमोर आपत्काळाचे दृश्य आले.’
ईश्वराच्या कृपेने आम्ही सर्व जण स्थिर राहू शकलो. तेव्हा गुरुदेवांनी शिकवलेली ‘स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया किती महत्त्वाची आहे’, याची मला जाणीव झाली. आमचे स्वभावदोष न्यून झाले नाहीत, आमच्या मनाला स्थिरता आली नाही, तर आपण आपत्काळाचा सामना कसा करू शकू ? ‘एखाद्या प्रसंगात आपण लगेच घाबरून गेलो, योग्य निर्णय घेऊ शकलो नाही किंवा काळजी वाटू लागली, एक दुसर्यावर क्रोध करू लागलो, तर आपली स्थिती बिकट होईल’, असे देवाने माझ्या लक्षात आणून दिले.
१५ आ. साधना चालू केल्यावर ‘भावनाशीलता’ हा अहंचा पैलू आपोआप न्यून होणे : माझ्यामध्ये ‘कुठल्याही क्षुल्लक गोष्टीमुळे दुःखी होणे किंवा मनाला लावून घेणे’ हा अहंचा पैलू अधिक प्रमाणात होता. कुणी काही म्हटले की, लगेच माझ्या डोळ्यांत पाणी येत असे. साधना करतांना गुरुकृपेने हा अहंचा पैलू आपोआपच न्यून होत गेला.
१५ इ. साधकांवर नामजपादी उपाय करतांना साधकांना त्रास देणार्या अनिष्ट शक्तींचा त्रास वाढल्यावर भीती वाटणे, हळूहळू ती भीती नष्ट होणे आणि भीती नष्ट झाल्यावर दुसरी सेवा देण्यात येणे : वर्ष २०११ मध्ये माझी आध्यात्मिक पातळी ६१ टक्के झाल्यानंतर मला साधकांसाठी नामजपादी उपाय करायला सांगितले होते. त्यासाठी मी प्रत्येक आठवड्यातून एकदा धनबादला जात होते. साधकांसाठी नामजपादी उपाय करतांना साधकांना होणार्या अनिष्ट शक्तींचा त्रास वाढायचा. त्याची मला फार भीती वाटत असे; परंतु ‘एका संतांनी मला ही सेवा करायला सांगितली आहे, तर ती सेवा मला करायचीच आहे’, असा विचार करून मी साधकांसाठी नामजपादी उपाय करण्यासाठी जात होते. एक साधक मला म्हणाले, ‘‘जेव्हा तुमची या प्रसंगांची भीती नष्ट होईल, तेव्हा तुमची ही सेवा पालटली जाईल.’’ नामजपादी उपायांच्या प्रत्येक दिवशी साधकांचे त्रास वाढतच होते. हळूहळू माझी या प्रसंगांची भीती नष्ट झाली. त्यानंतर १ – २ मासांनी माझी ही सेवा पालटण्यात आली.
‘माझी या प्रसंगांची भीती नष्ट व्हावी’, यासाठीच देवाने हा प्रसंग घडवला होता’, असे यातून मला शिकता आले.
१६. आध्यात्मिक प्रगतीविषयी असलेले विचार !
१६ अ. ‘स्वतःच्या प्रयत्नाने ६० टक्के आध्यात्मिक पातळी गाठणे शक्य नसून ते केवळ गुरुकृपेनेच शक्य आहे’, असे वाटणे : आध्यात्मिक प्रगतीविषयी माझ्या मनात कधी विचार आले नाहीत. एकदा एका सत्संगात उत्तरदायी साधकाने सर्वांना साधनेसंबंधित काही प्रश्न दिले होते आणि चिंतन करून त्यांची उत्तरे पुढच्या साप्ताहिक सत्संगात लिहून आणण्यास सांगितली होती. त्यामध्ये पहिलाच प्रश्न होता, ‘६० टक्के आध्यात्मिक पातळी गाठण्यासाठी तुम्ही कसे प्रयत्न करणार आहात ?’ त्याचे उत्तर म्हणून मी लिहिले होते, ‘मी माझ्या प्रयत्नाने ६० टक्के आध्यात्मिक पातळी गाठू शकेन’, हे माझ्या हातात नाही. परम पूज्यांची कृपा होईल, तेव्हाच असे होऊ शकेल !’
१६ आ. ‘स्वतःला काहीच येत नसल्यामुळे परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे अधिक लक्ष आहे’, असे वाटणे : माता-पिता यांचे लक्ष त्यांच्या इतर मुलांच्या तुलनेत त्यांच्या रुग्णाईत किंवा कमकुवत बाळाकडे अधिक असते. त्याचप्रमाणे ‘मला काहीच येत नाही. त्यामुळे परम पूज्य माझ्याकडे अधिक लक्ष देतात’, असे मला नेहमी वाटते.
१७. साधनाप्रवासात प्राप्त झालेले संतांचे कृपाशीर्वाद !
१७ अ. पू. प्रदीप खेमका (सनातनचे ७३ वे (समष्टी) संत) : ‘यजमान पू. प्रदीप खेमका यांच्या सहवासामुळेच माझ्या जीवनात परम पूज्य आले’, यासाठी मला यजमानांप्रती पुष्कळ कृतज्ञता वाटते.
१७ आ. परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे आशीर्वादात्मक बोल ! : वर्ष २०११ मध्ये आम्हा दोघांची (माझी आणि यजमानांची) ६१ टक्के आध्यात्मिक पातळी घोषित झाली, तेव्हा प.पू. गुरुदेवांनी लिहून पाठवले होते, ‘मी ईश्वराला प्रार्थना करतो, ‘तुम्हा दोघांची आध्यात्मिक प्रगती एकमेकांच्या समवेतच व्हावी.’ हे त्यांनी आम्हाला दिलेले आमच्या आयुष्यातील एक अविस्मरणीय आशीर्वचन आहे !
१७ इ. सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे : वर्ष २०१३ मध्ये आमचे कुटुंब एका कठीण परिस्िथतीतून जात होते. तेव्हा मी सद्गुरु पिंगळेकाकांना (सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांना) म्हणाले, ‘‘ईश्वर आहे ना ? सगळे काही ठीक होईल.’’ सद्गुरु पिंगळेकाका मला म्हणाले, ‘‘ताई, तुम्ही असा भाव ठेवा, ‘मी श्रीकृष्णाच्या नावेत बसले असून तो मला जसे पार करील, तसे मी पार होऊन जाईन.’’ त्यानंतर माझ्या विचार करण्याच्या दृष्टीकोनात एकदम पालट झाला. ‘विचारांत न गुरफटता, ‘गुरुदेव सर्व चांगलेच करणार आहेत’, अशी श्रद्धा मनात निर्माण झाली. हा फार मोठा पालट माझ्या जीवनात झाला.
माझ्या मनात गुरुदेवांप्रती नेहमीच दृढ श्रद्धा राहिली आहे. ‘गुरुदेव आमच्या जीवनात आहेत, तर आमचे सगळे चांगलेच होणार आहे’, असाच माझा भाव सदैव असतो.
१७ ई. पू. (डॉ.) ॐ उलगनाथन् आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ : वर्ष २०१४ च्या गुरुपौणिमेपूर्वी पू. (डॉ.) ॐ उलगनाथन आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांच्या समवेत मला एक मासाच्या दौर्यावर जाण्याची अपूर्व संधी लाभली होती. ‘ते दिवस माझ्या जीवनातील ‘सुवर्ण क्षण’ होते’, असे मला वाटते.
१८. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या समवेतचे अविस्मरणीय क्षण !
१८ अ. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या सत्संगाच्या वेळी डोळे मिटून बसल्यावर ‘कृष्ण आला’, असे दिसून त्याच्याकडे पाहून हसणे, तेव्हा परात्पर गुरु डॉ. आठवले समोर बसून स्वतःकडे पाहून हसत असणे : एकदा आम्ही रामनाथी आश्रमात गेलो असतांना आम्हाला परम पूज्यांचा सत्संग मिळणार होता. तेव्हा आमच्या कौटुंबिक समस्या पुष्कळ वाढल्या होत्या. सत्संगाच्या वेळी गुरुदेव येण्यापूर्वी मी डोळे बंद करून बसले होते. तेव्हा मला वाटले, ‘भगवान कृष्ण आला असून तो माझ्यासमोर बसला आहे आणि मी त्याच्याकडे पाहून हसत आहे.’ त्या क्षणी मी डोळे उघडून समोर पाहिले, तेव्हा परम पूज्य माझ्यासमोर बसले होते आणि ते माझ्याकडे पाहून हसत होते. हा प्रसंग कधीच माझ्या विस्मरणात जाऊ शकणार नाही.
१८ आ. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या सत्संगातील प्रत्येक क्षणच अविस्मरणीय असणे : आम्हाला जेव्हा कधी गुरुदेवांचा सत्संग लाभला, ते क्षण माझ्या स्मरणात नेहमीच राहिले आहेत. त्यांची प्रीती, त्यांचे ममत्व, त्यांची कृपा आम्ही नेहमीच अनुभवत असतो. ‘प.पू. गुरुदेवांच्या सत्संगातील क्षण आणि त्यांच्यासह छायाचित्रे काढणे’ हे सारे क्षण फारच अविस्मरणीय आहेत !
१९. स्वतःचा आणि विवाहाचा वाढदिवस असतांना पवित्र अशा कुंभमेळ्याच्या स्थानी संतपद प्राप्त केल्याचे घोषित करून परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी जीवनातील सर्वाेच्च आनंदाचा दिलेला क्षण !
१६.२.२०१९ या दिवशी आम्ही प्रयागराज येथील कुंभमेळ्यासाठी गेलो होतो. आम्ही कुंभमेळ्यात असतांना माझा तिथीनुसार वाढदिवस होता आणि आमच्या विवाहाचाही वाढदिवस होता. वाढदिवसाच्या आदल्या दिवशी सद्गुरु पिंगळेकाकांशी बोलत असतांना मी ही गोष्ट त्यांना सांगितली होती. दुसर्या दिवशी सकाळी सद्गुरु राजेंद्र शिंदे यांच्याशी माझे बोलणे झाले. तेव्हा या २ वैशिष्ट्यपूर्ण गोष्टी सांगून ते मला म्हणाले, ‘‘तुमचा आणि तुमच्या विवाहाचा वाढदिवस असतांना तुम्ही कुंभमेळ्याच्या पवित्र क्षेत्री आहात.’’ माझी रासही कुंभ आहे. असे सर्व योगायोग असतांनाच माझे संतपद घोषित केले गेले. त्यामुळे मला गुरुदेवांप्रती अपार कृतज्ञता वाटली. अशा शुभदिनी परम पूज्य मला माझ्या जीवनातील सर्वश्रेष्ठ भेट देऊ इच्छित होते. त्यासाठीच त्यांनी हा दिवस निवडला असावा. ‘परम पूज्य, आपण ‘माझा आणि माझ्या विवाहाचा वाढदिवस अन् माझा उद्धार’, असे सर्व काही एकाच दिवशी नियोजित केले’, असे मला वाटले. हा माझ्या जीवनातील सर्वाधिक आनंददायी दिवस होता.
२०. कृतज्ञता
मला प्रत्येक क्षणी गुरुदेवांच्या चरणी कृतज्ञता वाटते. नदीमध्ये जसे वाळूचे कण चिकटून राहिलेले असतात, तसे परम पूज्यांच्या विशाल चरणांशी आम्ही सर्व जण वाळूंच्या कणांप्रमाणे चिकटलेलो आहोत. ‘परम पूज्यांनी आम्हाला सदैव त्यांच्या समवेतच ठेवावे’, हीच त्यांच्या चरणी प्रार्थना आहे.’
(समाप्त)
– (पू.) सौ. सुनीता खेमका, कतरास, झारखंड .
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |