दिवसभरातील घडामोडींवर एक दृष्टीक्षेप : झिशान सिद्दीकी यांना मुंबई युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून हटवले !; भिवंडी येथील माजी नगराध्यक्षांच्या घरी दरोडा !…
झिशान सिद्दीकी यांना मुंबई युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून हटवले !
मुंबई – काँग्रेसने बाबा सिद्दीकी यांचे चिरंजीव झिशान सिद्दीकी यांना मुंबई युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून हटवले आहे. याविषयी परिपत्रक काढले आहे. मुंबई युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदी आता अखिलेश यादव यांची निवड केली असून सुफियान मोहसीन हैदर यांना मुंबई युवक काँग्रेसचे कार्याध्यक्षपद दिले आहे.
भिवंडी येथील माजी नगराध्यक्षांच्या घरी दरोडा !
भिवंडी – येथील माजी नगराध्यक्षा साधना लहू चौधरी यांच्या घरावर ३ चोरांनी दरोडा घातला. घरातील महिलेला धाक दाखवून सोन्याचे दागिने, रोख रक्कम असा एकूण २१ लाखांचा ऐवज चोरला आहे. त्यानंतर ते पसार झाले. या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
संपादकीय भूमिकाअसुरक्षित प्रशासकीय अधिकारी ! |
तुर्भे येथे खाद्यपदार्थांचे लेबल पालटून विक्री !
नागरिकांच्या आरोग्याशी खेळण्याचा प्रकार !
नवी मुंबई – तुर्भे औद्योगिक वसाहतीमध्ये नामांकित खाद्यपदार्थांचे लेबल पालटून विक्री करण्यात येत होती. या प्रकाराची माहिती मिळताच अन्न व औषध प्रशासनाने कारवाई केली आहे. प्रशासनाने गोदामांची झाडाझडती घेतल्यावर अन्न सुरक्षा मानक कायद्याची पायमल्ली केल्याचे आढळून आल्याने अधिकार्यांनी २५ लाख रुपये किंमतीची उत्पादने सील केली आहेत.
‘फटका टोळी’मुळे प्रवाशाला डावा हात गमवावा लागला !
ठाणे – शशिकांत कुमार (वय २२ वर्षे) हे वांगणी येथून ठाण्याच्या दिशेने लोकलच्या दारात भ्रमणभाष घेऊन प्रवास करत होते. दिवा रेल्वेस्थानकात ‘फटका टोळी’तील तरुणांनी त्यांच्या हातावर फटका देत भ्रमणभाष घेतला. यामुळे शशिकांत खाली पडले. त्यांचा डावा हात रेल्वे आणि रूळ यांच्या संपर्कात आल्याने तो खांद्यापासून वेगळा झाला. त्यांना रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. या प्रकरणी गणेश शिंदे याला अटक केली आहे.
संपादकीय भूमिकाअशा टोळ्यांवर कठोर कारवाई कधी होणार ? |