मनोज जरांगे खोटे बोलतात ! – अजय बारसकर महाराज
मुंबई – ‘मराठा समाजाचे आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील कायम पलटी मारतात, खोट बोलतात’, असा आरोप मनोज जरांगे यांचे कोअर कमिटीचे सदस्य अजय महाराज बारसकर यांनी २१ फेब्रुवारी या दिवशी येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत केला.
अजय महाराज बारसकर म्हणाले की,
१. मी गेल्या अनेक वर्षांपासून मराठा समाजाच्या आरक्षणासाठी लढा देत आहे. मधील काळामध्ये अंतरवाली सराटी येथे जी घटना घडली, त्यानंतर मी आंदोलनाच्या लढ्यात पुन्हा एकदा सहभागी झालो.
२. मराठवाड्यात ओबीसी नोंदणीसाठी मी अनेक वर्षांपासून काम करत आहे. त्यामुळेच मी मनोज जरांगे यांच्यासमवेत सहभागी झालो होतो; मात्र यापूर्वी मी कधीच माध्यमांसमोर आलो नाही.
३. मनोज जरांगे हा अत्यंत हेकेखोर माणूस आहे. तो कोणत्याही शब्दावर अडून रहात होता. आमचा समाज पुष्कळ भोळा आहे.
४. मी पैशासाठी किंवा प्रसिद्धीसाठी असे आरोप करत नाही. मी कीर्तनाचे पैसे घेत नाही; मात्र मनोज जरांगे यांच्या प्रत्येक कृतीचा मी साक्षीदार आहे. माझ्या मनात अनेक दिवसांपासून खदखद होती. ती आज मी व्यक्त करत आहे. यामुळे मला वारंवार ‘गोळ्या घालून मारून टाकू’, अशा धमक्या भ्रमणभाषवर दिल्या जात आहेत.
५. मनोज जरांगे यांनी तुकाराम महाराजांचा अवमान केला, ते मी सहन करणार नाही. मनोज जरांगे पाटील यांनी रांजणगाव गणपति येथे उच्चपदस्थ अधिकार्यांसमवेत ३० डिसेंबर २०२३ या दिवशी गुप्त बैठक घेतली. त्याचा मी साक्षीदार आहे, तसेच लोणावळा, वाशी येथेही मराठा समाजाला डावलून काही बैठका झाल्या; मात्र अशा गुप्त बैठकांना माझा आक्षेप होता. या गुप्त बैठकांचे अनेक पुरावे माझ्याकडे आहेत.