हिंदु जनजागृती समितीच्या कार्याविषयी उत्कट भाव असणारे बेतिया (बिहार) येथील राजपुरोहित राकेशचंद्र झा !
बेतिया (बिहार) – येथील ५६ मंदिरांचे राजपुरोहित श्री. राकेशचंद्र झा हे गेल्या ३ वर्षांपासून हिंदु जनजागृती समितीच्या कार्यात सहभागी आहेत आणि समितीद्वारे आयोजित प्रांतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनात नियमित सहभाग घेतात. बेतिया क्षेत्रात मंदिर विश्वस्तांची एक बैठक आयोजित करून त्यांनी समितीच्या प्रतिनिधींना आमंत्रित केले होते.
बेतियामध्ये शासनकर्त्यांच्या हिंदूविरोधी धोरणामुळे पुजार्यांना केवळ मासिक ९०० रुपये वेतन मिळते. यामुळे सर्वांची आर्थिक परिस्थिती पुष्कळच खालावलेली आहे. जेव्हा समितीचे कार्यकर्ते बेतिया क्षेत्रात मंदिर विश्वस्तांच्या बैठकीसाठी गेले, तेव्हा श्री. राकेशचंद्र झा आणि त्यांच्या पत्नीने समितीचे उत्तरप्रदेश अन् बिहार राज्य समन्वयक श्री. विश्वनाथ कुलकर्णी अन् सौ. सीमा श्रीवास्तव यांचे आदरपूर्वक स्वागत केले. समितीचे कार्यकर्ते आलेले पाहून त्यांचा भाव दाटून आला होता. त्यांनी सर्वांची जेवणाची व्यवस्था करून भेट स्वरूप शाल, साडी आणि वस्तू अर्पण केली. यासमवेत बेतिया क्षेत्रातील मंदिर विश्वस्त आणि पुजारी यांची बैठक आयोजित करून मंदिर संघटनासाठी सर्वांना कृतीशील करण्याचा प्रयत्न केला.
श्री. झा यांनी स्वतः रिक्शा करून समितीच्या कार्यकर्त्यांना बेतियामध्ये सर्वत्र नेऊन त्यांना बसस्थानकापर्यंत सोडले. यानंतर त्यांनी दुसर्या दिवशी सुखरूप पोचल्याची निश्चितीही केली. त्यांच्या एकंदर आचरणातून अत्यंत प्रेमभाव आणि धर्मकार्याप्रती प्रचंड आदर अन् श्रद्धा असल्याचे जाणवत होते.