मुलांमध्ये वाढती दुष्टता !
बिहारमधील मधुबन येथील आठवी, नववी आणि अकरावी इयत्तांमध्ये शिकणार्या ३ मुलांनी केवळ ‘माणूस तडफडून कसा मरतो ?’, हे पहाण्यासाठी निष्पाप ‘कॅब’चालकाची हत्या केल्याची घटना घडली आहे ! ‘हत्या कशी करायची ?’, हे या मुलांनी सामाजिक माध्यमांवर पाहिले होते. या मुलांना केवळ ‘एखाद्या माणसाला मरतांना आणि मरण्याआधी माणूस कसा तडफडतो ?’, हे पहायचे होते. ‘आपली ही इच्छा पूर्ण होण्यासाठी आपण एखाद्या माणसाला मारू शकत नाही’, ही सर्वसामान्य गोष्ट त्या मुलांना कशी लक्षात आली नाही ? याचे आश्चर्य वाटते. मुले केवळ अशा विचित्र इच्छांसाठी दुसर्याची हत्या कशी करू शकतात ? मुलांना असे वाटण्यामागे किंवा त्यांची अशी दुष्प्रवृत्ती होण्यामागे नेमका कुठला कुसंस्कार आहे ? ज्या गोष्टीमुळे सामान्यांचे हृदय कळवळते, त्यातून मुलांना आसुरी आनंद मिळतो, एवढी विकृती त्यांच्यामध्ये निर्माण होण्यास कोण कारणीभूत आहे ? तो चालक जीव वाचवण्यासाठी जितका धडपडत होता, तितका त्यांना अधिक आनंद होत होता, त्याला मरतांना पाहून मुलांना मजा वाटत होती. ‘तो चालक तडफडत असतांना आम्ही जोरजोरात हसत होतो’, असे चक्क आरोपी मुलांनी सांगितले.
किती ही विकृती ? म्हणजे ही मुले नसून ‘मुलांमध्ये जिवंत राक्षसी प्रवृत्तीच कार्यरत आहे’, असे कुणाला वाटले, तर चूक ते काय ? या मुलांना पशूपेक्षाही खालच्या पातळीवर जाऊन वागावेसे वाटले, हे अत्यंत गंभीर आहे. कोवळ्या वयात मुलांचे असे विचार असतील, तर भविष्यात ती काय
करतील ? याचा विचारच न केलेला बरा ! या मुलांचा जबाब ऐकून पोलीसही हादरले. त्यांना बालसुधारगृहात पाठवण्यात आले आहे. तिथे ही मुले कशी रहातील ? देव जाणे. ‘आपण चूक केली असून त्यासाठी आपल्याला शिक्षा होत आहे’, ही जाणीव मुलांना तिथे कशी होणार ? कुटुंबात होणारे अती लाड, संस्कार आणि शिस्त यांचा अभाव, रागावर नियंत्रण नसणे, व्यसने, सहज उपलब्ध होणारे भ्रमणभाष अन् इंटरनेट यातूनच पुढे बालगुन्हेगार घडत असतात. मुलांमधील दुष्टपणा नाहीसा होऊन त्यांना सत्कर्माची ओढ लावायला पाहिजे, तर त्यांच्यात सुधारणा होईल. असे बालसुधारगृहात खरोखर होते का ? मुलांना चांगले आणि वाईट कर्म ओळखता येणे अन् वाईट कर्मापासून लांब राहिले पाहिजे, ही शिकवण मिळणे, हे केवळ धर्माचरणामुळे शक्य होऊ शकते. सद्वर्तन, नैतिकता जपणारा माणूस निर्माण होण्यासाठी मुलांना लहानपणापासूनच मनाचे श्लोक, गीतेचे अध्याय, स्तोत्रे म्हणणे, नामजप करणे आदी शिकवायला हवे. यातून धर्माचरणाचे संस्कार रुजवणे किती आवश्यक आहे, हे या घटनेतून लक्षात येईल !
– सौ. अपर्णा जगताप, पुणे