रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमातील सौ. रंजना गडेकर यांना नवरात्रीच्या कालावधीत श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांच्या संदर्भात आलेल्या अनुभूती
१. देवीच्या रूपाचे अनुसंधान होत नसल्याने देवीला प्रार्थना केल्यावर श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांचे रूप डोळ्यांसमोर येणे आणि ते देवीचे गीत संपेपर्यंत टिकून रहाणे
‘२.९.२०२२ या दिवशी आश्रमात नवरात्रीनिमित्त भावसत्संग होता. भावसत्संगाच्या वेळी देवीची भक्तीगीते लावली होती. त्या वेळी मी कल्पना केलेल्या देवीच्या रूपाचे अनुसंधान आणि एकाग्रता होत नव्हती आणि अन्य कुठलेही देवीचे रूप डोळ्यांसमोर येत नव्हते. त्या वेळी मी देवीला प्रार्थना केली, ‘ज्या रूपाने माझे अनुसंधान होईल आणि भावजागृती होईल, तेच रूप तू माझ्या डोळ्यांसमोर आण.’ त्या वेळी श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांचे रूप माझ्या डोळ्यांसमोर आले आणि देवीचे गीत संपेपर्यंत ते रूप टिकून होते.
२. श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ यांच्या स्पर्शाने साधिकेला देहात दैवी स्पंदने संक्रमित झाल्याचे जाणवणे आणि देहावरील आवरण नष्ट होऊन एक वेगळाच उत्साह जाणवणे
त्या दिवशी आश्रमात देवीचा यज्ञ होता. सायंकाळी यज्ञस्थळी जातांना मला श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ भेटल्या. त्यांचे सुंदर वस्त्रालंकार घातलेले दैवी रूप पाहून माझे डोळे दिपून गेले. त्यांनी माझ्या दंडाला स्पर्श करून कुरवाळल्यासारखे केले आणि मला वेगळीच ऊर्जा दिली. त्यांच्याकडून माझ्या देहात दैवी स्पंदने संक्रमित झाल्याचे जाणवले. माझ्या देहावरील आवरण नष्ट होऊन मला एक वेगळाच उत्साह आला. त्यांच्याकडून मिळालेली दैवी स्पंदने माझ्या देहभर पसरल्याचे जाणवले. त्यांचा स्पर्श, डोळे आणि बोलण्ो यांतून अपार प्रेम जाणवत होते. त्या त्यांच्या काही क्षणांच्या सहवासाने मला उत्साह आणि सुंदर स्मृती देऊन गेल्या. त्यांचे ते क्षण पुनःपुन्हा आठवून मनाला आनंद मिळत होता.
३. श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ यांच्यामध्ये देवत्व येत असल्याची अनुभूती येणे
रात्री यज्ञ संपल्यावर श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ देवीची आरती करत होत्या. आरती चालू असतांना मला ‘आपण त्यांचीच आरती करत आहोत’, असे वाटून आरती होईपर्यंत माझी भावजागृती होत होती. इतर वेळी देवीच्या आरतीच्या वेळी आपण ‘परात्पर गुरु डॉक्टरांचीच आरती करत आहोत’, अशी अनुभूती येते. श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ या मला परात्पर गुरु डॉक्टरांच्या ठिकाणी दिसल्या. अशी अनुभूती येणे, ‘ही शिष्याची गुरूंशी असलेली एकरूपता, तसेच श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी साधना प्रवासातील घेतलेली गरुड झेप आहे’, असे मला वाटले. ‘ही अनुभूती म्हणजे श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ यांच्यामध्ये देवत्व येत आहे’, याची अनुभूती आहे’, असे मला जाणवले.
४. श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ यांच्या मागे यज्ञाचा धूर दिसत होता. तेव्हा त्या आकाशात ढगांमध्ये अधांतरी उभी असलेल्या देवीप्रमाणे दिसत होत्या. ते दृश्य मला दिव्य वाटत होते.
५. श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ यांना जिज्ञासा, तळमळ, अहं अल्प असणे, प्रीती आणि देवावरील श्रद्धा या गुणांमुळेच दैवी ज्ञान मिळत असणे आणि त्यांनी विष्णुस्वरूप परात्पर गुरु डॉक्टरांचे अन् देवीदेवतांचे मन जिंकले असणे
परात्पर गुरु डॉक्टर म्हणजे रत्नपारखी आहेत. त्यांनीच श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ यांना घडवले आहे. त्यांना दैवी स्थान प्राप्त करून दिले. ते सर्वांना समान ज्ञान आणि शिकवण देतात. ते अपार कष्ट घेऊन साधकांना घडवतात. श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ यांनी परात्पर गुरु डॉक्टरांची शिकवण अल्प कालावधीत आत्मसात् केली. त्यांची जिज्ञासा, तळमळ, अहं अल्प असणे, प्रीती आणि देवावरील श्रद्धा या गुणांमुळेच त्यांना दैवी ज्ञान मिळत आहे. दैवी ज्ञान प्राप्त झाले आहे, अशा काही जणांपैकी त्या या पृथ्वीतलावरील अद्वितीय एक आहेत. त्यांच्यातील साधना करण्याची क्षमता असाधारण आहे. ‘देवाच्या मनात काय आहे ? त्याला काय अपेक्षित आहे ?’, हे अचूक ओळखून त्या वागतात. त्यामुळे त्यांनी विष्णुस्वरूप गुरूंचे आणि देवीदेवतांचे मन जिंकले आहे. श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ या ‘न भूतो न भविष्यति ।’, अशा आहेत. त्यामुळे त्यांना देवाने अध्यात्मातील उच्च अधिकार आणि दैवी स्थान दिले आहे.
६. कृतज्ञता आणि प्रार्थना
प.पू. डॉक्टर, तुमच्यामुळेच आज मला पूर्ण दिवस अनुभूती येत आहेत आणि मी भक्तीमय वातावरणात आहे. श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ यांच्या केवळ स्पर्शामुळे मला दिवसभर कृतज्ञताभावाच्या अनुभूती आल्या. माझी काहीच पात्रता नसतांना देवाने एवढे अनमोल आणि सुंदर क्षण मला दिले. माझ्या अंतर्मनात पालट घडवला आणि या सर्व अनुभूती दिल्या. देवाच्या या कृपेसाठी मी कृतज्ञ आहे. ‘माझ्यामध्ये देवाप्रती भक्तीभाव वाढू दे आणि मी देवाच्या कृपेला पात्र बनावे’, हीच देवाच्या चरणी प्रार्थना करते.’
– सौ. रंजना गौतम गडेकर (वय ४७ वर्षे), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (११.९.२०२२)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |